SIP Power: 30 हजार रुपये पगार असलेले बनू शकतात करोडपती; जाणून खास गणित...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2023 18:16 IST2023-04-28T18:13:00+5:302023-04-28T18:16:32+5:30
सध्या महागाई फार वाढत आहे, त्यामुळे योग्य ठिकाणी बचत करणे काळाची गरज आहे.

SIP Power: एकीकडे नोकरदारांना चांगले वेतन मिळत नाहीये, तर दुसरीकडे महागाई झपाट्याने वाढत आहे. दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्याने लोकांना जास्त पैसे खर्च करावे लागत आहेत. याचा सर्वाधिक परिणाम मध्यमवर्गीय कुटुंबांवर दिसून येत आहे. अशा परिस्थितीत मोठा निधी कसा उभा करायचा? कमी पगारात करोडपती होण्याचे कोणते मार्ग आहेत? असे प्रश्न तुमच्याही मनात निर्माण होत असतील. आज आम्ही एक अप्रतिम फॉर्म्युला सांगणार आहोत, ज्यातून तुम्ही करोडपती होऊ शकता.
50:20:20 फॉर्म्युला- तुम्ही विचार करत असाल की, 50:30:20 चा अर्थ काय? सोप्या भाषेत सांगायचे तर, तुमचे उत्पन्न तीन भागांमध्ये विभागण्याचे हे सूत्र आहे. यामध्ये फक्त एवढेच करायचे आहे की, तुम्ही नोकरी करत असाल तर तुमच्या सॅलरी अकाउंटमध्ये येणाऱ्या पगारावर हा फॉर्म्युला वापरुन त्याचे तीन भाग करायचे आहेत. व्यावसायिकही हे करू शकतात. ते तुमच्या मासिक उत्पन्नावर लागू करून तुम्ही प्रचंड निधी गोळा करू शकता.
जर तुम्ही दरमहा 30,000 रुपये कमवत असाल, तर त्यावर हे 50%+30%+20%= 100% सूत्र वापरुन पाहा. म्हणजेच तुमचा पगार तीन भागात विभागून घ्या. यानुसार तुमच्या पगाराचे तीन भाग होतील (15000+9000+6000).
पहिला भाग येथे वापरा- तुमच्या पगाराचा सर्वात मोठा किंवा 50 टक्के भाग तुमच्या महत्त्वाच्या कामांवर खर्च करा. यामध्ये अन्न, वस्त्र, निवारा आणि शिक्षण यांचा समावेश आहे. निश्चित रकमेपैकी हे खर्च पूर्ण करण्यासाठी, तुम्हाला संपूर्ण महिन्याच्या खर्चाची यादी तयार ठेवावी लागेल.
दुसरा भाग येथे वापरा- या फॉर्म्युला अंतर्गत, तुमच्या आवश्यक खर्चासोबत तुम्ही तुमचे छंद जसे बाहेर जाणे, चित्रपट पाहणे, बाहेर जेवणे, आणि बरेच काही पूर्ण करू शकता. मात्र, त्यांना उत्पन्नानुसार मर्यादा घालणे अत्यंत आवश्यक आहे. तुमच्या पगारातून काढलेल्या 30% रकमेने तुम्ही या सर्व गरजा पूर्ण करू शकता.
शेवटचा भाग करोडपती करणार- लहान पण सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे तिसरा म्हणजे 20 टक्के भाग आहे. 30,000 रुपये पगारावर हा हिस्सा 6,000 रुपये होतो. या फॉर्म्युलामध्ये लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट अशी आहे की, ही रक्कम योग्य ठिकाणी गुंतवावी लागेल. निश्चित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी म्युच्युअल फंडामध्ये दर महिन्याला SIP आणि बाँडमध्ये है पैसे गुंतवण्याचा सर्वोत्तम पर्याय असेल. 50:30:20 फॉर्म्युल्यानुसार, दरमहा एवढ्या पैशाची बचत केल्यास, तुमचे वार्षिक 72,000 रुपये वाचतील. SIP मध्ये गुंतवणूक केल्याने, तुमची ही बचत वर्षानुवर्षे वाढत जाईल आणि त्यासोबतच त्यावर मिळणाऱ्या व्याजात चक्रवाढ व्याज जोडले जाईल आणि एक मोठा फंड तयार होईल.
असे आहे गणित- तुम्ही म्युच्युअल फंडात दरमहा 6000 रुपयांची एसआयपी केली आणि तुमचे उत्पन्न वाढत असताना दरवर्षी 20% गुंतवणुकीत वाढ केली, तर 20 वर्षांनंतर त्या गुंतवणुकीवर 12% दराने एकूण 217% कमाई होईल. यावर तुम्हाला 15 टक्के व्याज मिळाल्यास तुम्हाला एकूण 3,42,68,292 रुपये मिळतील. या फॉर्म्युल्यावर 20 वर्षे काम करून करोडपती होणे अवघड नाही हे स्पष्ट आहे.