Success Story: अगणित संपत्तीचे मालक, देतात 'रॉयल' एक्सपिरिअन्स; उभं केलंय १ लाख कोटींचं साम्राज्य

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 09:56 AM2024-06-11T09:56:53+5:302024-06-11T10:07:24+5:30

Success Story: दूरदृष्टी, कठोर मेहनत आणि त्यांच्या यशासाठी विक्रम लाल यांचं नाव परिचित आहे. त्यांनी आयशर मोटर्सला नव्या उंचीवर तर नेलंच, पण देशाच्या विकासातही मोलाचं योगदान दिलं.

Success Story Royal Enfield : भारतीय इंडस्ट्रीमध्ये लाल कुटुंबीय हे यश आणि प्रेरणेचं प्रतीक आहेत. विक्रम लाल हे या कुटुंबाचे प्रमुख आहेत. दूरदृष्टी, कठोर मेहनत आणि त्यांच्या यशासाठी त्यांचं नाव परिचित आहे. त्यांनी आयशर मोटर्सला नव्या उंचीवर तर नेलंच, पण देशाच्या विकासातही मोलाचं योगदान दिलं.

आयशर मोटरची सर्वात प्रसिद्ध कामगिरी म्हणजे रॉयल एनफिल्ड (Royal Enfield). ही शाही सवारी जगातील सर्वात जुनी मोटारसायकल कंपनी म्हणून ओळखली जाते. विक्रम लाल यांच्या यशाची कहाणी आज आपण जाणून घेऊया.

विक्रम लाल यांचा जन्म १९४२ मध्ये झाला. त्यांनी जर्मनीतील टेक्निशे युनिव्हर्सिटी डार्मस्टॅट येथून मेकॅनिकल इंजिनीअरिंगचं शिक्षण घेतलं. विक्रम लाल १९६६ मध्ये आयशर इंडियामध्ये रुजू झाले. या कंपनीचा पाया त्यांच्या वडिलांनी घातला होता. १९५९ मध्ये कंपनीने जर्मन भागीदारासह ट्रॅक्टरचे उत्पादन सुरू केलं.

१९८६ मध्ये आयशर मोटर्सनं हलक्या व्यावसायिक वाहनांची निर्मिती सुरू केली. हे कंपनीसाठी महत्त्वाचं ठरलं. पुढे आयशर मोटर्सनं अवजड वाहनं बाजारात आणून भारताच्या व्यावसायिक वाहन बाजारपेठेत आपलं स्थान निर्माण केलं.

आयशर मोटर्स रॉयल एनफिल्ड बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे. ही जगातील सर्वात जुनी आणि सातत्यानं तयार होणारी मोटारसायकल म्हणून ओळखली जाते. या बाईकच्या लूकसाठी अनेक पिढ्यांपासून त्याचं कौतुक केलं जात आहे. फोर्ब्सनुसार, विक्रम लाल यांची नेटवर्थ जवळपास ८.१ अब्ज डॉलर (६८,४४२ कोटी रुपये) आहे. आयशर मोटर्सचे बाजार भांडवल सध्या १,००,००० कोटी रुपयांहून अधिक आहे. विक्रम लाल हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत.

विक्रम लाल यांच्या पत्नी अनिता लाल या गुड अर्थच्या संस्थापक आहेत. ही लक्झरी घर आणि कपड्यांच्या दुकानांची चेन आहे, जी त्याच्या डिझाइन आणि कारागिरीसाठी प्रसिद्ध आहे. सध्या त्यांची मुलगी सिमरन लाल या गुड अर्थच्या सीईओ म्हणून कार्यरत आहेत. कला आणि संस्कृतीबद्दलची त्यांची आवड गुड अर्थच्या विविध उत्पादनांमध्ये दिसून येते. निकोबार नावाचा लाइफस्टाइल ब्रँडही त्यांनी स्थापन केलाय.

विक्रम आणि अनिता यांचा मुलगा सिद्धार्थ लाल यांनी आयशर मोटर्सच्या प्रवासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. माजी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि विद्यमान व्यवस्थापकीय संचालक म्हणून सिद्धार्थ यांनी रॉयल एनफिल्डचं पुनरुज्जीवन केलं आणि त्याला मोटारसायकल जायंटमध्ये रूपांतरित केलं.

यामुळे मार्च २०२२-२३ या आर्थिक वर्षात ८,००,००० हून अधिक वाहनांची विक्री झाली. आयशर मोटर्स व्यतिरिक्त, सिद्धार्थ व्हीई कमर्शियल व्हेइकलसह इतर समूह युनिट्समध्ये वरिष्ठ नेतृत्व पदांवर आहेत.