सरकार महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांना झटका देणार, जनतेवर पडणार टोल दरवाढीचा बोजा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2023 10:54 AM2023-03-06T10:54:48+5:302023-03-06T11:02:00+5:30

मासिक पासचेही शुल्क वाढणार

केंद्र सरकारने देशभरात राष्ट्रीय महामार्ग तसेच एक्स्प्रेसवेचे जाळे उभारण्याचे काम हाती घेतले आहे. अनेक राज्यांमध्ये ही कामे पूर्ण झाली असून त्यावरून वाहने सुसाट धावू लागली आहेत.

आता सरकार या मार्गांवरून प्रवास करणाऱ्यांना झटका देणार आहे. महामार्ग तसेच द्रुतगती मार्गांवरील टाेलच्या रकमेत ५ ते १० टक्के वाढ हाेण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) तसा प्रस्ताव सादर केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

राष्ट्रीय महामार्ग शुल्क नियमांनुसार टाेलमध्ये दरवर्षी फेररचना केली जाते. सुधारित दर १ एप्रिलपासून लागू करण्यात येतात. त्यासाठी केंद्रीय परिवहन मंत्रालय या महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात निर्णय घेणार आहे.

दरवाढीच्या प्रस्तावाला ग्रीन सिग्नल दिल्यास, नवीन टोल दर १ एप्रिल २०२३ पासून लागू होतील. नुकत्याच सुरू झालेल्या दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेच्या पहिल्या टप्प्यात सध्या २.१९ रुपये प्रतिकिलाेमीटर असा टाेलचा दर आहे. दरराेज सरासरी २० हजार वाहने त्यावरुन धावतात. त्यावरील टाेलमध्येही वाढ करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कारसारख्या हलक्या वाहनांसाठी ५ टक्के तर ट्रक आणि बस यांसारख्या अवजड वाहनांसाठी १० टक्के टोल दरात वाढ करण्याचा प्रस्ताव परिवहन मंत्रालयाला पाठविण्यात आला आहे.

केंद्र सरकारने नवे आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी १० लाख कोटी रुपयांच्या भांडवली खर्चाची तरतूद केली आहे. अलीकडेच सरकारने दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गाचा पहिला टप्पा सुरू केला.

हा एक्स्प्रेस वे जगातील सर्वात लांब एक्स्प्रेस वेपैकी एक आहे. यामुळे दिल्ली ते मुंबई दरम्यानचा प्रवास २४ तासांवरून १२ तासांवर येईल. याशिवाय सरकार देशात सातत्याने रस्त्यांचे जाळे वाढवत आहे.

टाेल नाक्याच्या २० किलाेमीटर परिक्षेत्रात राहणाऱ्यांना देण्यात येणाऱ्या मासिक पासच्या रकमेतही २० टक्के वाढ हाेण्याची शक्यता आहे. या परिसरात राहणाऱ्यांना सध्या दरमहा ३१५ रुपयांचा अनलिमिटेड मासिक पास देण्यात येताे.