ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीद्वारे पेमेंट सुविधा देणार SBI, कमी खर्चात लवकर करता येणार पैसे ट्रान्सफर!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2021 12:30 PM2021-02-23T12:30:17+5:302021-02-23T13:03:36+5:30

state bank of india tie up with jp morgan for blockchain technology network : जागतिक पातळीवर जवळपास 100 बँका ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी नेटवर्क वापरत आहेत.

नवी दिल्ली : स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) परदेशातील व्यवहारांची गती वाढविण्यासाठी अमेरिकेच्या जेपी मॉर्गनबरोबर (JP Morgan) करार केला आहे. त्याअंतर्गत एसबीआय या अमेरिकन बँकेच्या ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीचा (Blockchain Technology) वापर करणार आहे.

दोन मोठ्या बँकांमधील या करारानंतर एसबीआय ग्राहक पेमेंट टाइम आणि व्यवहाराचा खर्च वाचवू शकतील. याआधी क्रॉस बॉर्डर पेमेंट्स संबंधित चौकशी आणि माहितीसाठी जवळपास एक पंधरवड्या लागत होता. परंतु आता ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीच्या मदतीने तो घटून काही तासांवर जाईल. यामुळे कमी स्टेप्स आणि कमी वेळेत क्रॉस बॉर्डर पेमेंट शक्य होईल.

'अलिकडच्या वर्षांत आम्ही डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनच्या टप्प्यात गेलो आहोत. आमच्या दैनंदिन कामकाजात सुधारणा करण्यासाठी आम्ही यापुढेही नवीन टेक्नॉलॉजीचा समावेश करत राहू', असे एसबीआय इंटरनॅशनल बँकिंग ग्रुपचे उपव्यवस्थापकीय संचालक वेंकटेश नागेश्वकर यांच्या हवाल्यातील एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

'आम्ही या नेटवर्कवर लाइव्ह जाणारी देशातील पहिली बँक बनल्याबद्दल उत्सुक आहोत. आमच्या क्लायंटला अधिक चांगली नेटवर्क सेवा देण्यासाठी आम्ही या अॅप्लिकेशनला एक्सप्लोर करत आहोत. यामुळे जेपी मॉर्गनबरोबरचे आपले संबंध आणखी दृढ होतील', असेही ते म्हणाले.

जेपी मॉर्गनचे म्हणणे आहे की, ते आपल्या ब्लॉकचेनची व्याप्ती भारतात वाढवणार आहे. जेपी मॉर्गन चेस बँक इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि कॉर्पोरेट प्रमुख पी डी सिंग म्हणाले, "आमच्या क्लायंटचा अनुभव चांगला बनवण्यासाठी आम्ही सतत उदयोन्मुख टेक्नॉलॉजीला एक्सप्लोर करत आहोत."

या ग्लोबल बँकेची ही ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी वित्तीय संस्था, कॉर्पोरेट्स आणि वित्तीय कंपन्यांसाठी पीअर-टू-पीअर नेटवर्क आहे. यामुळे युजर्सला आपापसांत जलद, नियंत्रित आणि सुरक्षितपणे डेटा ट्रान्सफर करण्यास अनुमती मिळते.

यामुळे क्रॉस बॉर्डर पेमेंटदरम्यान संभाव्य जोखमीशी सामना करण्यास देखील मदत करते. जागतिक पातळीवर जवळपास100 बँका हे नेटवर्क वापरत आहेत. जेपी मॉर्गनबरोबर इतर बरेच खाजगी आणि सरकारी लेंडर्स देखील या नेटवर्कमध्ये सामील होण्याचा विचार करीत आहेत.

ब्लॉकचेन तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, चीन आणि आफ्रिकेसह जगातील अनेक देशांमधील बँका क्रॉस-बॉर्डर व्यवहारांसाठी ब्लॉकचेन-आधारित क्लीयरन्स सिस्टमचा अवलंब करीत आहेत.

यासह या बँकेची पेमेंट सिस्टम निश्चित केली जात आहे. तसेच कमी खर्चात जलद पेमेंटही केले जात आहे. याचबरोबर, या न्यूज रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, मुंबईतील खासगी क्षेत्रातील दोन मोठ्या बँकांच्या जेपी मोगार्न यांच्याशी चर्चा सुरू आहे.