TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 09:10 IST2025-09-18T09:05:42+5:302025-09-18T09:10:32+5:30

TVS Success Story: जर तुम्हाला व्यवसायाची आवड असेल आणि तुमच्या मनात जिद्द असेल तर तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. टी. व्ही. सुंदरम अय्यंगार (T.V.Sundram Iyengar) यांनीही असंच काही केलं.

TVS Success Story: जर तुम्हाला व्यवसायाची आवड असेल आणि तुमच्या मनात जिद्द असेल तर तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. टी. व्ही. सुंदरम अय्यंगार (T.V.Sundram Iyengar) यांनीही असंच काही केलं. तुम्ही टीव्हीएस कंपनीबद्दल नक्कीच ऐकलं असेल, जी तिच्या दुचाकींसाठी प्रसिद्ध आहे. ही कंपनी टी. व्ही. सुंदरम अय्यंगार यांनी १९११ मध्ये स्थापन केली होती.

तो ब्रिटिश काळ होता. त्यावेळी टीव्ही सुंदरम इम्पीरियल बँकेत (आता स्टेट बँक ऑफ इंडिया) काम करत होते. पण त्यांना व्यवसाय सुरू करण्याची आवड होती. परंतु, ब्रिटिश राजवटीत त्यांना पुढे जाण्याची संधी मिळाली नाही. पण त्यांनी बँकेतील नोकरी सोडून व्यवसाय जगात प्रवेश केला.

व्यवसाय जगात प्रवेश केल्यावर लगेचच यश मिळतं असं नाही. टीव्ही सुंदरम हे असेच एक व्यक्ती होते. बँकेची नोकरी सोडल्यानंतर त्यांनी सायकल दुरुस्तीचा व्यवसाय सुरू केला. पण तो यशस्वी झाला नाही. त्यानंतर त्यांनी इतर अनेक नोकऱ्या करण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येक नोकरीत निराशा पदरी प़ली. पण नंतर, त्यांनी तामिळनाडूमधील बस व्यवसायात प्रवेश केला आणि पुन्हा मागे वळून पाहिलं नाही.

ब्रिटिश सरकारनं बांधलेली रेल्वे व्यवस्था फक्त ब्रिटिशांसाठी आहे हे लक्षात आल्यावर टीव्ही सुंदरम यांचं जीवन बदललं. भारतातील गावकऱ्यांनाही त्याची गरज आहे असं त्यांना वाटू लागलं. म्हणून, त्यांनी रेल्वे स्थानकांशी जोडणारी बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला.

त्यावेळी त्यांच्याकडे पैसे नव्हते आणि पूर्वीचे व्यवसायही बंद पडले होते. त्यामुळे त्यांनी प्रथम वडिलांकडे मदतीची याचना केली. त्यांनी ५ शेवरलेट बसेस खरेदी केल्या आणि तामिळनाडू शहरांदरम्यान बस चालविण्याची परवानगी मागितली. पण, दक्षिण भारतीय रेल्वेनं त्याला विरोध केला. यामुळे त्यांच्या गुंतवणुकीला फटका बसेल, असं त्यांचं म्हणणं होतं.

जेव्हा टीव्ही सुंदरम यांना परवानगी मिळाली नाही, तेव्हा त्यांनी आपला प्लॅन बदलला. त्यांनी गावकऱ्यांना त्यांच्या घरातून रेल्वे स्टेशनवर नेण्याचा निर्णय घेतला. या करारामुळे पहिली टीव्हीएस वाहतूक सेवा सुरू झाली. त्यांच्यासाठी हेही सोपं नव्हतं. गावातील लोकांना बसेसची भीती वाटत होती कारण त्यांना बैलगाड्यांची सवय होती. म्हणून त्याची पत्नी जेवण बनवत असे आणि छताखाली वाढत असे. लोक जेवायला आणि तिकिटे खरेदी करायला येत असत. आणि अशा प्रकारे, टीव्हीएस कंपनीचा जन्म झाला.

टीव्ही सुंदरम यांचं एप्रिल १९५५ मध्ये वयाच्या ७८ व्या वर्षी निधन झालं. आज त्यांच्या कुटुंबातील सदस्य टीव्हीएस ग्रुपची धुरा सांभाळत आहेत. कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये टीव्हीएस मोटर कंपनी, टीव्हीएस इलेक्ट्रॉनिक्स, टीव्हीएस होल्डिंग्ज, टर्बो एनर्जी आणि सुंदरम टेक्सटाईल्स यांचा समावेश आहे. टीव्हीएस आज बीएमडब्ल्यूच्या २०% मोटारसायकलींचंही उत्पादन करते.

समूहाची प्रमुख कंपनी, टीव्हीएस मोटर कंपनी लिमिटेड, स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्टेड आहे. आज तिचं बाजार भांडवल ₹१,६६,२०० कोटींपेक्षा जास्त आहे. टीव्हीएस कंपनीची कहाणी इनोव्हेशन, कठोर परिश्रम आणि ग्राहकांकडे लक्ष केंद्रित करण्याचं एक उत्तम उदाहरण आहे. टीव्हीएसनं नेहमीच आपली मूल्ये जपली आहेत आणि हेच तिच्या यशाचं रहस्य आहे. कंपनीचा असा विश्वास आहे की प्रतिष्ठा आणि विश्वास प्रथम येतो आणि त्यानंतर आपला नफा येतो.