Credit Card वरून पैसे काढायच्या विचारात आहात? त्यापूर्वी जाणून घ्या याचे फायदे-तोटे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2022 14:38 IST2022-10-05T14:28:47+5:302022-10-05T14:38:03+5:30
या सणासुदीच्या काळात लोकांकडून क्रेडिट कार्डच्या माध्यमातून पैसे काढून ऑनलाइन आणि ऑफलाइन खरेदी मोठ्या प्रमाणावर केली जात आहे.

सणासुदीच्या हंगामात तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डमधून रोख रक्कम काढून खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर खरेदी करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्ही या गोष्टी लक्षात घेतल्या नाहीत तर तुम्ही अडचणीत येऊ शकता.

सणासुदीच्या काळात लोक क्रेडिट कार्डमधून पैसे काढून ऑनलाइन आणि ऑफलाइन खरेदी मोठ्या प्रमाणावर करत आहेत. कारण लोकांना कॅशलेस व्यवहार आणि क्रेडिट कार्डवर व्याजमुक्त क्रेडिटची सुविधा मिळत आहे. यासोबतच रिवॉर्ड पॉइंट्स, कॅशबॅक आणि क्रेडिट कार्डवरील इंधन अधिभार माफीसह अनेक प्रकारच्या सूट लोकांना आकर्षित करत आहेत.

कॅश काढण्याचे काही फायदेही आहेत. ऑनलाइन आणि ऑफलाइन खरेदीसाठी क्रेडिट कार्डवर अॅडव्हान्सची सुविधा उपलब्ध आहे. ज्याद्वारे ग्राहक गरजेच्या वेळी क्रेडिट कार्डमधून पैसेही काढू शकतात. क्रेडिट कार्डवर कॅशलेस ट्रान्झॅक्शन आणि इंटरेस्ट फ्री क्रेडिटची सुविधा देण्यात येते.

रिवॉर्ड पॉइंट्स, कॅशबॅक आणि इंधन अधिभार माफीसह क्रेडिट कार्डवर अनेक सवलत उपलब्ध आहेत. एकूण क्रेडिट कार्ड मर्यादेच्या 20 ते 40 टक्क्यांपर्यंत रोख रक्कम काढण्याची सुविधा उपलब्ध आहे. क्रेडिट कार्डवर एकूण क्रेडिट मर्यादा 5 लाख रुपये आहे, त्यामुळे तुम्ही 1 लाख ते 2 लाख रुपये सहज काढू शकता.

क्रेडिट कार्डवरून अॅडव्हान्स्ड सुविधेचा वापर केवळ इमर्जन्सीच्या परिस्थितीत केला गेला पाहिजे. कारण यावर तुम्हाला मोठ्या प्रमाणात व्याज आणि ट्रान्झॅक्शन चार्ज द्यावा लागतो. कॅश अॅडव्हान्सचा सतत वापर केला तर त्याचा क्रेडिट स्कोअरवर मोठा परिणाम होतो.

क्रेडिट कार्डावरून रोख रक्कम काढल्यास तुम्हाला व्याजाशिवाय अतिरिक्त चार्जही द्यावा लागतो. तो काढलेल्या रकमेवर अडीच ते तीन टक्क्यांपर्यंत असू शकतो. जर तुम्ही क्रेडिट कार्डवरून 1 लाख रूपये काढले तर तुमच्याकडून बँक 2 ते 3 हजारांपर्यंत रक्कम वसूल करू शकते. याशिवाय बँक दर महिन्याला त्या रकमेवर 3.5 टक्के दराने व्याजही आकारू शकते.

क्रेडिट कार्ड तज्ज्ञांचे म्हणणे आहे की क्रेडिट कार्डमधून रोख रक्कम काढल्याने, कॅश अॅडव्हान्सवर व्याजमुक्त क्रेडिट कालावधीचा कोणताही लाभ मिळत नाही आणि रोख रक्कम काढल्यानंतर त्यावर व्याज जमा होऊ लागते. रोख रक्कम काढणे हे क्रेडिट कार्डचा वापर मानले जाते, ज्यामुळे तुमच्या कार्डची क्रेडिट मर्यादा कमी होते.

क्रेडिट कार्डमधून पैसे काढणे तुमच्या खिशाला खूप महागात पडू शकते. त्यामुळे हा पर्याय केवळ इमर्जन्सीच्या वेळीच वापरावा लागेल, परंतु ज्यावेळी तुम्हाला याच्या वापराची गरज पडेल तेव्हा लवकरात लवकर ही रक्कम भरण्याचा प्रयत्न करा. तुम्ही बिलिंग तारखेपूर्वी पेमेंट केल्यास ते तुमच्यासाठी चांगले होईल.

















