Paradeep Phosphates IPO: सरकार ‘या’ कंपनीतील संपूर्ण हिस्सा विकण्याच्या तयारीत, मंगळवारपासून लावू शकता बोली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2022 10:39 AM2022-05-14T10:39:39+5:302022-05-14T10:46:32+5:30

Paradeep Phosphates IPO: सरकारी कंपनी एलआयसीचा आयपीओ तुम्हाला लागला नसेल तर काळजी करण्याची गरज नाही. आता तुम्हाला आणखी एका कंपनीत गुंतवणूक करण्याची संधी सरकार देणार आहे.

Paradeep Phosphates IPO: जर तुम्ही LIC च्या IPO मध्ये गुंतवणूक चुकवली असेल, तर तुमच्यासाठी आणखी एक संधी येत आहे. एलआयसीनंतर सरकार आणखी एका कंपनीतील आपला संपूर्ण हिस्सा विकणार आहे. सरकार पारादीप फॉस्फेट्स (Paradeep Phosphates) या खत कंपनीतील आपला संपूर्ण हिस्सा विकत आहे.

पुढील आठवड्यात गुंतवणूकदारांना या आयपीओसाठी बोली लावता येणार आहे. Paradeep Phosphates चा पब्लिक इश्यू (IPO) 17 मे रोजी गुंतवणुकीसाठी खुला होईल. यामध्ये गुंतवणूकदारांना 19 मे पर्यंत बोली लावता येईल.

पारादीप फॉस्फेट्समध्ये सरकारचा 19.55 टक्के हिस्सा आहे आणि सरकार आपला संपूर्ण हिस्सा विकत आहे. फर्टिलायझर कंपनी पारादीप फॉस्फेट्सने त्याच्या आयपीओपूर्वी अँकर गुंतवणूकदारांकडून 450 कोटी रुपये उभे केले आहेत.

BSE वेबसाइटवर जारी केलेल्या परिपत्रकानुसार, कंपनीने अँकर गुंतवणूकदारांना 42 रुपये प्रति शेअर आधारावर एकूण 10,72,66,532 इक्विटी शेअर्सचे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. अशा प्रकारे एकूण 450.52 कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री करण्यात आली आहे.

गोल्डमन सॅक्स, बीएनपी परिबा आर्बिट्रेज, कुबेर इंडिया फंड, कोपथल मॉरिशस इन्व्हेस्टमेंट आणि सोसायटी जनरल हे अँकर गुंतवणूकदार आहेत. पारादीप फॉस्फेट्सच्या शेअरचा प्राईज बँड 39-42 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आला आहे. पारादीप फॉस्फेट्स आयपीओमध्ये 1004 कोटी रूपयाच्या फ्रेश इश्यूचा समावेश आहे.

प्रमोटर्स आणि अन्य शेअर होल्डर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत 11.85 कोटी इक्विटी विकणार आहेत. आपला हिस्सा ओएफएसच्या रुपात विकणाऱ्यांमध्ये जुआरी मॅरोक फॉस्फेट प्रायव्हेट लिमिटेड 60,18,493 इक्विटी शेअर्स विकेल. तर भारत सरकार आयपीओद्वारे 11,24,89,000 इक्विटी शेअर्स विकेल.

प्राईज बँडनुसार प्रमोटर आणि सरकारद्वारे सेकंडरी शेअर्सची विक्री 497.7 कोटी रुपयांची असेल. पारदीप फॉस्फेटमध्ये सध्या ZMPPL चा 80.45 टक्के हिस्सा आहे. तर 19.55 टक्के हिस्सा भारत सरकारकडे आहे. मिळणाऱ्या रकमेतून कंपनी गोव्यातील एका प्रकल्पावर खर्च करणार आहे आणि तसंत कंपनीवरील कर्जही फेडणार आहे.