फास्टॅग ब्लॅकलिस्ट होऊ नये, यासाठी नेमके काय करायचे? जाणून घ्या, अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2024 03:46 PM2024-01-30T15:46:30+5:302024-01-30T15:59:55+5:30

FASTag : फास्टॅगची केवायसी प्रक्रिया कशी पूर्ण करायची, याचीही माहिती अनेक वाहनधारकांना नाही.

नवी दिल्ली : इलेक्ट्रॉनिक पद्धतीने टोल संकलन सुरू केल्याने देशभरातील नाक्यांवर गर्दी होण्याचे प्रमाण घटले आहे. वाहनधारकांचा नाक्यांवर होणारा खोळंबा फास्टॅगमुळे कमी झाला आहे.

परंतु, ३१ जानेवारी २०२४ पर्यंत केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्यास वाहनांवर लावलेले फास्टॅग निष्क्रिय करण्यात येणार आहेत, असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे. परंतु, गाडीवर लावलेला फास्टॅग ब्लॅकलिस्ट होऊ नये यासाठी नेमके काय करायचे, याची माहिती अनेकांना नाही.

फास्टॅगची केवायसी प्रक्रिया कशी पूर्ण करायची, याचीही माहिती अनेक वाहनधारकांना नाही. दिलेल्या मुदतीत हे काम पूर्ण न केल्यास त्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे याची प्रक्रिया समजून घेणे गरजेचे आहे.

एकच फास्टॅग अनेक वाहनांवर लावणे बंद करणे आणि व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी प्राधिकरणाने 'वन व्हेइकल वन फास्टॅग' अभियान सुरू केले आहे.

वाहनावर लावलेल्या फास्टॅगचे केवायसी पूर्ण करण्यासाठी सर्वप्रथम https://fastag.ihmcl.com या वेब पोर्टलवर जा. आपला रजिस्टर्ड मोबाइल नंबर आणि पासवर्डच्या आधारे आपल्या काउंटवर लॉग इन करा.

यानंतर आलेला ओटीपी सबमिट करून तुमच्या फास्टॅगच्या व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण करा. लॉग इन केल्यानंतर डॅशबोर्डवर दिसत असलेल्या 'माय प्रोफाइल' या ऑप्शनवर क्लिक करा. या ठिकाणी रजिस्ट्रेशनवेळी दिलेली सर्व माहिती दिसू लागते.

केवायसी पूर्ण करण्यासाठी ‘माय प्रोफाइल’ सेक्शनमध्ये ‘केवायसी’ या पर्यायावर जा. यानंतर आवश्यक ओळखपत्र तसेच पत्त्यासंबंधित माहिती भरा. तुमचा पासपोर्ट आकाराचा फोटो आणि पत्त्यासाठी लागणारा पुरावा अपलोड केल्यानंतर फास्टॅगची केवायसी प्रक्रिया पूर्ण होते.