२० मिनिटांत ८.८ लाख रुपये लंपास, 'या' ४ चुकांमुळे बँक खाते रिकामे! तुम्ही तर करत नाहीयेत ना?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 10:48 IST2025-08-04T10:45:59+5:302025-08-04T10:48:21+5:30
Cybercrime : अलीकडच्या काळात सायबर गुन्हेगारीच्या घटना खूप वाढल्या आहेत. मोबाईलशी संबंधित आर्थिक गुन्हेगार तुमच्या लहानशा चुकीचा फायदा घेऊन तुमचं बँक खातं रिकामं करत आहेत. कोलकाता येथील पंकज कुमार यांच्यासोबत नुकताच एक धक्कादायक प्रकार घडला. त्यांच्याकडे दोन क्रेडिट कार्ड होते आणि कोणतीही संशयास्पद हालचाल नव्हती.

पण अवघ्या २० मिनिटांत त्यांच्या खात्यातून ८.८ लाख रुपये ऑनलाइन शॉपिंगद्वारे काढले गेले. जेव्हा त्यांना सतत ओटीपी येत असल्याचं लक्षात आलं, तेव्हा त्यांनी कार्ड ब्लॉक केलं, पण तोपर्यंत फसवणूक करणाऱ्यांनी त्यांचं काम पूर्ण केलं होतं.
पोलिसांना संशय आहे की, हा एकतर 'सिम-स्वॅप' घोटाळा आहे किंवा कोणीतरी पंकज यांचा वैयक्तिक डेटा चोरला आहे. कोलकाता पोलिसांनुसार, असे घोटाळे वेगाने वाढत आहेत, ज्यात बनावट ग्राहक सेवा कॉल आणि कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांची संगनमत देखील असते.
सिम-स्वॅप घोटाळा म्हणजे, एखादा फसवणूक करणारा तुमचा मोबाईल नंबर त्याच्या सिममध्ये ट्रान्सफर करून घेतो. यासाठी तो तुमची ओळख सांगून मोबाईल कंपनीची दिशाभूल करतो. एकदा त्याला तुमचा नंबर मिळाला की, तुमच्या बँक खात्यातून होणाऱ्या सर्व व्यवहारांचे ओटीपी, बँकिंग अलर्ट आणि इतर महत्त्वाच्या सूचना त्याला मिळू लागतात. यामुळे तो तुमचे पासवर्ड बदलून तुमच्या खात्यातून सहजपणे पैसे काढू शकतो.
ओटीपी, सीव्हीव्ही, पिन शेअर करू नका : बँक किंवा कोणतीही आर्थिक संस्था कधीही फोन, एसएमएस किंवा ईमेलद्वारे तुमचा ओटीपी किंवा पासवर्ड मागत नाही. जर कोणी अशी माहिती मागितली, तर लगेच फोन कट करा आणि स्वतः बँकेच्या अधिकृत क्रमांकावर कॉल करून याची खात्री करा.
सिम-स्वॅपच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका: जर तुमच्या फोनचे नेटवर्क अचानक गेले किंवा सिम निष्क्रिय झाले, तर ताबडतोब तुमच्या मोबाईल ऑपरेटरशी संपर्क साधा. तसेच, पोर्टिंग लॉक किंवा सिम पिन सक्रिय करा, जेणेकरून कोणीही तुमचा नंबर सहजपणे वापरू शकणार नाही.
छोटे व्यवहार हलक्यात घेऊ नका: फसवणूक करणारे अनेकदा आधी छोटे व्यवहार करून पाहतात. कोणत्याही संशयास्पद किंवा लहान व्यवहाराची सूचना आल्यास लगेच बँकेला कळवा.
व्हर्च्युअल किंवा मर्यादित कार्ड वापरा: ऑनलाइन पेमेंटसाठी व्हर्च्युअल कार्ड किंवा कमी मर्यादेचे दुय्यम कार्ड वापरा. यामुळे जर तुमचा डेटा लीक झाला, तर मोठे आर्थिक नुकसान टाळता येईल.
फोन आणि ॲप्स सुरक्षित ठेवा: तुमच्या फोनमध्ये किंवा नोट्समध्ये कार्डची माहिती सेव करू नका. नेहमी चांगला अँटीव्हायरस वापरा, पासवर्ड मॅनेजर आणि टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन सारखी सुरक्षा वैशिष्ट्ये वापरा.
बनावट कॉल टाळा: फसवणूक करणारे स्वतःची ओळख बँक कर्मचारी, सरकारी अधिकारी किंवा ग्राहक सेवा प्रतिनिधी म्हणून करून देतात. फक्त कॉलर आयडीवर विश्वास ठेवू नका. नेहमी अधिकृत वेबसाइट किंवा हेल्पलाइनवरील माहिती तपासूनच बोला.