याला म्हणतात रिटर्न! TATA ग्रुपच्या ‘या’ कंपनीची कमाल; गुंतवणूकदारांचे केले १ लाखाचे ८७ लाख

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 08:09 AM2021-07-26T08:09:56+5:302021-07-26T08:14:17+5:30

TATA ग्रुपच्या एका कंपनीने जबरदस्त कामगिरी करत गुंतवणूकदारांना मालामाल केल्याचे पाहायला मिळत आहे.

Ratan Tata यांच्या TATA समूहातील अनेक कंपन्या शेअर मार्केटमध्ये लिस्टेड आहेत आणि चांगले रिटर्न्स देत आहे. आताच्या घडीला शेअर बाजाराची विक्रमी घोडदौड सुरू असल्याचे दिसत आहे.

चालु आर्थिक वर्षांच्या सुरुवातीपासून अनेक नवीन कंपन्यांचे IPO बाजारात येऊन धडकले आहे. त्यातील झोमॅटोसारख्या काही कंपन्यांनी एन्ट्री घेताच गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे.

कोरोनाच्या काळातही अनेक क्षेत्रातील कंपन्यांची परिस्थिती बिकट असताना, काही क्षेत्रातील कंपन्यांनी न भूतो असा नफाही कमावल्याचे पाहायला मिळत आहे. TATA ग्रुपच्या एका कंपनीने जबरदस्त कामगिरी करत गुंतवणूकदारांना मालामाल केल्याचे पाहायला मिळत आहे.

वास्तविक शेअर बाजारात केलेली गुंतवणूक ही रिस्की किंवा जोखमीची मानली जाते. मात्र, काही अशा कंपन्या आहेत, ज्या गुंतवणूकदारांच्या विश्वासाला पात्र ठरत सातत्य आणि कामगिरीच्या जोरावर उत्तम रिटर्न देत असतात. त्यातील एक म्हणजे Tata ग्रुपमधील Trent Limited.

Tata ग्रुपच्या Trent Limited कंपनीने आतापर्यंत गुंतवणूकदारांना ८ हजार ७०० टक्क्यांचा परतावा दिला आहे. यामुळे कंपनीत गुंतवणूक केलेल्यांची चांदी झाल्याचे पाहायला मिळत आहे. ज्या गुंतवणूकदारांनी १ लाख रुपये गुंतवले असतील, त्यांचे आता ८७ लाख रुपये झाले, असे सांगितले जात आहे.

गेल्या २२ वर्षांच्या कारकीर्दीत कंपनीने ही कमाल करून दाखवली आहे. या कंपनीची आर्थिक स्थिती नियमितपणे आणि सातत्याने उत्तम राहिलेली आहे. गेल्या वर्षभरात कंपनीने गुंतवणूकदारांना ४५ टक्के परतावा दिला आहे. तर गेल्या ६ महिन्यांचा विचार केल्यास तो ३१ टक्के असल्याचे सांगितले जात आहे.

टाटा ग्रुपच्या Trent Limited ही कंपनी सन १९९९ मध्ये शेअर मार्केटमध्ये लिस्टेड झाली होती. तेव्हा या कंपनीच्या एका शेअरची किंमत १० रुपये होती. २३ जुलै २०२१ रोजी शेअर बाजारात या कंपनीच्या शेअरची किंमत ८९३.५० रुपये होती.

याचाच अर्थ गेल्या २२ वर्षांत कंपनीने ८ हजार ७०० टक्के परतावा दिल्याचे सांगितले जात आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून TATA ग्रुप अनेकविध क्षेत्रात विस्तार करत आहे. अलीकडेच फार्मा क्षेत्रात ग्रुपने गुंतवणूक वाढवली असून, रिटेल क्षेत्रातही टाटा उडी घेत असल्याचे दिसत आहे.

सन २०१८ मध्ये ठाण्यातील अर्जुन देशपांडे या तरुणाने Generic Aadhaar च्या स्टार्टअपची संकल्पना मांडली होती. ही संकल्पना उद्योगपती रतन टाटा यांना भावली. त्यामुळेच रतन टाटा यांनी Generic Aadhaar कंपनीत मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे.

Generic Aadhaar जवळपास ७०० ते १००० प्रकारच्या जेनेरिक औषधांची विक्री करते. संपूर्ण देशभरात ३० हजार रिटेल आऊटलेट उघडण्याचे लक्ष्य कंपनीने डोळ्यांसमोर ठेवले आहे. प्रत्येक शहरात कंपनीची १०० दुकाने असतील, अशी योजना आहे. देशातील १८ राज्यांमध्ये Generic Aadhaar च्या फ्रेंचायजी सुरू झाल्या आहेत.

दुसरीकडे, अलीकडेच टाटा समूहाने 1MG कंपनीच्या शेअर्समधील मोठा हिस्सा खरेदी केला आहे. फार्मसीसंबंधी कोणताही बिझनेस कुठेही सुरु केला, तरी हमखास उद्योग चालतो, असे तज्ज्ञांकडून सांगितले जाते.

ई फार्मसी 1MG मध्ये बहुतेक शेअर्स हे सध्या टाटा डिजीटलकडे आहेत. 1MG सध्या देशाच्या कानाकोपऱ्यात आपला विस्तार करत असून, कंपनीच्या फ्रँचायजीसाठी रांगा लागत आहेत. टाटा ग्रुपने यासाठी ‘सेहत के साथी’ नावाचा प्रोग्राम लॉंच केला आहे.