पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 09:27 IST2025-06-19T09:15:07+5:302025-06-19T09:27:30+5:30
Iran Israel War: सध्या इराण इस्रायलमध्ये जोरदार युद्ध सुरू आहे. पण अशातच आता इस्रायलकडे लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांपासून बचाव करणाऱ्या अॅरो इंटरसेप्टर क्षेपणास्त्रांची कमतरता झाल्याची माहिती समोर आलीये.

Iran Israel War: सध्या इराण इस्रायलमध्ये जोरदार युद्ध सुरू आहे. पण अशातच आता इस्रायलकडे लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांपासून बचाव करणाऱ्या अॅरो इंटरसेप्टर क्षेपणास्त्रांची कमतरता झाल्याची माहिती समोर आलीये. एका रिपोर्टनुसार, जर इराणशी संघर्ष सुरू राहिला तर या कमतरतेमुळे इस्रायलची क्षेपणास्त्र हल्ल्यांना तोंड देण्याची क्षमता धोक्यात येईल. वॉल स्ट्रीट जर्नलमधील एका वृत्तात एका अमेरिकन अधिकाऱ्याचा हवाला देत अमेरिकेला अनेक महिन्यांपासून या समस्येची माहिती असल्याचं म्हटलंय.
इस्रायलच्या डिफेन्सिव्ह इंटरसेप्टर्सची किंमत खूप जास्त आहे. इराणच्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांनंतर, त्यांचा साठा झपाट्यानं कमी होत असल्याच्या बातम्या येत आहेत. त्यामुळेच त्यांची किंमत ही मोठी चिंतेची बाब बनली आहे. इस्रायल इराणी क्षेपणास्त्रे रोखण्यासाठी दररोज कोट्यवधी रुपये खर्च करत आहे.
पाकिस्तानसारखे छोटे देश याची कल्पनाही करू शकत नाहीत. इस्रायलच्या या डिफेन्सिव्ह इंटरसेप्टर्सची किंमत किती आहे आणि इराणी क्षेपणास्त्र हल्ल्यांपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी ते दररोज किती खर्च करत आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करुया.
अॅरो सिस्टम - अॅरो इंटरसेप्टर मिसाईल सर्वात महाग आहेत. एका अॅरो इंटरसेप्टर मिसाईलची किंमत २० लाख डॉलर्स ते ३० लाख डॉलर्स (अंदाजे रुपये १६.७ कोटी ते रुपये २५ कोटी) असल्याचं म्हटलं जातं. हे लांब पल्ल्याच्या आणि खूप उंचावरील बॅलिस्टिक मिसाईल्सना रोखण्यासाठी डिझाइन केलेलं आहे. इराणी बॅलिस्टिक मिसाईल्सना रोखण्यात हे सर्वात प्रभावी आहेत.
डेविड्स स्लिंग - डेविड्स स्लिंग सिस्टमच्या एका इंटरसेप्टर मिसाईलची किंमत १० लाख डॉलर्स पेक्षा (जवळपास ८.३ कोटी) अधिक आहे. हे मध्यम पल्ल्याच्या मिसाईल्सना जसं की रॉकेट आणि क्रुझ मिसाईल्सना रोखण्यास सक्षम आहे.
आयरन डोम - आयरन डोम इंटरसेप्टर ज्याला तामिर म्हणूनही ओळखलं जातं ते तुलनेने स्वस्त आहे. त्याची किंमत प्रति क्षेपणास्त्र २० हजार ते १ लाख डॉलर्स (अंदाजे १६.७ लाख ते ८३ लाख रुपये) पर्यंत असू शकते. काही रिपोर्टमध्ये याची किंमत ५०,००० ते १५०,००० डॉलर्स इतकी सांगण्यात आलीये. हे हमाससारख्या गटांनी गाझामधून डागलेली कमी पल्ल्याची रॉकेट, मोर्टार आणि ड्रोन रोखण्यासाठी डिझाइन केलेलं आहे.
इस्रायली फायनान्शिअल 'द मार्कर' च्या अंदाजानुसार इस्रायल इराणी क्षेपणास्त्र हल्ले रोखण्यासाठी दररोज रात्री २८.५ कोटी डॉलर्स (सुमारे २,३८० कोटी रुपये) खर्च करत आहे. या खर्चात प्रामुख्याने अॅरो सिस्टमसारख्या महागड्या इंटरसेप्टरचा वापर समाविष्ट आहे.