एकेकाळी कामाठीपुरातील 'या' गलिच्छ वस्तीत राहत होते कादर खान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 12:36 PM2021-10-22T12:36:01+5:302021-10-22T12:45:59+5:30

Kader khan: घरातील परिस्थितीला कंटाळून कादर खान रोज कब्रिस्तानमध्ये जाऊन बसत.

बॉलिवूडचे दिवंगत अभिनेता कादर खान यांनी उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर कायमच प्रेक्षकांचं मनोरंजन केलं होतं. आपल्या विनोदबुद्धीच्या कौशल्यावर प्रेक्षकांना हसवणाऱ्या या कलाकाराचं जीवन मात्र प्रचंड हालाखीच्या परिस्थितीत गेलं.

अफगाणिस्तानमधून भारतात आलेल्या कादर खान यांनी बॉलिवूडमध्ये स्वत:चं हक्काचं स्थान निर्माण केलं. परंतु, कलाविश्वात ही जागा निर्माण करताना त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला.

आज बॉलिवूडच्या इतिहासात कादर खान यांचं नाव मोठ्या आदराने घेतलं जातं. परंतु, मुंबईत आल्यानंतर त्यांना बराच स्ट्रगल करावा लागला होता. एका मुलाखतीत त्यांनी त्यांच्या संपूर्ण जीवनावर प्रकाश टाकला होता.

"माझे आई-वडील काबुलमध्ये राहत असताना माझ्या काही भावंडांचं निधन झालं होतं. त्यामुळे काबुलचं वातावरण या मुलांसाठी घातक असल्याचं मत माझ्या आईचं झालं होतं. त्यामुळे माझा जन्म झाल्यावर मी जिवंत रहावा यासाठी आई कित्येक महिने पायी प्रवास करत भारतात आली होती."

कादर खान यांचे आई-वडील भारतात आल्यानंतर ते मुंबईतील कामाठीपुरामध्ये स्थायिक झाले होते. विशेष म्हणजे कामाठीपुरातील ज्या भागात ते राहत होते. 'तो भाग अत्यंत गलिच्छ आणि भीतीदायक होता', असंही त्यांनी सांगितलं.

कादर खान यांचं संपूर्ण बालपण कामाठीपुरात गेलं. जेथे प्रोस्टिट्यूशन, गुन्हे असं दररोज घडायचं. मात्र, याच परिस्थितीत ते लहानाचे मोठे झाले.

"मुंबईत आल्यावर येथील सगळ्यात गलिच्छ भाग कामाठीपुरातील पहिली गल्ली..आज ज्याला लोक धारावी म्हणतात. ज्या लोकांना कामाठीपुरा माहिती आहे त्यांना त्या जागेतील वास्तव माहित असेल. संपूर्ण जगात जितक्या झोपडपट्टी नसतील तितक्या येथे एका इमारतीत पाहायला मिळतात. तिथे आम्ही तिसऱ्या मजल्यावर दोन खोल्यांमध्ये रहायचो", असं कादर खान म्हणाले होते.

पुढे ते म्हणतात, "एकीकडे प्रोस्टिट्युशन, दुसरीकडेही प्रोस्टिट्युशन..दारुडे लोक, दिवसाढवळ्या खून सारं काही इथे व्हायचं. जगातल्या सगळ्या वाईट गोष्टी इथे घडतात. तिथेच मी लहानाचा मोठा झालो."

परिस्थितीला गांजून कादर खान यांच्या वडिलांनी त्यांच्या आईला सोडलं होतं. त्यामुळे या अशा अवस्थेत कामाठीपुरात राहणं त्यांना शक्य नव्हतं. म्हणूनच, एका नातेवाइकाच्या सल्ल्याने त्यांच्या आईने दुसरं लग्न केलं.

दरम्यान, याच काळात घरातील परिस्थितीला कंटाळून कादर खान रोज कब्रिस्तानमध्ये जाऊन बसत. यावेळी अभिनेता अशरफ खान त्यांच्या नाटकासाठी एका लहान मुलाचा शोध घेत होते. तेव्हा त्यांच्या दृष्टीस कादर खान पडले आणि येथूनच कादर खान यांचा कलाविश्वातील प्रवास सुरु झाला. आणि, त्यानंतर त्यांनी कामाठीपुराला कायमचा रामराम केला.

Read in English