Rule Change 1 December: १ डिसेंबरपासून 'हे' नियम बदलणार, ऑफरही संपणार; LPG किंमतीवरही निर्णयाची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2021 03:16 PM2021-11-27T15:16:42+5:302021-11-27T15:22:00+5:30

Rule Change from 1 December: नोव्हेंबर महिना संपणार आहे. याचबरोबर सामान्य नागरिकांशी जोडलेले काही नियम बदलणार आहेत.

नोव्हेंबर महिना संपणार आहे. याचबरोबर सामान्य नागरिकांशी जोडलेले काही नियम बदलणार आहेत. काही ऑफरही संपणार आहेत. नवीन महिन्यात एलपीजी गॅसच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे. याशिवाय बँकिंग आणि पेन्शन संबंधी काही नियम बदलणार आहेत.

EPFO ने UAN आणि आधार लिंक करण्याची अंतिम मुदत 30 नोव्हेंबरपर्यंत वाढवली होती. आता त्यात आणखी मुदत वाढीची अपेक्षा नाही. अशा परिस्थितीत ज्यांनी आजपर्यंत हे काम केले नाही, त्यांना हे काम तीन दिवसांत पूर्ण करावे लागेल, अन्यथा त्यांचे मोठे नुकसान होऊ शकते. UAN-आधार कालमर्यादेत लिंक न केल्यास, PF सदस्यांच्या खात्यात रक्कम जमा करता येणार नाही. असे ग्राहक पीएफ खात्यातून पैसेदेखील काढू शकणार नाहीत.

३० नोव्हेंबरपर्यंत UAN-आधार लिंक न केल्यास आणखी एक मोठे नुकसान होऊ शकते. EPFO ने एम्प्लॉईज डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स (EDLI) साठी UAN-आधार लिंकिंग अनिवार्य केले आहे. अन्यथा, कर्मचाऱ्याचा प्रीमियम जमा केला जाणार नाही आणि तो 7 लाखांपर्यंतच्या विमा संरक्षणाच्या लाभापासून वंचित राहील.

डिझेल-पेट्रोलची किरकोळ विक्री करणाऱ्या सरकारी तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी सिलिंडरच्या किमतीचा आढावा घेतात. कोरोनाचे नवीन प्रकार समोर आल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. या शुक्रवारी, ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल 10 डॉलरने घसरली, जी एप्रिल 2020 नंतरची सर्वात मोठी घसरण आहे. अशा स्थितीत 1 डिसेंबरच्या आढाव्यात एलपीजी सिलिंडरच्या किमती कमी होणे अपेक्षित आहे.

सरकारी पेन्शनधारकांसाठी हयातीचे प्रमाणपत्र सादर करण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर आहे. ज्या सरकारी पेन्शनधारकांनी मुदतीत हयात प्रमाणपत्र सादर केले नाही त्यांना पेन्शन मिळणे बंद होईल. EPFO ने नुकत्याच केलेल्या ट्विटनुसार, सरकारी पेन्शनधारकांना 30 नोव्हेंबरपर्यंत हे पत्र सादर करावे लागेल, जे एक वर्षासाठी वैध असेल. हे काम घरबसल्या डिजिटल पद्धतीने करता येते.

एसबीआय क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या लोकांसाठीही डिसेंबरपासून बदल होणार आहेत. आता SBI क्रेडिट कार्डने EMI वर खरेदी करणे महाग होणार आहे. आतापर्यंत एसबीआय कार्डवर केवळ व्याज आकारले जात होते, परंतु आता ईएमआयवर खरेदी करण्यासाठी प्रक्रिया शुल्क देखील भरावे लागणार आहे. याचा थेट परिणाम SBI क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांच्या खिशावर होणार आहे.

सणासुदीच्या काळात, कोरोनामुळे अनेक बँका आणि वित्तीय संस्थांनी गृहकर्जाच्या ऑफर दिल्या आहेत. या ऑफर परवडणाऱ्या व्याजदरापासून ते प्रक्रिया शुल्क माफ करण्यापर्यंतच्या आहेत. बहुतांश बँकांच्या ऑफर ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत लागू असल्या तरी LIC हाउसिंग फायनान्सची ऑफर या महिन्यात संपत आहे. कंपनीने पात्र ग्राहकांना 2 कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जावर 6.66 टक्के दराने गृहकर्ज देऊ केले आहे, ज्याची मुदत 30 नोव्हेंबर रोजी संपत आहे.

Read in English