LPG दर, हवाई भाडे ते बँका...आजपासून तुमच्या खिशावर परिणाम करणारे ५ मोठे बदल लागू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2026 14:32 IST2026-03-01T13:28:39+5:302026-03-01T14:32:00+5:30

Rule Change From 1st March: देशात आजपासून अनेक मोठे बदल लागू करण्यात आले आहेत.

Rule Change From 1st March: भारतातील नागरिकांसाठी मार्च 2026 ची सुरुवात अनेक महत्त्वाच्या बदलांसह झाली आहे. आज, म्हणजेच 1 मार्चपासून लागू झालेल्या नियमबदलांचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर आणि दैनंदिन व्यवहारांवर होणार आहे. एलपीजी सिलेंडरपासून ते हवाई इंधन, रेल्वे अ‍ॅप, सिम-बाइंडिंग आणि बँक सुट्ट्यांपर्यंत अनेक नियम बदलले आहेत.

पहिला बदल: दर महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल विपणन कंपन्या एलपीजी दरात बदल करतात. 1 मार्च 2026 रोजी कॉमर्शियल LPG सिलेंडरच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. शहरनिहाय नवीन दर (19 किलो कॉमर्शियल सिलेंडर): दिल्ली: ₹1740.50-₹1768.50 (₹28 वाढ), कोलकाता: ₹1844.50-₹1875.50, मुंबई: ₹1692-₹1720.50 आणि चेन्नई: ₹1899.50-₹1929. याआधी 1 फेब्रुवारी 2026 रोजीही 50 रुपयांची वाढ झाली होती. त्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट आणि व्यवसायिकांवर खर्चाचा ताण वाढणार आहे. दरम्यान, 14 किलो घरगुती LPG सिलेंडरच्या दरात मात्र 8 एप्रिल 2025 पासून कोणताही बदल झालेला नाही.

दुसरा बदल: मार्चच्या पहिल्या दिवशी हवाई इंधन दरातही वाढ करण्यात आली आहे. याचा परिणाम येत्या काळात विमान तिकिटांच्या किमती वाढण्यावर होण्याची शक्यता आहे. ATF चे नवीन दर (प्रति किलोलीटर): दिल्ली: ₹91,393.39-₹96,638.14, कोलकाता: ₹94,445.62-₹99,587.14, मुंबई: ₹85,474.63-₹90,451.87, चेन्नई: ₹94,781.99-₹1,00,280.49.

तिसरा बदल: 1 मार्च 2026 पासून भारतीय रेल्वेचे जुने UTS App बंद होण्याची शक्यता आहे. UTS अ‍ॅप बंद झाल्यानंतर, तिकीट बुकिंग, लोकल तिकीट आणि इतर रेल्वे सेवा RailOne या नव्या अ‍ॅपवर उपलब्ध होऊ शकतात.

चौथा बदल: मोबाईल वापरकर्त्यांसाठी महत्त्वाचा बदल म्हणजे SIM-Binding नियम. WhatsApp, Telegram यांसारख्या OTT अ‍ॅप्ससाठी अ‍ॅक्टिव्ह SIM नंबरशी अकाउंट जोडणे अनिवार्य असेल. दूरसंचार विभागाने (DoT) स्पष्ट निर्देश दिले आहेत की, ज्या SIM वर अकाउंट नोंदणीकृत आहे, ती SIM फोनमध्ये नसल्यास अ‍ॅपचे वापर मर्यादित किंवा बंद होऊ शकतो.

पाचवा बदल: मार्च 2026 मध्ये विविध सण आणि कार्यक्रमांमुळे बँकांना मोठ्या प्रमाणात सुट्ट्या असणार आहेत. प्रमुख बँक सुट्ट्या: होळी, गुढीपाडवा, ईद, राम नवमी, महावीर जयंती. अशाप्रकारे मार्च महिन्यात एकूण 18 दिवस बँका बंद राहणार आहेत. यात रविवार तसेच दुसरा व चौथा शनिवार यांचाही समावेश आहे.