महाशय धर्मपाल गुलाटी : 1500 रुपये घेऊन भारतात आले, टांगा चलवला अन् उभं केलं अब्जावधींचं मसाला साम्राज्य

By श्रीकृष्ण अंकुश | Published: December 3, 2020 12:38 PM2020-12-03T12:38:41+5:302020-12-03T12:49:33+5:30

मसाला किंग म्हणून ओळख असलेले एमडीएच ग्रुपचे सर्वेसर्वा महाशय धर्मपाल गुलाटी यांचे निधन झाले आहे. 98 वर्षीय महाशय धर्मपाल हे आजारी असल्याने गेल्या काही दिवसांपासून दिल्ली येथील माता चन्नन रुग्णालयात दाखल होते.

महाशय धर्मपाल हे देशाच्या फाळणीनंतर भारतात आले होते. त्यांनी येथे टांगा चालवत उदरनिर्वाहाला सुरुवात केली आणि पाहता पाहता त्यांनी मसाल्याचे साम्राज्य उभे केले. त्यांना पद्मभूषण देऊनही सन्मानित करण्यात आले आहे.

महाशय धर्मपाल यांचा जन्म 27 मार्च, 1923 रोजी सियालकोट येथे झाला होता. सियालकोट आता पाकिस्तानात आहे. (Photo-MDH website)

1933मध्ये, त्यांनी 5वीपर्यंतचे शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच शाळा सोडली. 1937 मध्ये, आपल्या वडिलांच्या मदतीने त्यांनी व्यापाराला सुरुवात केली. त्यांनी साबन, सुतार काम, कापड, हार्डवेअर, तांदळाचा व्यापारही केला.

महेशियां दी हट्टीमध्ये काम - मात्र, ते फार काळ ही कामे करू शकले नाही आणि त्यांनी आपल्या वडिलांसोबत व्यापाराला सुरुवात केली. त्यांनी आपल्या वडिलांच्या 'महेशियां दी हट्टी' नावाच्या दुकानात काम करायला सुरुवात केली. देगी मिर्च वाले म्हणून त्याची ओळख होती. (Photo-MDH website)

1500 रुपये घेऊन दिल्लीत आले - भारत-पाकिस्तान फाळणीनंतर महाशय गुलाटी दिल्ली येथे आले. 27 सप्टेंबर 1947 रोजी त्यांच्याकडे केवळ 1500 रुपये होते. या पैशांतून त्यांनी 650 रुपयांचा टांगा विकत घेतला. ते नवी दिल्ली रेल्वे स्टेशन ते कुतुब रोडदरम्यान टांगा चालवत होते. (Photo-MDH website)

यानंतर थोड्याच दिवसांत त्यांच्या कुटुंबाकडे दिल्लीतील करोल बागमधील अजमल खाँ रोडवर मसाल्याचे दुकान सुरू करण्या एवढे पैसे जमा झाले. याच दुकानाच्या सहाय्याने त्यांनी पुढचा एवढा मोठा पल्ला गाठला. (Photo-MDH website)

आज गुलाटी यांच्या भारत आणि दुबईमध्ये मसाल्याच्या 18 कंपन्या आहेत. या कंपन्यांतून तयार होणारे MDH मसाले जगभरात पोहोचतात. (Photo-MDH website)

एमडीएचचे एकूण 62 प्रॉडक्ट्स आहेत. विशेष म्हणजे ही कंपनी उत्तर भारतातील 80 टक्के बाजारावर आपले वर्चस्व असल्याचा दावा करते. (Photo-MDH website)

सामाजिक कार्यातही पुढाकार - गुलाटी यांनी व्यापाराबरोबरच समाजासाठी उपयुक्त ठरतील अशीही अनेक कामे केली आहेत. यात रुग्णालय, शाळा आदी कामांचा समावेश होतो. त्यांनी आतापर्यंत 20 पेक्षाही अधिक शाळा सुरू केल्या आहेत. (Photo-MDH website)

स्वतःच करायचे कंपनीची जाहिरात - गुलाटी यांचा हा उद्योग प्रचंड मोठा आहे. ते त्यांच्या वस्तुंची जाहिरात स्वतःच करत होते. साधारणपणे ते टीव्हीवर आपल्या मसाल्यांची माहिती देताना दिसतात. विशेष म्हणजे जगातील सर्वात वयोवृद्ध अॅड स्टार म्हणूनही त्यांना ओळखले जाते.