आता तुमच्या खात्यातून बायकोही करू शकणार पेमेंट; UPI मध्ये आलं नवीन फीचर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 17:04 IST2025-04-15T17:01:40+5:302025-04-15T17:04:35+5:30
PhonePe UPI Circle Feature : आता बँक खाते नसलेल्या व्यक्तीलाही तुमच्या यूपीआय अकाउंटवरुन पेमेंट करता येणार आहे. यासाठी फोन पे ने एक नवीन फीचर आणलं आहे.

भाजीच्या जुडीपासून सॅटेलाईट डिशच्या रिचार्जपर्यंत बहुतेक व्यवहार आता यूपीआयद्वारे केले जात आहे. सुरक्षित आणि सुलभ पेमेंटसाठी कंपन्या वेळोवेळी नवनवीन फीचर्स आणत असतात. फोनपेनेही असेच एक फीचर आणलं आहे. 'यूपीआय सर्कल' (UPI Circle) असं या फीचरचं नाव असून जे तुम्हाला तुमच्या यूपीआय खात्यातून तुमच्या कुटुंबाला किंवा मित्रांना पेमेंट करण्याचा पर्याय देते. यासाठी समोरच्या व्यक्तीचे बँक खाते असण्याची आवश्यकता नाही.
या फीचरमुळे तुम्ही तुमच्या UPI खात्यातून दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीला म्हणजेच सेकेंडरी यूजरला पेमेंट करण्याची परवानगी देऊ शकता. उदा. तुमची पत्नी बाजारात गेली आहे. मात्र, तिच्याकडे पेमेंट करण्यासाठी पुरेसे पैसे नसतील. अशावेळी तुमची पत्नी तुमच्या खात्यातून थेट पेमेंट करू शकते. सेकेंडरी यूजर तुमच्या खात्यातून मर्यादित रकमेपर्यंत पेमेंट करू शकतात.
पहिल्या डेलिगेशनच्या मदतीने, दुय्यम वापरकर्त्याला दरमहा १५,००० रुपयांपर्यंत आणि प्रत्येक व्यवहारासाठी ५,००० रुपयांपर्यंत पेमेंट करण्याची परवानगी आहे.
यात दोन पर्याय आहेत. पहिल्यात सेकेंडरी यूजरला तुमच्या खात्यातून पेमेंट करण्यासाठी तुमची परवानगी आवश्यक नाही. तर दुसऱ्या पर्यायात प्रत्येक पेमेंटसाठी तुमची परवानगी म्हणजेच प्राथमिक वापरकर्त्याची परवानगी आवश्यक आहे.
हे फीचर ॲक्टीवेट करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला फोनपे ॲप उघडावे लागेल. नंतर 'यूपीआय सर्कल' या पर्यायावर क्लिक करावे लागेल. नंतर दुय्यम वापरकर्त्याचा UPI आयडी एंटर करा किंवा QR कोड स्कॅन करा.
यानंतर डेलिगेशनचा प्रकार निवडा. दुय्यम वापरकर्त्याला रिक्वेस्ट पाठवा आणि त्यांनी स्वीकारल्यानंतर सेटअप पूर्ण करा.
दुय्यम वापरकर्त्याला बायोमेट्रिक किंवा पासकोडसह ऑथेंटिकेशन करावे लागेल. प्राथमिक वापरकर्ता एका वेळी जास्तीत जास्त ५ सेकंडरी युजर्स जोडू शकतो. प्राथमिक वापरकर्त्याला प्रत्येक व्यवहाराची माहिती मिळेल.