जगातील सर्वात श्रीमंत शहर! ३.५ लाख कोट्यधीश, ६० अब्जाधीश, टॉप १० मध्ये एकाच देशाचा दबदबा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 11:28 IST2025-03-04T11:25:14+5:302025-03-04T11:28:29+5:30
worlds richest city : काही दिवसांपूर्वी श्रीमंत देशाची यादी प्रसिद्ध झाली होती, त्यात सिंगापूरने बाजी मारली होती. मात्र, आता शहरांच्या यादीत दुसरा देश पुढे आला आहे.

महाशक्ती होण्यासाठी देशाची आर्थिक स्थिती मजबूत असणे आवश्यक आहे. जागतिक बँकेने नुकतेच जगातील श्रीमंत देशाची यादी प्रसिद्ध केली आहे. या आकडेवारीनुसार, सिंगापूर १४१,५५३ डॉलरच्या जीडीपीसह पहिल्या स्थानावर विराजमान आहे. अशीच आता श्रीमंत शहरांचीही यादी प्रसिद्ध झाल आहे.
हेनली अँड पार्टनर्सच्या २०२४ सालातील जगातील सर्वात श्रीमंत शहरांच्या यादीत न्यूयॉर्क पहिल्या क्रमांकावर आहे. न्यूयॉर्कमध्ये ३४९,५०० लक्षाधीश, ६७५ सेंटी-मिलिअनियर (किमान १० कोटी डॉलरची संपत्ती असलेले लोक) आणि ६० अब्जाधीश राहतात. या कारणास्तव याला जगातील सर्वात श्रीमंत शहराचा दर्जा देण्यात आला.
सन २०२३ मध्ये न्यूयॉर्कची अर्थव्यवस्था सुमारे १ ट्रिलियन डॉलर होती. न्यूयॉर्कला विविध संस्कृतींचा संगम असेही म्हणतात. या शहरात सुमारे ८२ लाख लोक राहतात. विशेष म्हणजे येथे तब्बल ८०० भाषा बोलणारे लोक राहतात. जगातील श्रीमंत शहरांच्या यादीत अमेरिकेचे वर्चस्व आहे. पहिल्या ५० मध्ये ११ अमेरिकन शहरे आहेत. तर पहिल्या दहामध्ये ९ अमेरिकन शहरे आहेत.
न्यूयॉर्कचे रिअल इस्टेट मार्केट देखील जगातील सर्वात महाग आहे. शहरातील फिफ्थ अव्हेन्यू हा जगातील दुसरा सर्वात महागडा शॉपिंग स्ट्रीट आहे. येथील घरभाडेही अमेरिकेत सर्वाधिक आहे. तरीही जगातील सर्वात श्रीमंत लोकांना येथे राहणे आवडते.
न्यूयॉर्क हे अमेरिकेची आर्थिक राजधानी म्हणूनही ओळखले जाते, कारण अमेरिकेचा शेअर बाजार वॉल स्ट्रीट याच शहरात आहे. न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज आणि नॅस्डॅक हे जगातील सर्वात मोठे स्टॉक एक्सचेंज आहेत.
एकट्या सिक्युरिटीज उद्योगात १८१,००० पेक्षा जास्त लोकांना रोजगार मिळतो. येथे जेपी मॉर्गन चेस, सिटी ग्रुप, मॉर्गन स्टॅन्ली आणि गोल्डन सॉक्स सारख्या आघाडीच्या वित्तीय संस्थांची मुख्यालये आहेत.
न्यू यॉर्क शहर मीडिया, तंत्रज्ञान, फॅशन, आरोग्यसेवा आणि रिअल इस्टेटमध्ये देखील आघाडीवर आहे. न्यूयॉर्कमध्ये तंत्रज्ञान उद्योग वेगाने वाढत आहे. गुगल, ॲमेझॉन आणि फेसबुकसारख्या मोठ्या टेक कंपन्या न्यूयॉर्कमध्ये आपला व्यवसाय वाढवत आहेत.
फॅशन उद्योगात सुमारे १८०,००० लोक काम करतात. याशिवाय द न्यूयॉर्क टाईम्स, एनबीसी आणि कॉन्डे नॅस्ट सारखी मोठी मीडिया हाऊस देखील येथून काम करतात.