चांदी एका आठवड्यात ३२ हजारांनी महागली; तर सोन्याची ५७०० रुपयांची झेप; पाहा आजचे नवे दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 10:40 IST2025-12-28T10:33:35+5:302025-12-28T10:40:54+5:30

Gold and Silver Price Shock : साल २०२५ संपताना चांदीने कमोडिटी मार्केटमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. गेल्या आठवड्यातील केवळ पाच ट्रेडिंग सत्रांमध्ये चांदीच्या भावात ३२,४९६ रुपयांची प्रचंड वाढ झाली असून ही आतापर्यंतची सर्वात मोठी साप्ताहिक वाढ मानली जात आहे.

केवळ चांदीच नाही, तर सोन्यानेही नव्या विक्रमी पातळीला स्पर्श केला आहे. एमसीएक्स वर सोन्याचा भाव आठवड्याभरात ५,७४४ रुपयांनी वधारला असून तो आता १.४० लाख रुपयांच्या उंबरठ्यावर (१,३९,९४० रुपये) पोहोचला आहे.

चांदीच्या किमतीत इतकी मोठी वाढ होण्यामागे मुख्य कारण म्हणजे वाढलेली औद्योगिक मागणी. सौर ऊर्जा आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात चांदीचा वापर वाढल्याने पुरवठ्यापेक्षा मागणी जास्त झाली आहे, ज्याचा परिणाम दरांवर झाला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिकन डॉलरची ताकद कमी झाली आहे. तसेच, अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीची शक्यता असल्याने जागतिक गुंतवणूकदारांनी सोन्या-चांदीसारख्या 'सेफ हेवन' पर्यायांकडे आपली गुंतवणूक वळवली आहे.

इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, स्थानिक बाजारात २४ कॅरेट सोन्याचा दर १,३७,९५६ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे. तर चांदीचा दर २,२८,१०७ रुपये प्रति किलोवर बंद झाला आहे.

सध्या बाजारात वेगवेगळ्या गुणवत्तेच्या सोन्याचे दर... २४ कॅरेट : १,३७,९५६ रुपये, २२ कॅरेट : १,३४,६५० रुपये आणि १८ कॅरेट : १,११,७४० रुपये आहे.

हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, वरील दर केवळ धातूचे आहेत. जेव्हा तुम्ही दागिने खरेदी करता, तेव्हा त्यावर ३% जीएसटीआणि सराफांचे मेकिंग चार्जेस अतिरिक्त लागतात, ज्यामुळे दागिन्यांची अंतिम किंमत अजून वाढते.

ज्यांनी २०२५ च्या सुरुवातीला किंवा गेल्या काही महिन्यांत सोने-चांदीत गुंतवणूक केली होती, ते आता मालामाल झाले आहेत. वर्षाच्या शेवटच्या तीन दिवसांतही ही तेजी कायम राहण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.