RBI गव्हर्नर की SBI प्रमुख; कोणाचं वेतन आहे जास्त, पाहा कोणाचं किती आहे शिक्षण?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 08:41 AM2024-05-21T08:41:03+5:302024-05-21T09:03:08+5:30

RBI Governor Vs SBI Chief Salary : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही देशाची मध्यवर्ती बँक आहे, जी पतधोरण आखण्यासह नियामक म्हणूनही काम करते. भारतीय स्टेट बँक ही भारतातील सर्वात मोठी व्यापारी बँक आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर आणि एसबीआयचे अध्यक्ष महत्त्वाची आर्थिक पदे भूषवतात. या दोघांना किती पगार मिळतो माहितीये का?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ही बँकांची नियामक संस्था आहे. देशासाठी पतधोरण आखण्याबरोबरच अनेक महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय रिझर्व्ह बँक घेते. यामध्ये रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट आणि बँक रेट यासारखे व्याजदर निश्चित करण्याचा समावेश आहे.

मात्र, पगाराच्या बाबतीत सांगायचं झालं तर रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांचा पगार देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाचे (SBI) प्रमुख दिनेश खारा यांच्यापेक्षा कमी आहे. म्हणजेच रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांची टेक-होम सॅलरी रिझर्व्ह बँकेचे प्रमुख दिनेश खारा यांच्यापेक्षा कमी आहे. दोघांचा पगार किती आहे? त्यांचं शिक्षण किती आहे? चला जाणून घेऊ.

रिझर्व्ह बँकेचे विद्यमान गव्हर्नर शक्तिकांत दास आहेत. २०१८ मध्ये त्यांनी हे पद स्वीकारलं होते. ते आरबीआयचे २५ वे गव्हर्नर आहेत. गेल्या आर्थिक वर्षात त्यांचा मासिक पगार अडीच लाख रुपये होता. येत्या आर्थिक वर्षातही तो तसाच राहील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. हा पगार सरकारी सचिवांच्या पगाराएवढा आहे.

हे लक्षात घेणं महत्वाचं आहे की हे वेतन हा गव्हर्नरांना मिळणाऱ्या एकूण पॅकेजचा एक भाग आहे. शक्तिकांत दास यांच्याआधी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर राहिलेले उर्जित पटेल यांचं मासिक वेतन तेवढंच होतं. रिझर्व्ह बँकेच्या प्रमुखांना मोफत घर, वाहन, वैद्यकीय सुविधा आणि पेन्शन सह इतर लाभ मिळतात.

शक्तिकांत दास हे मूळचे ओडिशाचे रहिवासी आहेत. त्यांचा जन्म २६ फेब्रुवारी १९५७ रोजी भुवनेश्वर येथे झाला. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून इतिहास विषयात एमए केले. त्यानंतर यूपीएसईची परीक्षा उत्तीर्ण झाले. ते १९८० च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होण्यापूर्वी ते २००८ मध्ये अर्थ मंत्रालयात सहसचिव होते. २०१८ मध्ये त्यांना रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नरपदाची जबाबदारी देण्यात आली. २०२१ मध्ये ही मुदत तीन वर्षांसाठी वाढवण्यात आली होती.

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाचे (एसबीआय) चेअरमन दिनेश खारा यांना २०२२-२०२३ या आर्थिक वर्षात ३७ लाख रुपये पगार मिळाला आहे. बँकेच्या वार्षिक अहवालानुसार गेल्या वर्षीच्या तुलनेत यात ७.५ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे.

दिनेश खारा यांनी दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून कॉमर्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. त्यानंतर त्यांनी फॅकल्टी ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमधून एमबीए पूर्ण केलं. फॅकल्टी ऑफ मॅनेजमेंट स्टडीज दिल्ली विद्यापीठाचा भाग आहे.

खारा यांनी १९८४ मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून बँकेत कारकीर्द सुरू केली. ऑक्टोबर २०२० मध्ये त्यांनी बँकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. बँकेचे अध्यक्ष होण्यापूर्वी त्यांनी जागतिक बँकिंग आणि एसबीआयच्या उपकंपन्यांसह इतर जबाबदाऱ्या सांभाळत व्यवस्थापकीय संचालक पद भूषवलं होतं.

खारा यांच्या वेतनात बेसिक सॅलरी २७ लाख रुपये आणि महागाई भत्ता ९.९९ लाख रुपये होता. २०२२ मध्ये दिनेश खारा यांना ३४.४२ लाख रुपये वार्षिक वेतन मिळालं, जे २०२०-२१ या आर्थिक वर्षात रजनीश कुमार यांच्या वेतनापेक्षा १३.४ टक्क्यांनी अधिक होतं. दिनेश खारा यांचं वार्षिक वेतन ३७ लाख रुपये होतं. एचडीएफसी बँकेचे एमडी आणि सीईओ शशिधर जगदीशन यांचं एकूण पॅकेज सुमारे ६.५१ कोटी रुपये होतं.