"...तेव्हा YouTube नं माझ्या खात्यात २ लाख १४ हजार पाठवले"; मराठी तरुणाची यशोगाथा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2023 02:43 PM2023-11-26T14:43:13+5:302023-11-26T14:46:36+5:30

नोकरी करत करत काहीतरी स्वत:चे करावे असा विचार अनेकांच्या मनात असतो. परंतु घरचे दडपण, जबाबदाऱ्या यातून कुणीही सहजासहजी रिस्क घ्यायला तयार नसते. कंपनीनं एखाद्याला लंडनला जॉब करण्याची ऑफर दिली आणि ते न स्वीकारून कुणी राजीनामा दिला तर तुम्ही काय विचार कराल? होय, हाच विचार त्याच्या घरच्यांनीही केला. परंतु त्याने हार मानली नाही. आज आपण अशाच एका तरुणाबद्दल जाणून घेणार आहोत ज्याने युट्यूबच्या विश्वास स्वत:चे नावलौकीक केले.

या मराठी तरुणाचे नाव आहे मंगेश शिंदे, मूळचं संभाजीनगर इथं राहायला असलेले कुटुंब पुण्यात शिफ्ट झाले. त्याठिकाणी मंगेशला भरपूर गोष्टी नव्याने शिकायला मिळाल्या. घरचे सगळे नोकरी करणारे, त्यामुळे बिझनेस याचा विचार कुणी केला नव्हता. पण मंगेशच्या मनात बिझनेसबद्दल कुतूहल निर्माण झाले. बिझनेसबाबत विचार करताना धीरूभाई अंबानी यांचं पुस्तक वाचून मंगेशला प्रेरणा मिळाली. त्यातून मंगेशने त्याच्या ध्येयाचा शोध घेणे सुरू केले.

बिझनेस करण्यासाठी भांडवल लागते, ते घरातून मिळणे शक्य नव्हते. पण स्वत:च्या हिंमतीवर तू उभा राहा असं मंगेशला वडिलांनी स्पष्ट केले. बिझनेससाठी पैसे लागतात मग हे पैसे कुठून येणार हा विचार मंगेशच्या डोक्यात आला. कॉलेज शिक्षण घेत घेत अनेक प्रयत्न केला, पण अपयश आले. परंतु युट्यूबमधून पैसे मिळतात हे मंगेशला एकाने सांगितले. इंजिनिअरच्या तिसऱ्या वर्षाला असताना मंगेशने यु्ट्यूब सुरू केले. पण काही काळाने ते चॅनेल ब्लॉक झाले.

इंजिनिअर पूर्ण झाल्यावर जॉब लागला. अनेकांनी मला तेव्हा टोमणे मारले. यूके बेस कंपनीत मला चांगला स्कोप मिळाला. १४ महिन्यांच्या काळात मी १३० कंपनी फिरलो. तिथे भरपूर आयडिया मिळाल्या. कम्युनिकेशन चांगले झाले. पण बिझनेसचा विचार डोक्यातून जात नव्हता. जॉब कल्चरमध्ये रुळलो तर बाहेर पडणे कठीण होईल असं मंगेशला वाटले. त्याचवेळी कंपनीकडून मंगेशला लंडनला जॉब करण्याची ऑफर मिळाली. परंतु त्यासाठी बॉन्ड केला जाणार होता. त्यावेळी घरच्यांना न सांगताच मंगेशने कंपनीचा राजीनामा दिला.

याच काळात युट्यूबवर पुन्हा चॅनेल उभे केले. त्यावर काम करणे सुरू केले. ९ ते साडे सहा जॉब करून उर्वरित वेळेत मी युट्यूबवर काम करायचो. तिथे सातत्य ठेवले. १० जुलै २०१९ ला मी एक व्हिडिओ अपलोड केला. माझे २७ हजार सब्स्क्राईबर होते. मी नाशिकला एका कामासाठी गेलो होतो. दिवसभर मोबाईल हातात नव्हता. पण जेव्हा पाहिला तेव्हा माझ्या अकाऊंटवर ६० हजार सब्स्क्राईबर आणि त्या व्हिडिओला दीड लाख व्ह्यूज मिळाले होते.या व्हिडिओ मला चांगला रिस्पॉन्स दिला.त्यानंतर मी सातत्याने व्हिडिओवर काम करायला लागलो.

युट्यूबवर मी मोटिवेशनल सीरीज लॉन्च केली, ती कॅटेगिरी बरीच फेमस झाली. मी त्या कॅटेगिरीत जे काही कंटेन्ट पोस्ट करायचो त्याला २०-३० लाख व्ह्यूज मिळायचे. अचानक बूस्ट मिळाल्याने एक दीड महिन्यात मला ७-८ लाख सब्स्क्राईबर झाले.पण यातून किती पैसे मिळणार हे मला माहिती नव्हते. परंतु माझे अकाऊंट युट्यूबला लिंक होते. १ दिवस अचानक मी पाहिले तेव्हा माझ्या अकाऊंटला २ लाख १४ हजार क्रेडिट झाले होते असा अनुभव मंगेशने सांगितला.

या काळात मला एका कंपनीकडून ईमेल आला. माझा चॅनेल चांगला ग्रो करतोय, तर आम्हाला आमचे प्रोडक्ट प्रमोट करण्यासाठी तुमच्याशी बोलायचे आहे. मला त्यांनी चार्ज विचारले, पण मला काहीच कल्पना नव्हती. मला त्यांचा कॉल आला, त्यांनी मला १० व्हिडिओसाठी ४० हजार आगाऊ रक्कम दिली. मग युट्यूब मार्केट काय आहे हे रिसर्च करायला लागलो. एका व्हिडिओला ४ हजार मिळाले, पण मार्केटमध्ये एका व्हिडिओला ५० हजार द्यायलाही लोक तयार होते. त्यानंतर मी याचमाध्यमातून अनेक स्टार्टअप केले, त्यात जे क्रिएटर आहेत त्यांना संधी दिली. त्यांना हे मार्केट समजावून सांगितले असं मंगेशने म्हटलं.

मंगेश त्याच्या अनुभवाबद्दल सांगताना म्हणाला की, मी युट्यूबमधून पैसे कमावत होतो, पण घरच्यांना ते माहिती नव्हते. हा पैसा कुठून येतोय हे त्यांना कळत नव्हते. मी जॉब सोडला म्हणून घरचे खूप नाराज होते. माझ्याशी ३ महिने बोललेही नाहीत. यु्ट्यूब हे त्यांना समजत नव्हते. पण २०२२ मध्ये माझा संदीप माहेश्वरी यांच्यासोबत व्हिडिओ आला. तो माझ्या वडिल्यांच्या कंपनीतील मॅनेजरने पाहिला तेव्हा वडिलांना कळाले. मुलगा काहीतरी करतोय हे घरच्यांना कळाले.त्यानंतर घरच्यांचा पाठिंबा वाढला.

दरम्यान, मला आधीपासून शिकण्याची आवड आहे. रोज काहीतरी नवनवीन शिकायला आवडते. आजही दिवसाला दोन ते अडीच तास मी स्वत:ला काहीतरी शिकायला मिळेल यासाठी खर्च करतो. ज्ञान जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करतो त्यातून कंटेन्टसाठी आयडिया मिळते. कम्युनिकेशन चांगले असेल तर कुठेही काही करू शकतो.मराठी माध्यमातून शिकल्याने इंग्रजी फारसं काही येत नव्हते. त्या वाढवण्यासाठी माझा फोकस होता.

मंगेश शिंदे हा एक यशस्वी युट्यूबर असून तो चॅनेलच्या माध्यमातून इन्फोटेनमेंट कंटेन्ट बनवत असतो. ज्यामध्ये बिझनेस, स्टार्टअप, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, आत्मपरिक्षण, यशोगाथा आणि बऱ्याच गोष्टी तो शेअर करत असतो. त्याच्या व्हिडिओला लाखोंनी व्ह्यूज मिळतात आणि त्यातूनच तो चांगली कमाई करतो.