जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 10:51 IST2025-07-09T10:46:03+5:302025-07-09T10:51:33+5:30
Pakistan Coal reserves : पाकिस्तानकडे नैसर्गिक साधनांचा एक मोठा साठा आहे, ज्याचा अद्याप वापर झालेला नाही. जर पाकिस्तानने त्याचा वापर करायला सुरुवात केली तर त्यांची अर्थव्यवस्था रॉकेटसारखी वाढेल.

भारताला कायम पाण्यात पाहणाऱ्या पाकिस्तानची आर्थिक स्थिती अवघ्या जगाला माहिती आहे. पाकिस्तान कायमच जागतिक बँक, आयएमएफ, अमेरिका आणि चीनसारख्या देशांकडे मदतीची याचना करताना पाहायला मिळतो. पण, या देशाकडे असा खजिना आहे, जो अमेरिका आणि चीनच्या अर्थव्यवस्थेलाही मागे टाकू शकतो.
या सगळ्या परिस्थितीत एक धक्कादायक गोष्ट म्हणजे, पाकिस्तानकडे प्रचंड प्रमाणात नैसर्गिक साधनसंपत्ती आहे, ज्याचा अजूनही वापर झालेला नाही. जर पाकिस्तानने या साधनसंपत्तीचा योग्य वापर करून आंतरराष्ट्रीय बाजारात त्यांची विक्री सुरू केली, तर त्यांची अर्थव्यवस्था रॉकेटसारखी वेगाने वाढू शकते.
पाकिस्तानकडे कोळशाचा इतका मोठा साठा आहे की त्याची किंमत अनेक ट्रिलियन डॉलर्समध्ये आहे. या कोळशाचे मूल्य अमेरिका आणि चीनच्या एकत्रित अर्थव्यवस्थेपेक्षाही जास्त आहे! जर पाकिस्तानने हा कोळसा आंतरराष्ट्रीय बाजारभावानुसार लगेच विकायला सुरुवात केली, तर तो जगातील नंबर वन अर्थव्यवस्था बनू शकतो, असं काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
पाकिस्तानमध्ये, विशेषतः सिंध प्रांतात, कोळशाचे मोठे साठे आहेत. अंदाजानुसार, देशात सुमारे १८५ अब्ज टन कोळसा आहे. सिंध प्रांतात एकट्याने १७५ अब्ज टन कोळसा आहे. वर्ल्डोमीटरनुसार, २०१६ पर्यंत पाकिस्तानकडे ३,३७७ दशलक्ष टन कोळशाचे साठे होते, जे जगातील २० व्या क्रमांकावर होते.
एका अहवालानुसार, पाकिस्तानमध्ये त्यांच्या वार्षिक वापराच्या ३३१.१ पट जास्त कोळशाचे साठे आहेत, म्हणजेच त्यांना सुमारे ३३१ वर्षांपर्यंत पुरेल एवढा कोळसा त्यांच्याकडे शिल्लक आहे! सध्या पाकिस्तानमध्ये सुमारे १००० कोळसा खाणी कार्यरत आहेत, ज्यांची दररोज ५ कोटी रुपयांची उलाढाल होते. हा कोळसा प्रामुख्याने वीज निर्मिती आणि सिमेंट उद्योगात वापरला जातो.
सिंध प्रांतातील १७५ अब्ज टन कोळसा हा ६१८ अब्ज बॅरल कच्च्या तेलाच्या समतुल्य आहे! सध्या व्हेनेझुएलाकडे कच्च्या तेलाचा सर्वात मोठा साठा आहे, जो सुमारे ३०० अब्ज बॅरल आहे. याचा अर्थ पाकिस्तानकडे व्हेनेझुएलाच्या दुप्पट कोळशाचे साठे आहेत, जे तेलाच्या स्वरूपात पाहिले जातात. पाकिस्तानकडे पैसा नसला तरी, नैसर्गिक साधनसंपत्तीचा इतका मोठा साठा आहे की तो जगातील महासत्ता बनू शकतो.
पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील १७५ अब्ज टन कोळशाचे मूल्य सध्याच्या ७० डॉलर प्रति बॅरल कच्च्या तेलाच्या दराने पाहिले, तर ते ४३.२६ ट्रिलियन डॉलर (सुमारे ४३ लाख कोटी डॉलर) होते. याचा अर्थ पाकिस्तानकडे अक्षरशः ट्रिलियन डॉलर्सचा खजिना आहे जो ३०० वर्षांपर्यंत संपण्याची शक्यता नाही. केवळ कोळशाच्या जोरावर पाकिस्तान आपली अर्थव्यवस्था गगनाला भिडवू शकतो. विशेष म्हणजे, पाकिस्तानकडे चीन आणि अमेरिकेच्या एकूण जीडीपीपेक्षाही जास्त कोळशाचे साठे आहेत.
जागतिक बँकेच्या अंदाजानुसार, २०२४ मध्ये पाकिस्तानचा एकूण जीडीपी ३७३ अब्ज डॉलर्स आहे. एकेकाळी तर पाकिस्तानचा जीडीपी भारतातील टाटा समूहाच्या एकूण मार्केट कॅपपेक्षाही कमी होता. २०२५ मध्ये पाकिस्तानी अर्थव्यवस्था २.६८ टक्के दराने वाढण्याची शक्यता आहे, तर दरडोई उत्पन्न १८२४ डॉलर्सवर पोहोचू शकते.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, पाकिस्तानने चालू आर्थिक वर्षासाठी आपल्या भांडवली खर्चात कपात केली आहे, परंतु संरक्षण बजेटमध्ये मात्र सुमारे १० टक्के वाढ केली आहे. पाकिस्तान आयएमएफ आणि जागतिक बँकेच्या कर्जावर जगत असताना, संरक्षण खर्चातील ही वाढ अनेक देशांच्या टीकेचा विषय बनली आहे.