सरकारचा मोठा निर्णय; सॉव्हरेन गोल्‍ड बॉन्ड योजना बंद, आता सोन्यात गुंतवणूक कशी करायची?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 18:21 IST2025-02-05T18:09:54+5:302025-02-05T18:21:51+5:30

Sovereign Gold Bond Scheme : सॉव्हरेन गोल्‍ड बॉन्ड बंद झाल्यामुळे गुंतवणूकदारांसाठी सोने गुंतवणुकीचे चांगले पर्याय संपले आहेत.

Sovereign Gold Bond Scheme: भारतीय रिझर्व्ह बँकेने आपली लोकप्रिय सॉव्हरेन गोल्‍ड बॉन्ड स्‍कीम बंद केली आहे. गेल्या काही वर्षांत सोन्याच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे ही योजना सुरू ठेवणे सरकारला कठीण जात होते. जागतिक बाजारात सोन्याचा भाव प्रति औंस 2,800 रुपयांच्या पुढे गेला आहे. तर, भारतात सोन्याचा भाव 84,900 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​पोहोचला आहे. भविष्यात सोन्याच्या दरात मोठी वाढ होण्याचे संकेत आहेत. ट्रम्प यांच्या दरवाढीच्या निर्णयानंतर सोन्याच्या किमतीत आणखी वाढ होऊ शकते, असे कमोडिटी बाजारातील तज्ज्ञांचे मत आहे.

दुसरीकडे, सॉव्हरेन गोल्‍ड बॉन्ड (SGB) बंद झाल्यामुळे गुंतवणूकदारांसाठी सोने गुंतवणुकीचे चांगले पर्याय संपले आहेत. ही योजना अशी होती की, ज्यात गुंतवणूकदारांना स्वस्तात सोने खरेदी करण्याची संधी होती. आरबीआयच्या वेबसाइटनुसार त्याची मॅच्युरिटी 8 वर्षे होती. SGB ​​वर 2.5% निश्चित व्याज होते. याशिवाय 8 वर्षांत सोन्याची किंमत किती प्रमाणात वाढेल, त्याचाही फायदा होता. SGB ​​अंतर्गत मिळणाऱ्या व्याजावर कर आकारण्यात आला, पण मॅच्युरिटी पूर्ण झाल्यास भांडवली नफा करमुक्त मानला जात असे.

भारत सरकारने 2015 मध्ये ही योजना सुरू केली. आता ही योजना संपल्याने गुंतवणूकदारांना सोन्यात गुंतवणूक करण्याची मोठी संधी संपली आहे. याचा अर्थ आता सॉव्हरेन गोल्‍ड बॉन्डचा कोणताही नवीन हप्ता येणार नाही. आलेले जुने हप्ते मुदतपूर्ती पूर्ण होईपर्यंत राहतील. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीदेखील शनिवारी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरे देताना सॉव्हरेन गोल्‍ड बॉन्ड योजना बंद करणार असल्याचे सांगितले होते.

SGB ​​योजना बंद करण्यावर सरकार काय म्हणाले? आर्थिक व्यवहार सचिव अजय सेठ यांनी सांगितले की, सॉव्हरेन गोल्‍ड बॉन्ड (SGB) योजना बंद करण्याचा निर्णय सरकारच्या कर्जाचा खर्च लक्षात घेऊन घेण्यात आला आहे. बाजारातून कर्जे उभारणे आणि अर्थसंकल्पीय वित्तपुरवठा, या उद्देशाने हे निर्णय घेतले जातात. या मालमत्ता वर्गाला आधार देण्याची गरज आहे की नाही, हे पाहणेही महत्त्वाचे आहे. अशा स्थितीत सरकारचे होणारे नुकसान लक्षात घेऊन ते सुरू न ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आता गुंतवणुकीचे कोणते पर्याय आहेत? सॉव्हरेन गोल्‍ड बॉन्ड योजना बंद झाल्यानंतर आता सोन्यात गुंतवणुकीसाठी फक्त गोल्ड ईटीएफ आणि गोल्ड म्युच्युअल फंड हेच पर्याय उरले आहेत. या दोन्हीमधील गुंतवणूक दुय्यम बाजारात करता येते. हे सोने तुम्ही तुमच्या गरजेनुसार विकत घेऊ शकता. पण, या दोन्ही पर्यायांमध्ये गुंतवणूक करणे हे प्रत्यक्ष सोन्यात गुंतवणुकीपेक्षा सोपे आहे. कारण त्याचा खऱ्या आणि बनावट सोन्याशी काहीही संबंध नाही.

गोल्ड ईटीएफ म्हणजे काय? गोल्ड ईटीएफ भौतिक सोन्याच्या किमतीचा मागोवा घेतात. भौतिक सोन्याच्या किमतीत चढ-उतार होत असल्यास ईटीएफ सोन्याच्या किमतीही चढ-उतार होतात. तुम्ही कोणत्याही ब्रोकरेज प्लॅटफॉर्मवर एक्सचेंजद्वारे गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करू शकता. सोन्याच्या ईटीएफचे मूल्य सोन्याच्या किमतीवर आधारित असते. याचे कारण म्हणजे गोल्ड ईटीएफ त्याचे पैसे भौतिक सोन्यात गुंतवते. सोन्याच्या ईटीएफच्या एका युनिटचे मूल्य एक ग्रॅम सोन्याइतके असते.

गोल्ड म्युच्युअल फंड- गोल्ड ईटीएफ व्यतिरिक्त गोल्ड म्युच्युअल फंडदेखील एक चांगला गुंतवणूक पर्याय आहे. गोल्ड म्युच्युअल फंड हे ओपन-एंडेड फंड आहेत, जे गोल्ड ईटीएफच्या युनिट्समध्ये गुंतवणूक करतात. प्रत्येक गोल्ड म्युच्युअल फंडात एक फंड मॅनेजर असतो, जो गुंतवणुकीचे निर्णय घेतो. गोल्ड म्युच्युअल स्कीममधील युनिट्सचे निव्वळ मालमत्ता मूल्य (एनएव्ही) असते. गोल्ड म्युच्युअल फंडाची मालमत्ता फंड व्यवस्थापकाद्वारे व्यवस्थापित केली जाते.