बाजारात हाहाकार, पण क्रोसिन बनवणाऱ्या कंपनीचा शेअर करतोय मालामाल; लागलं २०% चं अप्पर सर्किट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 15:30 IST2025-02-17T15:24:10+5:302025-02-17T15:30:02+5:30

शेअर बाजारात सध्या सातत्याने घसरण होताना दिसत आहे. सोमवारीही बाजारात घसरण दिसून आली. बाजारात घसरण होण्याचे हे सलग नववे सत्र आहे. मात्र असे असतानाच एक शेअर असाही आहे, जो सुसाट सुटला आहे.
हा शेअर एका दिवसात एवढा वधारला की त्याल अप्पर सर्किट लागले. ही कंपनी क्रोसिन टॅबलेट आणि सिरपसह विविध प्रकारच्या औषधींची निर्मिती करते. या कंपनीचे नाव म्हणजे, ग्लॅक्सोस्मिथक्लाइन फार्मास्यूटिकल्स लिमिटेड (GlaxoSmithKline Pharmaceuticals Ltd).
या कंपनीच्या शेअरला सोमवारी २० टक्क्यांचे अप्पर सर्किट लागले. या तेजीनंतर हा शेअर २४२१.३० रुपयांवर पोहोचला. या शेअरमध्ये ही तेजी येण्येचे सर्वात मोठे कारण म्हणजे, या कंपनीला झालेला नफा.
हा शेअर शुक्रवारी २०१७.७५ रुपयांवर बंद झाला होता. तो सोमवारी २२३९.९५ रुपयांच्या वाढीसह खुला झाला. तथापि, नंतर त्यात काहीशी घसरण बघायला मिळाली. तो २०८८.२५ रुपयांवर आला. मात्र, यानंतर तो वधारायला सुरुवात झाली आणि थेट २० टक्क्यांच्या अप्पर सर्किटवरच जाऊन पोहोचला. हा शेअर दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास १५.९१% च्या वाढीसह २,३३९ रुपयांवर होता.
आज यामुळे लागलं अप्पर सर्कीट - कंपनीळा चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत (डिसेंबर तिमाही) मोठा नफा झाला आहे. याचा परिणाम कंपनीच्या शेअर्सवरही दिसून आला, शेअर वधारला. शुक्रवारी बाजार बंद होण्याच्या काही वेळ आधीच कंपनीने डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले होते.
शेअरच्या ६ महिन्यांच्या परफॉर्मन्सचा विचार करता, या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे नुकसानच केले आहे. या कालावधीत या शअरने आपल्या गुंतवणूकदारांचे १९ टक्क्यांहून अधिक नुकसान केले आहे. तसेच आजच्या प्रॉफिट बाजूला केल्यास हे नुकसान आणखी वाढते.
कंपनीला डिसेंबर तिमाहीत २३० कोटी रुपयांचा नफा झाला. जो वार्षिक आधारावर ४०० टक्के एवढा होता. त्याचबरोबर कंपनीच्या महसुलातही वाढ झाली आहे. डिसेंबर तिमाहीत कंपनीचा महसूल १८ टक्क्यांनी वाढून ९४९ कोटी रुपये एवढा झाला आहे.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)