Amazon Prime ते एलपीजी, जीएसटी पोर्टल ते पेन्शन; आजपासून झाले हे महत्त्वाचे बदल, थेट खिशावर होणार परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 10:26 IST2025-01-01T10:13:27+5:302025-01-01T10:26:50+5:30

Rules Change 1st January 2025 : नवीन वर्ष म्हणजे २०२५ आपल्यासोबत अनेक बदल घेऊन आलं आहे. या बदलांचा तुमच्या आयुष्यावर आणि खिशावरही परिणाम होईल.

Rules Change 1st January 2025 : नवीन वर्ष म्हणजे २०२५ आपल्यासोबत अनेक बदल घेऊन आलं आहे. या बदलांचा तुमच्या आयुष्यावर आणि खिशावरही परिणाम होईल. मारुती सुझुकी, ह्युंदाई, टाटा मोटर्स, किआ इंडिया आणि जेएसडब्ल्यू एमजी मोटर इंडिया यांच्या कार्स महाग झाल्यात.

तर १९ किलोचा व्यावसायिक गॅस सिलिंडर १६ रुपयांनी स्वस्त झाला आहे. कोलकात्यात आता तो १८११ रुपयांना मिळणार आहे. घरगुती सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. इतकंच नाही तर, आता फीचर फोनवरून यूपीआयच्या माध्यमातून १० हजार रुपयांपर्यंत रक्कम पाठवता येणार आहेत. पाहूया आजपासून कोणकोणते बदल झालेत.

आरबीआयचा एफडी नियमांमध्ये बदल - रिझर्व्ह बँकेनं १ जानेवारीपासून एनबीएफसी (नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज) आणि एचएफसी (हाऊसिंग फायनान्स कंपन्या) यांच्या मुदत ठेवींशी संबंधित नियमांमध्ये बदल केला आहे. यामध्ये ठेवी घेण्याचे नियम, लिक्विड मालमत्ता बाळगण्याची टक्केवारी आणि ठेवींच्या विम्याशी संबंधित नवीन नियमांचा समावेश आहे.

गाड्यांच्या किमती वाढणार - नव्या वर्षात अनेक कार कंपन्यांनी कारच्या किंमती वाढवण्याची घोषणा केली आहे. यामध्ये मारुती सुझुकी, ह्युंदाई, महिंद्रा, मर्सिडीज-बेंझ, बीएमडब्ल्यू आणि ऑडी सारख्या कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांनी जवळपास ३ टक्के दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

एलपीजीची किंमत - दर महिन्याच्या पहिल्या तारखेला इंधन कंपन्या एलपीजीच्या किमतींचा आढावा घेतात. गेल्या काही महिन्यांत १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत वाढली असली तरी १४.२ किलोचा घरगुती सिलिंडर अजूनही ८०३ रुपयांना उपलब्ध आहे. घरगुती सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

अॅमेझॉन प्राईममध्ये बदल - अॅमेझॉन इंडियानं १ जानेवारी २०२५ पासून आपल्या प्राइम मेंबरशिपचे नियम बदलले आहेत. आता प्राईम व्हिडिओ एका अकाऊंटवरून फक्त दोन डिव्हाइसेसवर स्ट्रीम करता येणार आहे. यापूर्वी पाच डिव्हाइसवर स्ट्रीमिंगची परवानगी होती. अधिक टीव्हीवर स्ट्रीमिंग करण्यासाठी अतिरिक्त सब्सक्रिप्शन आवश्यक आहे.

जीएसटी पोर्टलमध्ये बदल - १ जानेवारीपासून जीएसटी पोर्टलमध्ये काही महत्त्वाचे बदल केले जात आहेत. ई-वे बिलाची डेडलाइन आणि जीएसटी पोर्टलच्या सुरक्षिततेशी संबंधित बदल केले जातील.

पेन्शनचे पैसे - ईपीएफओनं १ जानेवारीपासून पेन्शन नियम सोपा केला आहे. आता कर्मचाऱ्यांना कोणत्याही बँकेतून पेन्शनची रक्कम काढता येणार असून त्यासाठी कोणत्याही अतिरिक्त पडताळणीची गरज भासणार नाही.

विनाहमी कर्ज - आरबीआयनं शेतकऱ्यांना विनाहमी दिलेल्या कर्जाची मर्यादा दोन लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे. यापूर्वी ही मर्यादा १.६० लाख रुपये होती. रिझर्व्ह बँकेने २०१० मध्ये कृषी क्षेत्राला कोणत्याही हमीशिवाय देण्यासाठी एक लाख रुपयांची मर्यादा निश्चित केली होती. त्यानंतर २०१९ मध्ये ती वाढवून १.६ लाख रुपये करण्यात आली. आता शेतकरी कोणत्याही हमीशिवाय शेती किंवा त्याशी संबंधित इतर कोणत्याही गरजेसाठी बँकांकडून दोन लाख रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकणार आहेत.

एफ अँड ओ एक्सपायरी - निफ्टी बँक, फिनिफ्टी, मिडकॅप सिलेक्ट आणि नेक्स्ट ५० चे विकली कॉन्ट्रॅक्ट बंद केल्यानंतर नॅशनल स्टॉक एक्स्चेंजनं (एनएसई) या चार एफ अँड ओ कॉन्ट्रॅक्ट्सच्या मंथली एक्सपायरीत बदल केला आहे. १ जानेवारी 2025 पासून हे कॉन्ट्रॅक्ट अखेरच्या गुरुवारी एक्सपायर होतील. यापूर्वी निफ्टी बँकेचे मंथली आणि क्वार्टरली कॉन्ट्रॅक्ट महिन्याच्या शेवटच्या बुधवारी संपत होते, तर फिनिफ्टीचे कॉन्ट्रॅक्ट्स मंगळवारी संपत होते. मिडकॅपची मुदत सोमवारी तर निफ्टी नेक्स्ट ५० ची मुदत शुक्रवारी संपत असे.