तुमचा आवडता Parle-G महागणार, पॅकेटचे वजनही कमी होणार; नवीन किंमत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 18:17 IST2024-12-20T17:29:59+5:302024-12-20T18:17:01+5:30

Parle Products Update: लहान मुले, तरुण किंवा वृद्ध...बिस्किटाचे नाव आले की, सर्वांच्या तोंडावर Parle-G बिस्किटाचे चे नाव येते.

Parle-G Price Hike: लहान मुले असोत, तरुण असोत वा वृद्ध...बिस्किटाचे नाव आले, तर तोंडावर पहिले नाव Parle-G बिस्किटाचे येते. आता हाच सर्वांचा आवडता पार्ले-जी महाग होणार आहे. कंपनी लवकरच पार्ले-जीच्या किमतीत वाढ करणार आहे.

एका अहवालानुसार, देशातील सर्वात मोठी FMCG कंपनी Parle Products जानेवारी 2025 पासून त्यांच्या उत्पादनांच्या किमतीत 5% वाढ करणार आहे. यामध्ये पार्ले-जी बिस्किटासोबतच चॉकलेट, स्नॅक्स आणि इतर खाद्यपदार्थांचा समावेश आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पार्ले आपल्या सर्वात स्वस्त आणि सर्वात कमी किंमतीच्या बिस्कीट पॅकेटचे वजनही कमी करण्याच्या विचारात आहे. सर्वात लोकप्रिय 'पार्ले-जी' बिस्किटांच्या पॅकेटचे वजन 5 ते 10 टक्क्यांनी कमी होऊ शकते, असे अहवालात म्हटले आहे.

इतर स्वस्त बिस्किटांच्या पॅकेटचे वजनही कमी करण्यात येईल. कच्च्या मालाची वाढती किंमत आणि पाम तेलावरील आयात शुल्कात वाढ, याचा परिणाम उत्पादकांवर होत असल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे.

वाढत्या खर्चाचा परिणाम आणि पामतेलावरील आयात शुल्क वाढल्याने कंपन्यांना उत्पादनाच्या किमतीत वाढ करणे आवश्यक झाले आहे. अलीकडेच सरकारने पामतेलावरील आयात शुल्कात वाढ केली आहे.

बिस्किटे तयार करण्यासाठी पाम तेल वापरले जाते. 2021 च्या सुरुवातीला, कंपनीने Parle-G, Hide and Seek आणि Crackjack या आपल्या आवडत्या उत्पादनांच्या किमतीत 5 ते 10 टक्के वाढ जाहीर केली होती.

साखर, गहू आणि खाद्यतेलासारख्या कच्च्या मालाच्या किमतीत झालेली प्रचंड वाढ, हे दरवाढीचे मुख्य कारण आहे. बिस्किटांव्यतिरिक्त, कंपनीने रस्क आणि केकच्या किमतीत 7-8 टक्क्यांनी वाढ केली होती. त्यावेळी पार्ले-जी या आवडत्या ग्लुकोज बिस्किटाच्या किमतीत 6-7 टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती.