ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 11:54 IST2025-08-27T11:33:15+5:302025-08-27T11:54:45+5:30
असेही काही क्षेत्र आहेत, ज्यांच्यावर या कराचा फारच कमी परिणाम होईल...

डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे अमेरिका आणि भारत यांच्यातील दरी वाढताना दिसत आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी भारताला अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ अथवा कर लावला आहे. याची अंतिम मुदत बुधवारी (२७ ऑगस्ट) संपत आहे...
..यामुळे, आता भारतावरील एकूण कर ५० टक्के होईल. भारतातील काही क्षेत्रांना या नव्या कर प्रणालीचा परिणाम होऊ शकतो. औषधनिर्माण, ऑटोमोटिव्ह कंपोनंन्ट्स आणि सौर उपकरणे आदी क्षेत्रांवर होऊ शकतो.
एस अँड पी ग्लोबलच्या अहवालानुसार, भांडवली वस्तू, रसायने, ऑटोमोबाईल्स, अन्न आणि पेय निर्यातीला या कारामुळे अडचणींना सामोरे जावे लागू शकते.
याशिवाय असेही काही क्षेत्र आहेत, ज्यांच्यावर या कराचा फारच कमी परिणाम होईल. यामध्ये टेलिकॉम, आयटी, बँका आणि रिअल इस्टेट यांचा समावेश आहे.
औषधोद्योग - भारत अमेरिकेला सुमारे १० अब्ज डॉलर्सची जेनेरिक औषधांची निर्यात करतो. हे प्रमाण देशाच्या औषध निर्यातीच्या ३१-३५ टक्के एवढे आहे. यावर दिलासा मिळाला नाही, तर अमेरिकन बाजारपेठांना परवडणारी औषधे मिळू शकणार नाहीत.
वस्त्रोद्योग - भारताच्या कापड निर्यातीपैकी सुमारे २८ टक्के निर्यात ही अमेरिकेत होते. अमेरिकेत भारतीय कपड्यांवर १०-१२ टक्के कर होता, मात्र आता तो ५० टक्के होईल/झाला आहे. यामुळे या क्षेत्राला दबावाचा सामना करावा लागू शकतो.
सौर उपकरणे - या कराचा ऊर्जा क्षेत्रावर थेट परिणाम होण्याची शक्यता फारच कमी आहे. मात्र, सौर पीव्ही सेल आणि मॉड्यूल निर्यातदारांना समस्यांचा सामना करावा लागू शखतो.
या क्षेत्रांवर होऊ शकतो कमी परिणाम - काही क्षेत्र ट्रम्प टॅरिफपासून वाचू शकतात. आयटी, रिअल इस्टेट, बँका, वीज आणि भांडवली वस्तू आदींवर या कराचा तुलनेने कमी परिणाम होऊ शकतो.