TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2025 11:05 IST2025-04-27T11:03:47+5:302025-04-27T11:05:21+5:30
IT Companies Increment Hiring : देशातील सर्वात मोठ्या रोजगार देणाऱ्या आयटी कंपन्यांवर मोठा दबाव आहे. परिस्थिती अशी झाली आहे की यावर्षी कोणतीही कंपनी पगार वाढवण्यास तयार नाही. टीसीएस, एचसीएल, विप्रो या सर्वांची वेतनवाढीबाबत सारखीच परिस्थिती आहे.

ट्रम्प टॅरिफची देशातील आयटी कंपन्यांनी धास्ती घेतली आहे. कारण, बहुतेक आयटी कंपन्या अमेरिका आणि युरोपियन राष्ट्रांना सेवा देतात. याचा परिणाम त्यांच्या तिमाही निकालांवरही दिसून येतो. यामुळेच टीसीएस, इन्फोसिस, एचसीएल आणि विप्रो सारख्या आघाडीच्या टीसीएस कंपन्यांनी पगारवाढीबाबत कठोर निर्णय घेतला आहे.
टीसीएसने एप्रिलमध्ये कोणतीही वेतनवाढ होणार नसल्याचे स्पष्ट आहे. पण, देशातील या सर्वात मोठ्या आयटी कंपनीने चालू आर्थिक वर्षातही सुमारे ४२ हजार प्रशिक्षणार्थींना नोकरीवर घेण्याची योजना आखली आहे.
टीसीएसने ३१ मार्चपर्यंत त्यांचे कर्मचारी नोकरी सोडण्याचा दर १३.३ टक्के असल्याचे सांगितले. तर दुसरीकडे ६,४३३ नवीन कर्मचारी कंपनीत जॉईन झाले आहेत. आता टीसीएसमध्ये ६,०७,९७९ कर्मचारी काम करतात. कंपनीने अद्याप कर्मचाऱ्यांच्या कपातीबद्दल काहीही सांगितलेले नाही.
इन्फोसिसचे सीएफओ जयेश संघराजका यांनी अलीकडेच २०,००० फ्रेशर्सची भरती करण्याची घोषणा केली होती. गेल्या आर्थिक वर्षात कंपनीने ६,३८८ नवीन कर्मचाऱ्यांना कमावर घेतले. आता ही संख्या ३,२३,५७८ झाली आहे. कंपनीने जानेवारीमध्ये काही कर्मचाऱ्यांना पगारवाढ दिली, तर उर्वरित कर्मचाऱ्यांचे पगार एप्रिलपासून वाढवले जातील असे म्हटले आहे.
कंपनीने म्हटले आहे की बहुतेक कर्मचाऱ्यांच्या पगारात ५ ते ८ टक्के वाढ केली जाईल, तर सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारात १० ते १२ टक्के वाढ केली जाईल. कंपनी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रमाण इन्फोसिसमध्ये १४.१ टक्के आहे.
भारतीय आयटी कंपनी विप्रोने गेल्या आर्थिक वर्षात १२ हजार फ्रेशर्सना नोकरी देण्याची घोषणा केली होती. प्रत्यक्षात फक्त ६१२ नवीन कर्मचाऱ्यांची भरती केली. पण, कंपनीतील एकूण कर्मचाऱ्यांची संख्या २,३३,३४६ झाली आहे. नोकरी सोडण्याचा दर इथे १५.३ टक्के आहे.
विप्रोनेही यावर्षी पगारवाढीबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. कंपनीच्या एचआरचे म्हणणे आहे की सप्टेंबरच्या आसपास वेतनवाढ केली जाऊ शकते.
आयटी कंपनी एचसीएलने मार्च तिमाहीत २,६६५ कर्मचाऱ्यांची भरती केली, जी मागील वर्षाच्या तुलनेत कमी आहे. कंपनीने गेल्या आर्थिक वर्षात ७,८२९ फ्रेशर्सनाही कामावर घेतलं असून एकूण कर्मचाऱ्यांची संख्या २,२३,४२० वर पोहोचली आहे.
इतर आयटी कंपन्यांप्रमाणे, एचसीएलने देखील पगारवाढ आणि भरतीबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही.