Rules Change : नववर्षाच्या सकाळी बदलणार 'हे' ६ नियम, तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 09:38 IST2024-12-28T09:23:54+5:302024-12-28T09:38:26+5:30

New Rules Change from 1 January 2025: १ जानेवारीचा दिवस सुरू होताच कॅलेंडर तर बदलेलच, पण हे नवं वर्ष आपल्यासोबत असे अनेक नवे नियमही घेऊन येणार आहे, ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावरही होईल.

New Rules Change from 1 January 2025: नवीन वर्ष सुरू होण्यास अवघे काही दिवस शिल्लक आहेत. १ जानेवारीचा दिवस सुरू होताच कॅलेंडर तर बदलेलच, पण हे नवं वर्ष आपल्यासोबत असे अनेक नवे नियमही घेऊन येणार आहे, ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावरही होईल. चला तर मग जाणून घेऊया नवीन वर्षात लागू काही महत्त्वाच्या नियमांची माहिती.

सेन्सेक्सची मंथली एक्सपायरी बदलणार - १ जानेवारी २०२५ पासून Sensex, Bankex आणि Sensex 50 ची मंथली एक्सपायरी दर महिन्याच्या शेवटच्या मंगळवारी होणार आहे. सेन्सेक्सचे वीकली काँट्रॅक्ट्सही शुक्रवारऐवजी मंगळवारी संपणार आहेत. सध्या सेन्सेक्सची मंथली एक्सपायरी दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी संपते, तर बँकेक्सचा मंथली काँट्रॅक्ट दर महिन्याच्या शेवटच्या सोमवारी आणि सेन्सेक्स ५० चा काँट्रॅक्ट दर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी संपतो.

नवी कार महागणार - नवीन वर्षात १ जानेवारीच्या सकाळपासून नवीन कार खरेदी करणं तुम्हाला महागात पडणार आहे. टाटा मोटर्स, मारुती सुझुकी, ह्युंदाई, महिंद्रा, मर्सिडीज-बेंझ, होंडा, ऑडी आदी अनेक कार कंपन्यांनी आपल्या कारच्या किंमती वाढवण्याची घोषणा केली आहे.

ईपीएफओधारकांना दिलासा - नव्या वर्षात ईपीएफओ पेन्शनवर मोठा दिलासा मिळणार आहे. नव्या नियमानुसार आता पेन्शनधारकांना देशातील कोणत्याही बँकेतून पेन्शन काढता येणार आहे. त्यासाठी त्यांना कोणत्याही अतिरिक्त पडताळणीची गरज भासणार नाही.

यूपीआय १२३ पे - नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं (NPCI) नव्या वर्षात यूपीआय १२३ पेच्या मर्यादेत वाढ केली आहे. आतापर्यंत या पेमेंट सेवेचा वापर ५,००० रुपयांपर्यंतच्या व्यवहारासाठी केला जाऊ शकतो. नव्या वर्षात त्याची मर्यादा वाढवून १० हजार रुपये करण्यात आली आहे.

एलपीजीची किंमत - एलपीजीच्या दरात दर महिन्याच्या पहिल्या तारखेला बदल केले जातात. त्यामुळे इंधन कंपन्या १ जानेवारी २०२५ रोजी एलपीजीच्या किंमतीत काही बदल करतात का, हे पाहावं लागेल.

हमीशिवाय २ लाखांपर्यंतचं कर्ज - रिझर्व्ह बँकेनं (आरबीआय) नवीन वर्षाच्या निमित्तानं शेतकऱ्यांना मोठी भेट दिली आहे. आरबीआयनं शेतकऱ्यांना विनाहमी कर्जाची मर्यादा दोन लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे. यापूर्वी ही मर्यादा १.६० लाख रुपये होती.