बंद पडलेली KGF पुन्हा सुरु होणार? कामगार संघटनेने पंतप्रधान मोदींना पाठविला मास्टर प्लान; 30 लाख टन सोने...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2025 14:30 IST2025-01-05T14:16:14+5:302025-01-05T14:30:06+5:30

१२१ वर्षांच्या काळात केजीएफमधून ९०० टन सोनेच काढण्यात आले आहे. अजून तीस लाख टन सोने या केजीएफमध्ये दडलेले आहे.

प्रसिद्ध अभिनेता यशच्या केजीएफ सिनेमांमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेली कोलार गोल्ड फील्ड्स पुन्हा सुरु होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केजीएफच्या कामगार संघटनेने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र पाठवून पुन्हा केजीएफ चालू करण्याची मागणी केली आहे. तसेच यामुळे भारत शक्तीशाली देश बनेल तसेच दोन लाख लोकांना रोजगार मिळेल असेही सांगण्यात आले आहे. २००१ मध्ये बंद केलेली केजीएफ पुन्हा सुरु झाली तर भारतात सुवर्णयुग सुरु होईल, असा दावा या संघटनेने केला आहे.

कोलार जिल्ह्यातील या गावाने इंग्रजांच्या काळात सुवर्णयुग पाहिलेले आहे. बंगळूरुपासून १०० किमीवर असेलला हा गाव आज मरणासन्न यातना भोगत आहे. ब्रिटिशांनी १८८० ला ही खाण सुरु केली होती. २००१ ला भारत सरकारने कमी सोने मिळत असल्याच्या कारणामुळे ती बंद केली होती.

या १२१ वर्षांच्या काळात केजीएफमधून ९०० टन सोनेच काढण्यात आले आहे. अजून तीस लाख टन सोने या केजीएफमध्ये दडलेले आहे. परंतू ते काढण्याचा खर्च एवढा होता जो भारत सरकारला तेव्हा परवडणारा नव्हता, यामुळे ती कंपनी बंद करण्यात आली होती.

याविरोधात कामगार संघटना सर्वोच्च न्यायालयात गेल्या होत्या. कंपनीचा लिलाव करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले होते. परंतू केंद्राने २०१३ मध्ये आपण कंपनी पुन्हा सुरु करु शकणार नाही, परंतू तुम्ही तुमच्या पातळीवर मायनिंग सुरु करू शकता असे सांगत हात वर केले होते.

1994, 1997 आणि 2000 मध्ये कोलार गोल्ड फील्डमधील सोन्याच्या साठ्याचा शोध घेण्यासाठी 3 संसदीय स्थायी समित्या स्थापन करण्यात आल्या. मीडिया रिपोर्ट्सनुसार, समित्यांनी 2010 मध्ये त्यांच्या अहवालात केजीएफमध्ये अजूनही 30 लाख टन सोन्याचा साठा असल्याचे सांगितले होते.

बीजीएम कर्मचारी, पर्यवेक्षक आणि अधिकारी युनायटेड फोरमचे अध्यक्ष केएम दिवाकरन यांनी मोदींना पत्र लिहून भारतात सोन्याची सर्वाधिक मागणी असूनही, केजीएफमधील खाण गेल्या काही वर्षांपासून बंद असल्याकडे लक्ष वेधले आहे. दक्षिण आफ्रिका दरवर्षी 200 टनांपेक्षा जास्त सोने काढते. तर भारतात वर्षभरात फक्त 1 टन (1 हजार किलो) सोन्याचे उत्पादन होते, असे त्यांनी म्हटले आहे.

1880 ते 1956 पर्यंत, इंग्लंडच्या जॉन टेलर आणि सन्स कंपनीने KGF मधून दरवर्षी सुमारे 10 टन सोने काढले. 2001 पर्यंत, 3.5 किमी खोलीतून एकूण 900 टनांहून अधिक सोने काढण्यात आले. आता मायनिंग सुरु केले तर भारत वर्षाला १०० टन सोने काढू शकतो, असे त्यांनी म्हटले आहे.

भारत सरकार पुढील 100 वर्षांसाठी KGF मधून नफा कमावू शकते. KGF मध्ये 27 भार सोन्याचे आहेत (सोन्याचे थर जे खडकांमधील शिरासारखे दिसतात). आतापर्यंत फक्त 2 भारांमधून सोने काढण्यात आले आहे. इंग्रजांनी वर्षानुवर्षे केवळ दोन भारांतून सोने काढूनही तिजोरी भरली. भारत उरलेल्या २५ भारांतून सोने काढून काय करू शकतो, विचार करा, असे दिवाकरन यांनी मोदींना म्हटले आहे.

केजीएफमध्ये १९०२ मध्ये वीज पोहोचली होती. KGF वीज वापरणारे जगातील पहिले खाण क्षेत्र बनले होते. 220 किमी अंतरावर असलेल्या शिवसमुद्रम येथे केजीएफसाठी विशेषत: हायड्रो इलेक्ट्रिक प्लांटची स्थापना करण्यात आली. तिथून केजीएफला वीज दिली जात होती.

केजीएफ भागाचे तापमान थंड होते. त्यामुळे ब्रिटिश मॉडेल घरे बांधण्यात आली. यामुळे हा भाग 'मिनी इंग्लंड' म्हणून ओळखला जाऊ लागला. हॉस्पिटलमधील उपकरणे अद्ययावत होती. आशियातील पहिली एक्सरे मशीन, ईसीजी युनिट, ऍनेस्थेसिया मशीन, आरएच टायपिंग सुविधा केजीएफमध्ये होती. 1972 मध्ये KGF चे राष्ट्रीयीकरण झाल्यानंतर, हॉस्पिटलचे नाव BGML हॉस्पिटल असे ठेवण्यात आले.