पीपीएफ आणि दर महिन्याची ५ तारीख, अचूक टायमिंग लक्षात ठेवा; 1 कोटीचा फंड जमा करू शकाल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 10:10 AM2024-05-22T10:10:14+5:302024-05-22T10:25:18+5:30

PPF Account Benefits : सरकारी PPF योजना नोकरदारांमध्ये लोकप्रिय आहे. या योजनेत अनेक फायदे आहेत.

गुंतवणूक करण्याचे अनेक मार्ग आहेत. पण आपले पैसे सुरक्षित राहतील याची हमी कोणच देऊ शकत नाही. सध्या गुंतवणुकीमध्ये सरकारने एक योजना आणली आहे. या योजनेत तुम्हाला मजबूत परतावा देखील मिळेल. सरकारकडून अनेक बचत योजना चालवल्या जात आहेत, पण त्यात समाविष्ट असलेली सरकारी योजना म्हणजे पीपीएफ, यामध्ये पैसे गमावण्याची अजिबात भीती नाही आणि व्याज देखील प्रचंड आहे.

या योजनेत दररोज फक्त ४०५ रुपये जमा करून तुम्ही १ कोटी रुपयांचे मालक होऊ शकता. या सरकारी योजनेत ७.१% व्याज आहे. PPF योजना ही अनेक फायद्यामुळे गुंतवणुकीसाठी अनेकांची पहिली पसंती आहे. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजेच PPF गुंतवणुकीवर बँका आणि पोस्ट ऑफिसमधील मुदत ठेवींपेक्षा जास्त व्याज मिळते. सध्या सरकार पीपीएफवर वार्षिक ७.१ टक्के दराने व्याज देत आहे. याशिवाय या योजनेतील गुंतवणुकीवर चक्रवाढ व्याज दिले जाते आणि ते वार्षिक आधारावर मोजले जाते. पीपीएफ खातेदारांच्या खात्यावर दरवर्षी मार्चमध्ये व्याज दिले जाते.

तुम्ही ५०० रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. या सरकारी बचत योजनेत तुम्ही वार्षिक किमान ५०० रुपये आणि कमाल गुंतवणूक मर्यादा १.५ लाख रुपये गुंतवू शकता. जर एखाद्या गुंतवणूकदाराने आर्थिक वर्षात १.५ लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा केली तर मर्यादेपेक्षा जास्त रकमेवर कोणतेही व्याज दिले जात नाही.

तुम्ही या योजनेत एकरकमी किंवा हप्त्यांमध्ये गुंतवणूक करू शकता. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पीपीएफ गुंतवणुकीतील गुंतवणूक, मिळणारे व्याज आणि मॅच्युरिटीवर मिळणारी रक्कम पूर्णपणे करमुक्त असते. यामध्ये गुंतवणूकदाराला १५ वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागते.

पीपीएफमध्ये गुंतवणूक करणे देखील कर सूट मिळविण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. यामध्ये आयकर कलम 80C अंतर्गत ठेवींवर १.५ लाख रुपयांपर्यंत कर सूट मिळते. या योजनेच्या मुदतपूर्तीनंतरही गुंतवणूक करणे सुरू ठेवू शकता आणि तुमचे खाते ५ वर्षांसाठी वाढवू शकता.

खाते विस्तारासाठी, तुम्हाला मुदत संपण्याच्या एक वर्ष आधी अर्ज करावा लागेल. पुढील फायदा म्हणजे तुम्ही पीपीएफ योजनेतून मॅच्युरिटी पूर्ण होण्यापूर्वी म्हणजेच त्यादरम्यान पैसे काढू शकता. यासाठी ठरवून दिलेल्या नियमांनुसार, आपत्कालीन परिस्थितीत ठेव रकमेच्या ५० टक्के रक्कम काढता येते.

यासाठी तुमचे पीपीएफ खाते ६ वर्षांसाठी उघडे असणे आवश्यक आहे. याशिवाय पीपीएफ खाते तीन वर्षे चालवल्यानंतर त्यावर कर्जही घेता येते. पीएफ खात्यात जमा केलेल्या रकमेच्या २५ टक्के रक्कम तुम्ही कर्ज घेऊ शकता. त्यावर उपलब्ध व्याजदरापेक्षा २ टक्के जास्त व्याज द्यावे लागते आणि कर्जाची परतफेड करण्यासाठी जास्तीत जास्त ३६ महिन्यांचा कालावधी दिला जातो.

तुम्ही PPF मध्ये पैसे जमा करत असाल आणि ते महिन्याच्या ५ तारखेला केले तर तुम्हाला अतिरिक्त फायदा मिळेल. यामुळे तुम्हाला त्या संपूर्ण महिन्याचे व्याज मिळेल. पण जर तुम्ही पीपीएफ खात्यात त्या महिन्याच्या ६ तारखेपर्यंत किंवा शेवटच्या तारखेपर्यंत पैसे जमा केले तर पुढील महिन्यापासून त्यावर व्याज दिले जाईल. प्रत्येक महिन्याच्या ५ व्या दिवसाच्या शेवटी आणि शेवटच्या दिवसाच्या दरम्यानच्या किमान शिल्लक रकमेवर व्याज मोजले जाते. त्यामुळे पीपीएफ गुंतवणुकीदरम्यान नेहमी ५ तारीख लक्षात ठेवा.

या सरकारी सुरक्षित योजनेत थोडे थोडे पैसे जमा करून तुम्ही करोडपती होऊ शकता. यासाठी तुम्हाला दररोज ४०५ रुपये वाचवावे लागतील आणि त्यानुसार मोजल्यास तुम्हाला वार्षिक १,४७,८५० रुपये जोडावे लागतील. आता जर तुम्ही ही रक्कम PPF खात्यात २५ वर्षे सतत जमा करत असाल, तर सध्याच्या ७.१ व्याजदराच्या आधारे एकूण १ कोटी रुपयांपेक्षा जास्त होईल.