२६ टक्के कर्मचारी नोकऱ्या सोडणार? नववर्षाच्या तोंडावर मोठा सर्व्हे, अनेक कंपन्यांतील कर्मचारी विचारात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2023 11:35 AM2023-12-23T11:35:35+5:302023-12-23T11:39:53+5:30

Job Change reason: खासगी क्षेत्रात काम करणारे कर्मचारी वाढत्या महागाईमुळे त्रस्त आहेत. सध्याच्या नोकरीत वेतनात किरकोळ वाढ किंवा अजिबात वाढ न झाल्याने ते नव्या पर्यायाच्या शोधात आहेत.

नवी दिल्ली : अनेक जणांनी नव्या वर्षात काय करायचे, कुठे जायचे, काय खरेदी करायचे आदी प्लॅन आखून ठेवले असतील. परंतु भारतातील तब्बल २६ टक्के नोकरदारांनी सध्याची कंपनी सोडून नव्या ठिकाणी जाण्याचा विचार चालविला आहे.

जागतिक स्तरावर हेच प्रमाण २८ टक्के इतके आहे. प्रत्येक चौथ्या कामगाराने नोकरी सोडल्यास कंपन्यांच्या अडचणीत भर पडू शकते. बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपच्या अहवालातून हे समोर आले आहे.

खासगी क्षेत्रात काम करणारे कर्मचारी वाढत्या महागाईमुळे त्रस्त आहेत. सध्याच्या नोकरीत वेतनात किरकोळ वाढ किंवा अजिबात वाढ न झाल्याने ते नव्या पर्यायाच्या शोधात आहेत. कंपनीची धोरणे, व्यवस्थापन, सुट्या, शिकण्याची संधी आदी बाबींचाही कर्मचाऱ्यांवर सर्वाधिक प्रभाव पडत असतो, असे या अहवालातून दिसून आले आहे. (वृत्तसंस्था)

चांगले व्यवस्थापक कर्मचाऱ्यांच्या भावनिक गरजा नीटपणे समजून घेत असतात. त्यामुळे त्यांच्यात कंपनीविषयी कमी प्रमाणात क्षोभ तयार होतो आणि नोकरी सोडण्याचा धोका ७२ टक्क्यांनी कमी होतो, असे अहवालात म्हटले आहे.

यामुळे कर्मचारी टिकण्याचे प्रमाण ३.२ पटींनी वाढते तर त्यांच्यातील समाधानाची पातळी १३.९ पटींनी वाढते, असे यात म्हटले आहे.

कर्मचाऱ्यांना नेमके काय हवे आहे, कंपनीकडून त्यांच्या काय अपेक्षा आहेत, हे जाणून घेण्यावर भर देण्यात आला. २० निकषांच्या आधारे प्रश्नावली तयार करण्यात आली होती.

यात प्रामुख्याने वेतन, इतर भत्ते आणि कामाचे तास याबाबत अपेक्षा विचारण्यात आल्या. कंपनीकडून तुम्हाला महत्त्व दिले जाते का, अडचणीच्या काळात पाठिंबा मिळतो का आदी भावनिक बाबी समजून घेण्यात आल्या. कामातून आनंद मिळतो का, हे ही विचारण्यात आले.

या सर्वेक्षणात ११ हजार कर्मचाऱ्यांची मते जाणून घेतली आहेत. बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपने ६ ते ३० ऑक्टोबर २०२३ या कालावधीत सर्व्हे पूर्ण केला. हा सर्व्हे अमेरिका, कॅनडा, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, जपान, भारत या आठ देशांमध्ये करण्यात आला.

सध्याचा पगार कमी, पुरेशी वाढ नाही; इतर सुविधा तसेच भत्तेही कमी; काम, जगण्याचा ताळमेळ नाही; कामात आनंद मिळत नाही

टॅग्स :नोकरीjob