ज्येष्ठ नागरिकांना 'या' स्कीममध्ये मिळतोय ८.२% चा वार्षिक रिटर्न; मिळतो हमी परतावा, पाहा संपूर्ण डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2024 08:33 AM2024-04-05T08:33:34+5:302024-04-05T08:45:02+5:30

ही योजना ज्येष्ठ नागरिकांना हमी परतावा देते. याशिवाय यामध्ये गुंतवणूक करणंही पूर्णपणे सुरक्षित आहे.

ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) ही ज्येष्ठ नागरिकांसाठी भारत सरकारची विशेष बचत योजना आहे. ही योजना ज्येष्ठ नागरिकांना हमी परतावा देते. याशिवाय यामध्ये गुंतवणूक करणंही पूर्णपणे सुरक्षित आहे.

इतकंच नाही तर तुम्ही ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत गुंतवणूक केली तर तुम्हाला त्यासाठी कर सवलतीचा लाभही मिळतो. या योजनेअंतर्गत तुम्ही बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये खातं उघडू शकता.

ज्येष्ठ नागरिक बचत योजनेंतर्गत ६० वर्षांपेक्षा जास्त वयाची व्यक्ती खातं उघडू शकते. याव्यतिरिक्त, ५५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या परंतु ६० वर्षांपेक्षा कमी वयाच्या सेवानिवृत्त व्यक्तींनी सेवानिवृत्तीचे लाभ मिळाल्याच्या तीन महिन्याच्या आत गुंतवणूक केल्यास ते देखील या योजनेची निवड करू शकतात.

स्टेट बँक ऑफ इंडियानं SCSS वरील FAQ मध्ये यासंदर्भात माहिती दिली आहे. एक ठेवीदार काही नियम आणि नियमांच्या अधीन एकापेक्षा जास्त खाती ऑपरेट करू शकतो. तुम्हाला बँका आणि पोस्ट ऑफिसमध्ये एका पेक्षा अधिक खाती उघडण्याची आणि ऑपरेट करण्याची परवानगी आहे.

जरी एक ज्येष्ठ नागरिकानं बँक आणि पोस्ट ऑफिसमध्ये एकापेक्षा अधिक ज्येष्ठ नागरिक बचत योजनेची खाती उघडली, तरी या सर्व ज्येष्ठ नागरिक बचत योजना खात्यांची एकूण मर्यादा ३० लाख रुपये किंवा सेवानिवृत्ती लाभ म्हणून मिळालेली रक्कम, यापैकी जी कमी असेल ती असेल.

लक्षात ठेवण्याजोगी बाब म्हणजे एकदा गुंतवणूक केल्यानंतर, व्याजदर योजनेच्या कालावधीसाठी म्हणजेच ५ वर्षांसाठी निश्चित राहतो. व्याज प्रत्येक तिमाहीत दिलं जातं आणि ते पूर्णपणे करपात्र आहे. ही योजना मॅच्युरिटीवर कोणतंही व्याज देत नाही.

यापूर्वी सरकारनं सीनिअर सिटिझन सेव्हिंग स्कीमच्या नियमात बदल केला होता. हे नवीन नियम ७ नोव्हेंबर २०२३ पासून लागू करण्यात आले आहेत. नवीन नियमांनुसार, एक वर्षाचा गुंतवणुकीचा कालावधी संपण्यापूर्वी खातं बंद केल्यास, जमा केलेल्या रकमेपैकी एक टक्का रक्कम काढून घेतली जाईल. यापूर्वी, एक वर्षाचा कालावधी संपण्यापूर्वी खातं बंद केल्यास, त्या रकमेवर दिलेलं व्याज वसूल केलं जात होतं आणि खातेदाराला शिल्लक रक्कम दिली जात होती.