Systematic Investment Plan: ५० हजारांच्या एसआयपीनं खरेदी करू शकता मर्सिडिज बेंझ, जाणून घ्या किती लागेल वेळ?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2022 03:47 PM2022-11-28T15:47:51+5:302022-11-28T15:55:36+5:30

Systematic Investment Plan: एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याकडे आजकाल लोकांचा कल वाढला आहे.

एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्याबाबत लोकांमध्ये जागरूकता वाढली आहे. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक योजना एसआयपीबद्दल गुंतवणूकदारांच्या जागरूकतेमुळे उत्पन्न वाढले आहे. भविष्याचा विचार करता सध्या गुंतवणूक ही अनिवार्यच झाली आहे.

परंतु याचा भारतातील लक्झरी कारच्या विक्रीवर विपरित परिणाम होत आहे, असे मर्सिडीज इंडिया ऑपरेशन्सच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने म्हटले आहे. तुम्ही SIP द्वारे दरमहा 50,000 रुपये गुंतवल्यास, तुम्हाला मर्सिडीज बेंझ कार खरेदी करण्यासाठी किती वेळ लागेल? चला समजून घेऊया.

एसआयपी म्हणजे म्युच्युअल फंडामध्ये ठराविक कालावधीत गुंतवणूक करणे. याद्वारे तुम्ही साप्ताहिक, मासिक किंवा त्रैमासिक अंतराने गुंतवणूक करू शकता. चांगली गोष्ट म्हणजे यामध्ये तुम्ही फक्त 500 रुपयांपासून सुरुवात करू शकता. बाजारात अशा अनेक योजना आहेत ज्या SIP द्वारे गुंतवणुकीवर वेगवेगळे व्याज देतात.

सर्वप्रथम, आपल्याला मर्सिडीज बेंझ सी क्लासची किंमत जाणून घेणे आवश्यक आहे. मर्सिडीज-बेंझ सी क्लास 1496 cc इंजिनसह पेट्रोल व्हर्जनमध्ये येते आणि त्याची सध्याची एक्स-शोरूम किंमत 55 लाख रुपये आहे. पण, ही कार जेव्हा विकत घ्याल तेव्हा त्यावर तिच्या किमतीत 5.75 लाखांचे रजिस्ट्रेशन, 2.25 लाखांचा विमा प्रीमियम, आणि 55,000 हजारांच्या टॅक्सचा समावेश असेल. अशा प्रकारे, या कारची दिल्लीतील ऑन रोड किंमत 64 लाख रुपये असेल.

जर तुम्ही ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि म्युच्युअल फंड SIP द्वारे दरमहा 50,000 रुपये गुंतवले तर तुम्ही 7 वर्षांत मर्सिडीज बेंझ 64 लाख रुपयांना खरेदी करू शकता. इक्विटी म्युच्युअल फंड SIP मध्ये 12 टक्क्यांचे रिटर्न मिळत आहे असे जेव्हा गृहित धराल तेव्हा हे शक्य होईल.

परंतु आपण येथे सर्वात महत्त्वाची गोष्ट विचारात घेतली पाहिजे ती म्हणजे महागाई. महागाईमुळे मर्सिडीज-बेंझ सी-क्लासच्या किमती पुढील सात वर्षांत वाढू शकतात. त्यामुळे 7 वर्षांच्या अखेरीस तुम्हाला 50,000 गुंतवून तेच मॉडेल खरेदी करणे कठीणही होण्याची शक्यता आहे.

प्लॅन रुपी इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेसचे संस्थापक अमोल जोशी म्हणाले की, 12 CAGR वर सात वर्षांसाठी दरमहा 50,000 रुपये SIP केल्याने 65 लाख रुपयांचा निधी तयार होईल. पण, लक्झरी कारच्या किमतीही वाढण्याची शक्यता आहे. कारची किंमत महागाई 5 टक्के असेल तर 7 वर्षांत किंमत 90 लाख रुपयांच्या जवळपास असेल. हा खर्च पूर्ण करण्यासाठी, तुमची SIP दरमहा 50,000 रुपयांऐवजी 70,000 रुपये प्रति महिना असायला हवी.

सर्टिफाइड फायनान्शियल प्लॅनर आणि प्लॅन अहेड वेल्थ अॅडव्हायझर्सचे संस्थापक विशाल धवन म्हणाले की, तुम्ही उच्च मूल्याची संपत्ती खरेदी करण्याचा विचार करत असताना त्याची किंमत तसेच देखभाल खर्चावर महागाई लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही उच्च मूल्याची संपत्ती खरेदी करण्यासाठी गुंतवणूक करत असाल, तेव्हा तेही लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

इतर कोणत्याही कारप्रमाणे लक्झरी कारची किंमतही कालांतराने कमीच होणार आहे. लक्झरी कार ही एक स्टेटसची बाब आहे. अशा गुंतवणूकीसाठी कमिटमेंटची आवश्यकताही असेल. तज्ज्ञ म्हणतात की अन्य आर्थिक गरजा जसं की सेवानिवृत्ती नंतर लागणारा फंड, घरांतील खर्च, मुलांचं शिक्षण, लग्न, आरोग्याचा खर्च यांकडे पाहिल्यानंतरच कोणत्याही प्रकारची महागडी खरेदी केली पाहिजे.