फक्त २ हजारांच्या गुंतवणुकीवर सुरू केलं काम; दिवसाला कमावतो २५ हजार, काय आहे व्यवसाय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 08:58 IST2024-12-06T08:51:30+5:302024-12-06T08:58:11+5:30

आंध्र प्रदेशच्या विजयवाडा येथे राहणारे जयचंद थोटा यांनी केवळ २ हजार रुपयांच्या गुंतवणुकीत दुधाळ मशरूमची शेती सुरू केली. आज ते दिवसाला २५ हजार रुपये कमाई करत आहेत. जयचंद हे रोज ७० ते १०० किलो मशरूम पिकवतात. सुमारे ३०० रुपये किलो दराने त्याची विक्री होते.जयचंद यांनी भारत, दक्षिण आफ्रिका आणि दुबई येथे हजारो लोकांना मशरूम लागवडीचे प्रशिक्षण दिले आहे. त्यांचा हा यशस्वी उद्योग कसा सुरू झाला पाहूया.
जयचंद थोटा लहानपणापासून पावसाची आतुरतेने वाट पाहत होते. पावसाळ्यात विजयवाड्याच्या स्थानिक बाजारपेठांमध्ये स्वादिष्ट दुधाळ मशरूम विक्रीला यायचे. त्यांच्या वडिलांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय होता. जयचंद यांनी वाहन चालवणे, ते सांभाळणे, ग्राहकांना सेवा देणे आदी अडचणी पाहिल्या होत्या.
वडिलांप्रमाणे ट्रान्सपोर्ट व्यवसायात काम करायची जयचंद यांची इच्छा नव्हती. त्यांना असं काहीतरी करायचे होते ज्यासाठी जास्त गुंतवणूक किंवा कुठेही प्रवास करण्याची आवश्यकता नाही. मशरूम शेती हा कमी गुंतवणुकीचा व्यवसाय आहे. जयचंद यांनी आपल्या व्यवसायासाठी त्याला पहिली पसंती दिली.
आंध्र लोयोला कॉलेजमधून कृषी विषयात बीएससी पूर्ण केल्यानंतर जयचंद यांनी बंगळुरूमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉर्टिकल्चरल रिसर्च (IIHR) मधून मशरूम लागवडीचे प्रशिक्षण घेतले. त्यांनी तेथून मिल्की मशरूमचे बिया (स्पॉन) विकत घेतले जेणेकरून ते आपल्या घरी वाढवू शकतील.
बटन मशरूमच्या ऐवजी दुधाळ मशरूम ३० ते ३५ अंश सेल्सिअस तापमानात चांगले वाढतात. काही भागात ते वर्षभर पिकवता येतात. दुधाळ मशरूम १० दिवसापर्यंत साठवले जाऊ शकतात. २८ ते ४० अंश सेल्सिअस तापमान ते सहन करू शकतात. दुसरीकडे बटण मशरूमला थंड हवामान किंवा वातानुकूलित जागा आवश्यक आहे.
२००५ मध्ये जयचंद यांनी दुधाळ मशरूम बियाणे (स्पॉन), पॉलिथिन पिशव्या आणि इतर वस्तू खरेदीसाठी २००० रुपये गुंतवले. अनुभवाअभावी पहिल्यांदा त्यांना अपयश आलं. मशरूम खराब असल्याने ते बाजारात काहीही विकता येत नव्हते. पुन्हा दुसऱ्यांदा प्रयत्न केला त्यातही ते अपयशी ठरले त्यानंतर त्यांनी विजयवाडा येथे मशरूम उत्पादन युनिट चालवणाऱ्या एका दूरच्या नातेवाईकाकडे प्रशिक्षण घेण्याचे ठरवले.
जयचंद यांच्या आयुष्यातील हा टर्निंग पॉइंट होता. जयचंद यांनी त्यांच्यासोबत दोन वर्षांहून अधिक काळ काम केले. मशरूम वाढवणे, त्यांची कापणी करणे आणि बाजारात विकणे या सर्व गोष्टी जाणून घेतल्या. यामुळे त्यांना पुन्हा व्यवसाय सुरुवात करण्याचा आत्मविश्वास मिळाला. २००७ मध्ये त्यांनी थनुश्री मशरूमची कंपनीची स्थापना केली.
जयचंद यांनी त्यांच्या घराजवळ एक लहान शेड बांधले आणि IIHR कडून ५० किलो बिया खरेदी केल्या. मशरूमची शेती शिकत असताना भेटलेल्या ग्राहकांना त्यांनी आपले पीक विकले. मग जयचंद यांनी मागे वळून पाहिलं नाही. जयचंद काही वर्षे IIHR कडून बिया खरेदी करत होते. पण, आता ते त्यांच्याच प्रयोगशाळेत बिया तयार करतात.
जयचंद हे दररोज १०० किलो मशरूमच्या बिया तयार करतात. ते मशरूम शेतकरी खरेदी करतात. जयचंद यांनी लोकांना भारत, दुबई आणि दक्षिण आफ्रिकेत मशरूम फार्म उभारण्यास मदत केली आहे. ते बटन मशरूम लागवडीचेही प्रशिक्षण देतात.