Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 19:39 IST2025-10-15T19:32:19+5:302025-10-15T19:39:01+5:30
Silver Rate Increase in India: सोन्यापेक्षा जास्त किंमत चांदीची वाढत आहे. ऐन सण उत्सवाच्या काळात चांदी दोन लाखांच्या घरात गेली आहे.

भारतात सोने आणि चांदीच्या दर प्रचंड वेगाने वाढत आहे. जगभरातील अस्थिरतेमुळे सोन्यात गुंतवणूक करण्यावर भर वाढला आहे, तर चांदीही चकाकली आहे. चांदीचे दरही नव्या उच्चांकी पातळीवर पोहोचले आहे.
भारतात चांदीचे दर प्रति किलो दोन लाखांच्या घरात पोहोचले आहेत. अचानक किमतींनी उसळली घेतल्याने चांदी खरेदीकडेही लोकांचा कल वाढला आहे. पण, चांदी मिळण्यातही अडचणी येत आहेत.
चांदी इतकी महागडी होऊनही लोक ती खरेदी करत आहेत, पण बुधवारी सराफा दुकानदारांकडे चांदीचाच तुडवडा निर्माण झाला.
इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनने वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, १४ ऑक्टोबर रोजी चांदीचे दर प्रति किलो १ लाख ७८ हजार १०० रुपयांवर गेले. चांदीची मागणी सातत्याने वाढत असून त्यामुळे तुडवडा निर्माण झाला आहे.
ऑल इंडिया ज्वेलर्स अँड गोल्डस्मिथ फेडरेशनचे राष्ट्रीय सचिव बिमल मेहता यांनी बीबीसी हिंदीला दिलेल्या माहितीत सांगितलं की, बाजारात अचानकच मागणी वाढली. चांदीची नाणी, चांदीचे बार आणि विटांची मागणी होत आहे. लोक पैसे घेऊन विकत घेण्यासाठी फिरत आहेत, पण चांदी मिळत नाहीये."
"३० वर्षांपासून मी या क्षेत्रात आहे आणि असं यापूर्वी कधीही घडलं नाहीये. पहिल्यांदा चांदीची इतकी मागणी वाढल्याचे बघत आहे. चांदी गेल्या वर्षी प्रति किलो ७५ हजारांना मिळत होती. कुणालाही विश्वास नव्हता की, तिची किंमत इतकी वाढेल", असे त्यांनी सांगितले.
सोन्याचे दर प्रचंड वाढले आहेत. त्यामुळे भारतात सोनं खरेदी करणे सर्वसामान्य माणसांच्या आवाक्याबाहेर जाऊ लागलं आहे. त्यामुळे गुंतवणुकीचा चांगला पर्याय म्हणून लोक चांदी खरेदीकडे वळत आहेत. २०२५ वर्ष सुरू झाल्यापासून मागील ९ महिन्यात चांदीचे दर ६१ टक्क्यांनी वाढले आहेत.