SBI च्या नावानं तुम्हाला असा मॅसेज आला तर सावध व्हा! काही सेकंदात बँख खातं होईल रिकामं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 10:59 IST2025-01-17T10:56:54+5:302025-01-17T10:59:17+5:30

SBI Reward Scam : सध्या सायबर गुन्हेगारांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नावाने नवा घोटाळा करायला सुरुवात केली आहे. यासाठी ते ग्राहकांना एक संदेश पाठवत आहेत.

सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवत लोकांची आर्थिक फसवणूक करत आहेत. असाच एक नवा एसबीआय घोटाळा समोर आला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नावाने ग्राहकांना एक रिवॉर्ड पॉइंट्स मिळाल्याचा एक संदेश पाठवला जात आहे.

या मेसेजमध्ये पाठवलेली एपीके फाइल डाउनलोड करण्यास सांगितले जाते. जर तुम्हाला असा मेसेज आला असेल तर ताबडतोब सावध व्हा, कारण त्यामुळे तुमचं बँक खातं रिकामं होऊ शकते.

सायबर गुन्हेगार SBI REWARD27..APK नावाची फाइल पाठवत आहेत. यात स्टेट बँक ऑफ इंडियाने तुम्हाला विशेष बक्षीस दिल्याचा दावा केलेला असतो. पण, पीआयबी फॅक्ट चेक युनिटने या मेसेजचे सत्य उघड करून ते बनावट असल्याचे घोषित केले आहे. पीआयबीनुसार, ही फाइल तुमच्या वैयक्तिक डेटाला आणि आर्थिक सुरक्षिततेला हानी पोहोचवू शकते.

अशा फायली डाउनलोड करू नका आणि अज्ञात लिंकवर क्लिक करणे टाळा, असा इशारा पीआयबीने दिला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने असेही स्पष्ट केले आहे की ते कधीही एसएमएस किंवा व्हॉट्सॲपद्वारे अशा लिंक्स किंवा एपीके फाइल्स पाठवत नाहीत.

APK (Android Package Kit) हे अँड्रॉइड डिव्हाइसेसवर अ‍ॅप्स इन्स्टॉल करण्यासाठी वापरले जाणारे फाइल फॉर्मट आहे. सायबर गुन्हेगार याचा वैयक्तिक डेटा चोरण्यासाठी, बँकिंग क्रेडेन्शियल हॅक करण्यासाठी किंवा रॅन्समवेअर इन्स्टॉल करण्यासाठी वापरू शकतात.