नरेंद्र मोदी उद्या लाँच करणार कमर्शिअल 5G सर्व्हिस; सर्वसामान्यांना कधी मिळणार सुविधा? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2022 03:56 PM2022-09-30T15:56:15+5:302022-09-30T16:10:11+5:30

5g services : 5G टेक्नॉलॉजीच्या मदतीने हायस्पीड इंटरनेट कोणत्याही व्यत्ययाशिवाय वापरता येऊ शकते.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 ऑक्टोबरला दिल्लीतील प्रगती मैदानावर 5G सेवेचा शुभारंभ करणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाने (PMO) ही माहिती दिली आहे. राजधानीच्या द्वारका सेक्टर 25 मधील आगामी दिल्ली मेट्रो स्टेशनच्या भूमिगत बोगद्यातून पंतप्रधानांना 5G सेवांचे कामकाज दाखवले जाईल.

5G टेक्नॉलॉजीच्या मदतीने हायस्पीड इंटरनेट कोणत्याही व्यत्ययाशिवाय वापरता येऊ शकते. ही टेक्नॉलॉजी जगात एक क्रांती आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरू असलेल्या आयआयसीसी IICC कॅम्पसमध्ये बोगद्याचा एक भाग निवडण्यात आला आहे, जिथे पंतप्रधानांना बोगद्याच्या आत असलेल्या 5G नेटवर्कचे प्रात्यक्षिक दाखवले जाईल.

बोगद्याच्या आत असलेल्या 5G सेटअपमध्ये दूरसंचार उपकरणे, कॅमेरे, ऑप्टिकल फायबर केबल्स समाविष्ट आहेत. दिल्ली मेट्रोने 5G प्रात्यक्षिकासाठी उपकरणे उपलब्ध करून दिली आहेत.

एक्सपोर्ट्सचे म्हणणे आहे की, व्यावसायिक 5G सेवा (कमर्शिअल 5G सर्व्हिस) उद्यापासून सुरू होणार आहे, मात्र ही सेवा सामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी एक वर्षापेक्षा जास्त वेळ लागण्याची शक्यता आहे.

दूरसंचार मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर 5G सेवा सुरू होत आहे. अलीकडेच 5G स्पेक्ट्रमचा लिलाव यशस्वीपणे पार पडला आणि दूरसंचार सेवा प्रदात्यांना 1,50,173 कोटी रुपयांच्या एकूण महसुलासह 51,236 मेगाहर्ट्झचे वाटप करण्यात आले होते.

तसेच, दूरसंचार मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, लिलावाने मजबूत 5G इकोसिस्टमला जन्म दिला आहे, जो IoT, M2M, AI, एज कॉम्प्युटिंग, रोबोटिक्स इत्यादींशी संबंधित बाबींची पूर्तता करण्यास सक्षम असणार आहे.

मंत्रालयाने निदर्शनास आणले की, 5G नवीन आर्थिक संधी आणि सामाजिक फायदे देऊ शकते, ज्यामुळे ते भारतीय समाजासाठी एक परिवर्तनकारी शक्ती बनण्याची क्षमता देते. हे देशाला वाढीतील पारंपारिक अडथळ्यांवर मात करण्यास, स्टार्टअप्स आणि व्यावसायिक उपक्रमांद्वारे नवनिर्मितीला चालना देण्यासाठी तसेच 'डिजिटल इंडिया'चा दृष्टीकोण पुढे नेण्यास मदत करू शकते. भारतावर 5G चा आर्थिक प्रभाव 2035 पर्यंत 450 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.