प्रवासी वाहतूक हे फक्त सांगायला झालं; भारतीय रेल्वेची खरी कमाई कशातून होते माहिती आहे का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2025 16:24 IST2025-03-15T16:13:06+5:302025-03-15T16:24:03+5:30
Indian Railways Freight Income: भारतीय रेल्वे सर्वाधिक कमाई कशातून करते असं म्हटलं की तुमच्या डोळ्यांसमोर प्रवासी येत असतील. पण, तुमचे उत्तर चुकीचे आहे.

भारतीय रेल्वे म्हटलं की डोळ्यांसमोर तुडूंब भरलेले रेल्वेचे डबे येतात. रोज कोट्यवधी प्रवासी रेल्वेने देशांतर्गत प्रवास करतात. भारतीय रेल्वे ही जगातील सर्वात मोठ्या रेल्वे नेटवर्कपैकी एक आहे. देशातील वाहतुकीचे प्रमुख साधन म्हणून रेल्वेकडे पाहिले जाते. कमाईच्या बाबतीतही रेल्वे कमी नाही. मात्र, रेल्वेची सर्वाधिक कमाई कशातून होते हे माहिती आहे का?
रेल्वेची सर्वाधिक कमाई कशातून होते? हा प्रश्न विचारल्यानंतर पहिल्यांदा तुमच्या डोक्यात प्रवासी आले असतील ना? पण, तुमचे उत्तर चुकीचे आहे. भारतीय रेल्वेच्या उत्पन्नातील सर्वात मोठा वाटा मालवाहतुकीतून मिळतो. कोळसा, सिमेंट, खते, धान्य आणि इतर वस्तूंची वाहतूक रेल्वेमार्गे केली जाते. बसला ना धक्का? चला आता आकडेवारी पाहुयात.
भारतीय रेल्वेने आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या ११ महिन्यांत आतापर्यंत १,४६५.३७१ मेट्रिक टन मालवाहतूक केली आहे, जी गेल्या वर्षीच्या संपूर्ण १२ महिन्यांत १,४४३.१६६ मेट्रिक टन पेक्षा जास्त आहे. रेल्वे मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीवरून ही माहिती मिळाली आहे. भारतीय रेल्वेने २०२७ पर्यंत ३,००० मेट्रिक टन मालवाहतुकीचे लक्ष्य ठेवले आहे.
मालवाहतूक हा भारतीय रेल्वेचा कणा आहे, या कामाचा महसुलात सुमारे ६५ टक्के वाटा आहे. कोळसा, लोहखनिज आणि सिमेंट मालवाहतुकीचा वाटा मालवाहतुकीच्या माध्यमातून ६० टक्क्यांहून अधिक उत्पन्नाचा आहे.
मालवाहू गाड्या आणि पॅसेंजर गाड्यांची धावपळ गेल्या ११ वर्षात प्रचंड वाढली असून, देशभरात ३४,००० किलोमीटरहून अधिक नवीन रेल्वेमार्ग टाकण्यात आले आहेत.
रेल्वे प्रवासी वाहतुकीतूनही मोठी कमाई करते. यामध्ये लांब पल्ल्याच्या गाड्या, उपनगरीय गाड्या आणि विशेष गाड्यांचा समावेश होतो. यामध्ये राजधानी एक्सप्रेस सारख्या गाड्यांचा मोठा वाटा आहे.
याव्यतिरिक्त, रेल्वे जाहिराती, पार्सल सेवा आणि रेल्वे स्थानकांवरील व्यावसायिक जागांच्या भाड्यांमधूनही कमाई करते. भारतीय रेल्वेची मालवाहतूक ही अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो.