२५ व्या वर्षी ₹२००० पासून सुरू करा SIP, ६० व्या वर्षी व्हाल २ कोटींचे मालक; 'ही' स्ट्रॅटजी येईल कामी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2024 09:22 AM2024-04-03T09:22:53+5:302024-04-03T09:28:52+5:30

आजच्या काळात गुंतवणूक किती महत्त्वाची आहे हे सर्वांनाच माहीत आहे. यामुळेच लोक कमी वयापासूनच निवृत्तीपर्यंतचं नियोजन करू लागतात.

आजच्या काळात गुंतवणूक किती महत्त्वाची आहे हे सर्वांनाच माहीत आहे. यामुळेच लोक कमी वयापासूनच निवृत्तीपर्यंतचं नियोजन करू लागतात. गुंतवणूक छोटी असो की मोठी यानं काही फरक पडत नाही. तुम्ही थोड्या रकमेतून गुंतवणूक करायला सुरुवात करू शकता.

पण जर तुम्ही वेळोवेळी ही रक्कम थोडी-थोडी वाढवत राहिलात तर काही वर्षांत तुम्ही एवढी रक्कम जोडू शकता की तुम्ही कल्पनाही केली नसेल. आज आम्ही तुम्हाला गुंतवणूकीचा असा फॉर्म्युला सांगत आहोत ज्याचा अवलंब करून तुम्ही तुमच्या वृद्धापकाळात कोट्यवधी रुपयांचा निधी जमा करू शकता आणि आरामाचं जीवन जगू शकता.

हा फॉर्म्युला २५/२/५/३५ आहे. यामध्ये तुम्हाला दीर्घकालीन गुंतवणूकीचं धोरण अवलंबावं लागेल आणि म्युच्युअल फंडामध्ये एसआयपीद्वारे गुंतवणूक करावी लागेल. या फॉर्म्युलानुसार, तुम्हाला वयाच्या २५ व्या वर्षापासून गुंतवणूक सुरू करावी लागणार आहे. २ चा अर्थ किमान २००० रुपयांच्या एसआयपीसह गुंतवणूक सुरू करा. ५ म्हणजे दरवर्षी ५ टक्के रक्कम वाढवा आणि ३५ म्हणजे ही एसआयपी ३५ वर्षांसाठी सुरू ठेवा.

तुम्ही २५ व्या वर्षी २००० रुपयांनी एसआयपी सुरू केली, तर तुम्हाला दरवर्षी ५ टक्के रक्कम वाढवावी लागेल. एसआयपी सुरू केल्यानंतर, तुम्ही एका वर्षासाठी दरमहा २००० रुपये गुंतवले. पुढच्या वर्षी तुम्हाला तुमच्या २००० रुपयांच्या ५ टक्के म्हणजेच फक्त १० रुपये वाढवावे लागतील. अशा प्रकारे तुम्हाला एका वर्षासाठी २१०० रुपयांची एसआयपी चालवावी लागेल.

त्यानंतर त्याच्या पुढील वर्षी २१०० ची रक्कम ५ टक्क्यांनी म्हणजेच १०५ रुपयांनी वाढवा आणि संपूर्ण वर्षासाठी २२०५ रुपयांची SIP चालवा. त्याचप्रमाणे, दरवर्षी तुम्हाला सध्याच्या रकमेच्या ५ टक्के वाढ करावी लागेल. ही गुंतवणूक ३५ वर्षे सुरू राहणार आहे. ३५ वर्षांनी तुम्ही ६० वर्षांचे व्हाल आणि या गुंतवणुकीद्वारे मोठा फंड जमा कराल.

या फॉर्म्युलानुसार तुम्ही ३५ वर्षे गुंतवणूक करत राहिल्यास, एसआयपी कॅल्क्युलेटरनुसार तुम्ही एकूण २१,६७,६८७ रुपयांची गुंतवणूक कराल. एसआयपीवर सरासरी परतावा १२ टक्के मानला जातो. अशा स्थितीत तुम्हाला गुंतवणुकीवर १,७७,७१,५३२ रुपये व्याज मिळेल.

अशाप्रकारे, गुंतवलेली रक्कम आणि व्याजाची रक्कम एकत्र करून तुम्हाला पैसे मिळतील तेव्हा ते १,९९,३९,२२० (सुमारे २ कोटी रुपये) होईल. अशा प्रकारे वयाच्या ६० व्या वर्षी तुम्ही २ कोटी रुपयांचे मालक व्हाल. (टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)