185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अॅक्शन, व्यवहार बंद!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 19:01 IST2025-12-18T18:51:45+5:302025-12-18T19:01:31+5:30
गुंतवणूकदारांनी या शेअरसंदर्बात सतर्कता बाळगणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे...

सोशल मीडियावर अचानक चर्चेत आलेल्या 'आरआरपी सेमीकंडक्टर लिमिटेड'च्या शेअर्समधील आश्चर्चकारक तेजीची दखल घेत, आता मुंबई शेअर बाजाराने (BSE) त्यावर कडक निर्बंध लादले आहेत. या शेअरला "देखरेखीच्या उपायांमुळे व्यापार प्रतिबंधित" श्रेणीत टाकण्यात आले आहे.

याच बरोबर, हा शेअर 'दीर्घकालीन अतिरिक्त देखरेख आराखड्याच्या' (ASM) स्टेज-१ आणि GSM च्या स्टेज-० मध्ये ठेवण्यात आला आहे. याशिवाय, बीएसईने आपल्या वेबसाईटवर गुंतवणूकदारांसाठी स्पष्ट इशाराही जारी केला आहे.

आरआरपी सेमीकंडक्टरच्या शेअरमध्ये या वर्षात तब्बल ५८८१.११% ची तेजी दिसून आली आहे. १८५ रुपयांचा शेअर तब्बल ११,०९४.९५ रुपयांवर पोहोचला आहे. या शेअरमध्ये शेवटचा व्यवहार १५ डिसेंबरला झाला होता.

विशेष म्हणजे, गेल्या २८९ ट्रेडिंग सत्रांपैकी २८७ सत्रांमध्ये हा शेअर सातत्याने वधारत होता. मात्र, एवढी प्रचंड तेजी असूनही व्यवहारांचे प्रमाण (वॉल्यूम) अत्यंत कमी होते. बहुतांश वेळा हा व्यवहार सिंगल किंवा डबल डिजिटमध्येच मर्यादित राहिला.

या शेअर्सवर आता आठवड्यातून एकदाच ट्रेडिंग करण्याची मुभा असून १% चा प्राईस बँड लावण्यात आला आहे. गेल्या सहा सोमवारपासून हा शेअर सतत १% ने घसरत आहे.

कंपनीच्या ताज्या वार्षिक अहवालानुसार, या संस्थेत केवळ दोनच पूर्णवेळ कर्मचारी कार्यरत आहेत, ही बाब गुंतवणूकदारांच्या भुवया उंचावणारी आहे. तसेच, कंपनीच्या ९० टक्क्यांहून अधिक शेअर्सची मालकी प्रवर्तक राजेंद्र चोडणकर आणि त्यांच्या निकटवर्तीयांकडे आहे. ५२८ किरकोळ गुंतवणूकदारांकडे केवळ १.१२% हिस्सेदारी आहे.

एक्सचेंजची ही कडक पावले आणि असामान्य ट्रेडिंग पॅटर्न पाहता, गुंतवणूकदारांनी या शेअरसंदर्बात सतर्कता बाळगणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)

















