SBI नं नॉन-होम ब्रान्चमधून रोख रक्कम काढण्याच्या मर्यादेत केला बदल; पाहा किती काढू शकता पैसे
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2021 22:02 IST2021-05-29T21:59:13+5:302021-05-29T22:02:21+5:30
SBI Non Home Branch Cash Withdrawal : स्टेट बँकेनं इंडिव्हिज्युअल कस्टमर्ससाठी नॉन-होम ब्रान्चमधून पैसे काढण्याच्या मर्यादेत केला बदल.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात हाहाकार माजला आहे. सध्या कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असली तरी अनेक ठिकाणी काळजी घेण्यात येत आहे. बँकांनीही आपल्या कामाकाजाच्या वेळांमध्ये आणि अन्य महत्त्वाच्या कामांमध्ये बदल केले आहेत.

देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँकेनं आपल्या वैयक्तिक ग्राहकांसाठी नॉन-होम ब्रान्चमध्ये रक्कम काढण्याच्या नियमांत बदल केले आहेत.

आता ग्राहकांना नॉन-होम ब्रान्चमध्ये जाऊन चेकद्वारे एका दिवसाला केवळ १ लाख रूपयांपर्यंतचीच रोख रक्कम काढता येणार आहे. एसबीआयनं ट्वीटद्वारे यासंदर्भातील माहिती दिली आहे.

बचत खात्याच्या पासबुकद्वारे पैसे काढण्याचा फॉर्म वापरून एका दिवसाला आता केवय़ळ २५ हजारांपर्यंतचीच रोख रक्कम काढता येणार आहे.

तर दुसरीकडे चेकद्वारे स्वत:साठी एका दिवसांत केवळ १ लाख रूपयांपर्यंतची रक्कम काढता येईल.

तर थर्ड पार्टीसाठी केवळ चेकद्वारे एका दिवसांत ५० हजार रूपयांपर्यंतची मर्यादा घालून देण्यात आली आहे.

स्टेट बँकेकडून लागू करण्यात आलेले हे नवे नियम ३० सप्टेंबरपर्यंत लागू राहणार आहेत.

थर्ड पार्टी कॅश पेमेंटसाठी फॉर्म न दिल्यास चेकद्वारे रोख रक्कम दिली जाईल. यासाठी थर्ड पार्टीला केव्हायसी सबमिट करावं लागेल.

सध्या स्टेट बँकेच्या देशभरात २२ हजारांपेक्षा अधिक ब्रान्च आहेत. तर याव्यतिरिक्त त्यांचे देशात ५८ हजारांच्या जवळपास एटीएम/सीडीएम नेटवर्क्स आहेत आणि बीसी आऊटलेट्सही ७१ हजारांपेक्षा अधिक आहेत.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही स्टेट बँकेचे देशातील इतर बँकांच्या तुलनेत सर्वाधिक फॉलोअर्स आहेत.

















