ऑनलाईन पार्सल बॉक्स कचऱ्यात फेकला तर होईल मोठं नुकसान! काही मिनिटांत बँक खाते होतं रिकामे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 17:26 IST2025-01-21T17:19:30+5:302025-01-21T17:26:36+5:30

Parcel Box Scam: आजकाल, प्रत्येकजण ई-कॉमर्स साइटवरून वेगवेगळ्या वस्तू ऑर्डर करतो आणि ज्या पार्सल बॉक्समध्ये सामान पॅक केले जाते, तो अनेकदा कचऱ्यात टाकून देतो. पण तुम्हीही असे काही करत असाल तर सावधगिरी बाळगा, कारण कचऱ्यात टाकलेल्या या पार्सल बॉक्सचा वापर करुन फसवणूक केली जात असल्याचे समोर आलं आहे.

ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून एखादे उत्पादन ऑर्डर केल्यानंतर तुम्ही पॅकिंग बॉक्स कचऱ्यात फेकून दिल्यास, तुमची मोठी फसवणूक होऊ शकते. फसवणूक करणारे लोकांची फसवणूक करण्यासाठी रोज नवनवीन पद्धती अवलंबत असतात. असाच एक नवा घोटाळा सध्या चर्चेत आहे.

तुमची अनेक वैयक्तिक माहिती ऑनलाइन मागवलेल्या उत्पादनांच्या पार्सल बॉक्समध्ये असते, ज्याचा गैरफायदा घेणारे तुमची फसवणूक करू शकतात आणि यामुळे तुमचे लाखोंचे नुकसान होऊ शकतं.

जेव्हा तुम्ही Amazon, Flipkart, Myntra किंवा इतर कोणत्याही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून एखादे उत्पादन ऑर्डर करता तेव्हा ते उत्पादन तुमच्या घरी पोहोचवले जाते. तुमच्याशी संबंधित अनेक महत्त्वाची माहिती पार्सल बॉक्समध्ये नोंदवली जाते ज्यामध्ये ई-कॉमर्स साइट सामान पॅक करते आणि तुमचा माल तुम्हाला पाठवते.

ई-कॉमर्स कंपन्या उत्पादनासाठी पार्सल बॉक्स तयार करतात त्यावर तुमचे पूर्ण नाव, घराचा पत्ता, मोबाइल नंबर आणि ऑर्डर क्रमांक देखील नोंदवला जातो. जर तुम्ही हा पार्सल बॉक्स नष्ट न करता कचऱ्यात फेकून दिला तर तुम्हीच संकटाला आमंत्रण देत आहात.

स्कॅमर तुम्ही कचरा टाकत असलेल्या पार्सल बॉक्समधून तुमची वैयक्तिक माहिती काढतात. ही माहिती वापरून हे स्कॅमर तुमचे खाते क्षणार्धात रिकामे करू शकतात. फसवणूक करणारा या माहितीच्या आधारे तुमच्याशी व्हॉट्सॲप, ई-मेल किंवा टेक्स्ट मेसेजद्वारे संपर्क साधतो.

सायबर गुन्हेगार त्यांचे कौशल्य वापरून तुमच्याकडून अधिक माहिती घेतात किंवा तुम्हाला ऑफर, नोकऱ्या किंवा इतर कशाचेही आमिष दाखवून तुमची फसवणूक करतात. एकदा तुमची वैयक्तिक माहिती स्कॅमरपर्यंत पोहोचली की तुमची फसवणूक होण्याची शक्यता वाढते.

दुसरीकडे पेमेंट गेटवेवर तुमची गोपनीय माहिती भरल्यानंतर स्कॅमर तयार असतो. ओटीपी तुमच्या मोबाइलवर येताच, तो तुम्हाला विचारतो आणि तो ओटीपी त्याच्यासोबत शेअर करतो आणि क्षणात तुमचे खाते पूर्णपणे रिकामे होते.

त्यामुळे,एखादे उत्पादन ऑनलाइन ऑर्डर केल्यानंतर, पार्सल बॉक्सवर दिलेली तुमची वैयक्तिक माहिती पुसून टाका किंवा त्यावरील लेबल काढून टाका. वैयक्तिक माहिती असलेली लेबलांची विल्हेवाट लावल्यानंतरच टाकून द्या.