जबरदस्त रिटर्न देईल पोस्टाची 'ही' स्कीम, व्याजावरही TDS लागणार नाही; पाहा आणखी काय आहेत फायदे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 08:54 IST2025-02-19T08:48:00+5:302025-02-19T08:54:23+5:30
Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या या योजनेत तुम्हाला ७.७% पर्यंत व्याज मिळत आहे, ज्यावर कोणताही टीडीएस कापला जात नाही. याशिवाय तुम्हाला अनेक फायदे मिळतात.

Post Office Scheme: जर तुम्हाला दीर्घ काळासाठी पैसे गुंतवायचे असतील, पण कोणत्याही प्रकारची जोखीम घ्यायची नसेल तर पोस्ट ऑफिसच्या नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट अर्थात एनएससीमध्ये गुंतवणूक करू शकता. पोस्ट ऑफिसच्या या योजनेत तुम्हाला ७.७% पर्यंत व्याज मिळत आहे, ज्यावर कोणताही टीडीएस कापला जात नाही. याशिवाय तुम्हाला अनेक फायदे मिळतात.
कंपाउंडिंगचे फायदे
पोस्ट ऑफिस एनएससीमध्ये तुम्हाला एफडीसारख्या चक्रवाढ व्याजाचा फायदा मिळतो, यामुळे तुमचे पैसे वेगाने वाढतात. योजनेत गुंतवणूक १००० रुपयांपासून सुरू केली जाऊ शकते, जास्तीत जास्त गुंतवणुकीची मर्यादा नाही.
टॅक्स बेनिफिट्स
एनएससीमध्ये गुंतवणूक करणं आयकर कायद्याच्या कलम ८० सी अंतर्गत करमुक्त आहे. मात्र, ही सवलत केवळ दीड लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर मिळते. पहिल्या ४ वर्षांसाठी एनएससीकडून मिळणारं व्याज पुन्हा गुंतवले जाते, त्यामुळे करसवलत दिली जाते. मात्र, एनएससीची ५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर पुन्हा गुंतवणूक करता येत नाही, त्यामुळे कर स्लॅब दरानुसार व्याज उत्पन्नावर कर आकारला जातो. व्याजाच्या रकमेवर टीडीएस लागत नाही (TDS Rule in NSC).
१,२ आणि ५ लाखांवर किती रिटर्न
जर तुम्ही एनएससीमध्ये १,००,००० रुपये गुंतवले तर तुम्हाला ७.७% व्याजदरानं मॅच्युरिटीवर १,४४,९०३ रुपये मिळतील. २,००,००० रुपये गुंतवल्यावर तुम्हाला २,८९,८०७ रुपये मिळतील आणि ५,००,००० रुपये जमा केल्यास ७,२४,५१७ रुपये मॅच्युरिटीवर मिळतील.
कोण उघडू शकतं खातं?
यात कोणताही नागरिक खाते उघडू शकतो. यामध्ये जॉइंट अकाऊंटचीही सुविधा मिळते. अल्पवयीन मुलांच्या वतीनं पालक यात गुंतवणूक करू शकतात. तर १० वर्षांवरील अल्पवयीन मुलं आपल्या नावानं खरेदी करू शकतात. एनएससी जारी होण्याच्या आणि मॅच्युरिटीच्या तारखेदरम्यान एकदा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे ट्रान्सफर केली जाऊ शकते.
मुदतपूर्व बंद करण्याचे नियम
एनएससी योजना पाच वर्षांत मॅच्युअर होते. एकदा त्यात गुंतवणूक केल्यावर तोच व्याजदर संपूर्ण ५ वर्षांसाठी लागू राहतो जो गुंतवणुकीदरम्यान लागू होता. एनएससीमध्ये मुदतपूर्व बंद करण्याचा पर्याय नाही. खातेदाराचा मृत्यू, संयुक्त खातं असल्यास दोन्ही खातेदारांचा मृत्यू किंवा सरकार किंवा न्यायालयाचा कोणताही आदेश अशा विशेष परिस्थितीतच ते मुदतीपूर्वी बंद करता येते.