खात्यात पैसे नसले तरी टेन्शन नाही! 'या' ६ मोठ्या बँकांनी किमान शिल्लक शुल्क केले रद्द!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 17:39 IST2025-07-09T17:29:35+5:302025-07-09T17:39:51+5:30
Average Minimum Balance Charges : या निर्णयामुळे आता ग्राहकांना आपल्या बचत खात्यातील पैशांची चिंता करावी लागणार नाही. आता तुमच्या खात्यात कमी पैसे असले किंवा ते रिकामे असले तरी बँक तुम्हाला कोणताही दंड आकारणार नाही.

अनेक लोकांना एक मोठी समस्या भेडसावते ती म्हणजे, बचत खात्यात किमान शिल्लक रक्कम ठेवली नाही तर बँक दंड आकारते. पण आता बचत खातेधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे! एसबीआयसह सहा मोठ्या बँकांनी आता सरासरी मासिक शिल्लक न ठेवल्यास आकारले जाणारे शुल्क पूर्णपणे रद्द केले आहे.
बँकांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय बदलत्या बाजार परिस्थितीनुसार आणि आर्थिक लवचिकता वाढवण्यासाठी घेतला आहे, असे बँक ऑफ इंडियाच्या प्रेस रिलीझमध्ये म्हटले आहे. या निर्णयामुळे कोट्यवधी बँक ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
बँक ऑफ बडोदा : १ जुलै २०२५ पासून सर्व सामान्य बचत खात्यांवरील किमान शिल्लक अट पूर्ण न केल्यास आकारले जाणारे शुल्क रद्द केले आहे. मात्र, प्रीमियम बचत खात्यांसाठी हे शुल्क कायम आहे.
इंडियन बँक : ७ जुलै २०२५ पासून सर्व प्रकारच्या बचत खात्यांवरील सरासरी किमान शिल्लक शुल्क पूर्णपणे रद्द करण्याची घोषणा केली आहे.
कॅनरा बँक : या वर्षी मे महिन्यातच कॅनरा बँकेने नियमित बचत खात्यांसह सर्व प्रकारच्या बचत खात्यांवरील किमान शिल्लक शुल्क रद्द केले आहे. यामध्ये पगार आणि एनआरआय बचत खात्यांचाही समावेश आहे.
पंजाब नॅशनल बँक : पंजाब नॅशनल बँकेनेही सर्व प्रकारच्या बचत खात्यांवरील किमान सरासरी शिल्लक शुल्क रद्द करून ग्राहकांना दिलासा दिला आहे.
स्टेट बँक ऑफ इंडिया : २०२० पासून किमान सरासरी शिल्लक रक्कम आकारणाऱ्या एसबीआयनेही आता हे शुल्क रद्द केले आहे. म्हणजेच, आता बचत खात्यावर किमान शिल्लक रकमेची अट पूर्ण न झाल्यास कोणताही दंड लागणार नाही.
बँक ऑफ इंडिया : बँक ऑफ इंडियानेही किमान शिल्लक अट पूर्ण न करणाऱ्या ग्राहकांकडून कोणतेही शुल्क न आकारण्याचा निर्णय घेतला आहे.