Success Story : २२ व्या वर्षी सुरू केला व्यवसाय, ४ वर्षांत ‘अशी’ उभी केली ६०० कोटींची कंपनी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2023 08:40 AM2023-11-27T08:40:10+5:302023-11-27T09:11:59+5:30

शिक्षण पूर्ण केल्यानंतर जिकडे तरुण जॉब शोधतात तिकडे सागर गुप्ता यांनी आपला व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला.

आपलं कॉलेजचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर बहुतांश तरुण जिथे नोकरीच्या शोधात असतात, तिथे एका तरुणानं आपल्या मेहनतीच्या जोरावर कोट्यवधी रुपयांची कंपनी उभी केली आहे. देशात असे अनेक तरुण उद्योजक आहेत ज्यांनी अल्पावधीतच आपल्या व्यवसायानं आणि कमाईनं लोकांना चकितही केलंय. या यादीत नोएडाच्या सागर गुप्ता यांचंही नाव आहे. या तरुण उद्योजकानं आपल्या वडिलांसह अवघ्या ४ वर्षात कोट्यवधी रुपयांचं व्यवसायाचं साम्राज्य उभं केलं.

सागर गुप्ता यांनी बी.कॉम केल्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग व्यवसायात हात आजमावला. सागर यांनी २०१७ मध्ये वडिलांसोबत एक्का इलेक्ट्रॉनिक्सची सुरुवात केली. अवघ्या ४ वर्षात सागर गुप्ता यांनी एक्का इलेक्ट्रॉनिक्सचा व्यवसाय ६०० कोटींवर नेला आहे. सागर यांनी इतकं यश कसं मिळवलं ते आपण जाणून घेऊ.

एक्का इलेक्ट्रॉनिक्सचे (Ekkaa Electronics) सागर गुप्ता यांना ना व्यवसायाचा अनुभव आहे, ना ते एका व्यावसायिक कुटुंबातील आहेत. सागर यांचा आपल्या उत्पादनावर आणि मेहनतीवर विश्वास होता. त्यांनी आपल्या वडिलांसोबत आपल्या व्यवसायाचं साम्राज्य उभं केलं.

सागर गुप्ता यांच्या एक्का इलेक्ट्रॉनिक्सनं नोएडामध्ये नवीन फॅसिलिटी उभारण्यासाठी ३ वर्षात ₹१००० कोटी गुंतवण्याचा निर्णय घेतला आहे. आता कंपनी वॉशिंग मशिन, स्मार्ट वॉच, इअर फोन, हेडफोन आणि ट्रू वायरलेस स्टिरिओ यांसारख्या उत्पादनांची निर्मिती करण्यासाठी एक नवीन प्लांट उभारणार आहे.

आपल्या मुलानं चार्टर्ड अकाउंटंट व्हावं, अशी सागर गुप्ता यांच्या वडिलांची इच्छा होती. सागरनं सीएच्या तयारीसाठी कोचिंग सुरू केलं. सागरनं दिल्ली युनिव्हर्सिटीच्या श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्समधून बीकॉमची पदवीही मिळवली.

पण नंतर २०१७ मध्ये त्यांनी मॅन्युफॅक्चरिंग व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला. शिक्षण पूर्ण केल्यानंतर, सागर यांनी त्यांच्या वडिलांसोबत एलईडी टेलिव्हिजन युनिट एक्का इलेक्ट्रॉनिक्सची स्थापना करण्याचा निर्णय घेतला.

सागरचे वडील गेल्या तीन दशकांपासून सेमीकंडक्टरचं ट्रेडिंग करत होते. सागर गुप्ता यांना त्यांच्या वडिलांच्या अनुभवाचा फायदा झाला आणि त्यांचा एक्का इलेक्ट्रॉनिक्सच्या एलईडी टेलिव्हिजन व्यवसायाला गती मिळाली. वडिलांच्या मदतीने, सागर यांनी एलईडी टीव्ही विकण्यासाठी संपर्क तयार केले आणि हळूहळू त्यांनी सॅमसंग, तोशिबा आणि सोनी इत्यादी ब्रँडसाठी एलईडी टीव्ही तयार करण्यास सुरुवात केली.

सागरची कंपनी एक्का आज शंभरहून अधिक कंपन्यांना एलईडी टीव्ही पुरवते. एक्का इलेक्ट्रॉनिक्सचा उत्पादन प्रकल्प हरयाणातील सेनीपत येथे आहे.