'महाकुंभ' मेळ्यात बेरोजगारांना कमाईची संधी; अवघ्या ४५ दिवसांत कमवा ५ ते ८ लाख
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 14:04 IST2025-01-14T14:00:20+5:302025-01-14T14:04:30+5:30

महाकुंभ मेळ्यात लाखो भाविक उत्तर प्रदेशच्या प्रयागराज शहरात जमले आहेत. १३ जानेवारीपासून सुरू झालेल्या महाकुंभ मेळ्यासाठी देश विदेशातून भाविक आलेत. महाकुंभ मेळा हा केवळ धार्मिक सोहळा नसून त्यातून उत्तर प्रदेशातील बेरोजगारांसाठी कमी दिवसांत अधिक कमाई करण्याची संधी आहे.
एका रिपोर्टनुसार, उत्तर प्रदेशच्या महाकुंभ मेळ्याच्या ४५ दिवसांच्या आयोजनात २ लाख कोटीहून अधिक उलाढाल होणार आहे. जर ४० कोटी भाविक या ४५ दिवसांत महाकुंभ मेळ्यासाठी आले तर प्रत्येक व्यक्तीचा सरासरी खर्च ५ हजार इतका आहे. यात निवास, खाणे पिणे आणि पर्यटन या व्यवसायाला चालना मिळेल.
स्थानिक हॉटेल, गेस्टहाऊस आणि पेंट हाऊस, किचन, छोटे स्टॉल यांना ४० हजार कोटी उत्पन्न मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आर्थिक आणि व्यावसायिक उलाढाल महाकुंभ मेळ्यात होणार आहे. त्यात भोजन, धार्मिक वस्तू, हेल्थकेअर आणि अन्य सेवांवरही अधिक खर्च होईल.
धार्मिक वस्तू, त्यात प्रसाद, तेल, गंगाजल, पणत्या, अगरबत्ती, धार्मिक पुस्तके यांच्या विक्रीतून २० हजार कोटी उत्पन्न मिळू शकते. स्थानिक परिवहन सेवा, टॅक्सी, रिक्षा सेवा यासारख्या वाहतूक व्यवस्थेलाही १० हजार कोटींपर्यंत कमाई होऊ शकते. पर्यटनात टूर गाईड, ट्रॅव्हल पॅकेज इतर सेवांचा समावेश आहे.
महाकुंभ मेळ्यात दररोज लाखोंच्या संख्येने भाविक प्रयागराजच्या संगम किनारी येणार आहेत. त्याठिकाणी छोटे मोठे व्यवसाय करून बेरोजगार तरुणांना कमाईची मोठी संधी आहे. देश विदेशातून मोठ्या संख्येने भाविक प्रयागराज इथं जमतील. या गर्दीतील लोकांना लागणाऱ्या जीवनावस्तू विक्री करून तरूण कमाई करू शकतात.
चहा विक्री - चहा असं पेय आहे जे मोठ्या प्रमाणात प्यायले जाते. संगमाजवळ लाखोंच्या संख्येने येणाऱ्या भाविकांसाठी जर कुणी चहा विक्री करत असेल तर त्याला एका कपमागे १० रुपये असे दिवसाला किमान १ हजार कप विकले गेले तरी दिवसाला १० हजारांची कमाई सहज होऊ शकते. चहासाठी लागणारा खर्चही कमी आहे.
भेळ विक्री - महाकुंभसाठी आलेल्या भाविकांना खाण्यासाठी सहज उपलब्ध होणारी गोष्ट म्हणजे भेळ, जर एखाद्याने प्रयागराज इथं भेळ विक्री करण्यास सुरुवात केली तर एका भेळसाठी २० रुपये आकारले. दिवसाला किमान ८०० ते १००० लोकांनी भेळ खरेदी केली तरी पुढील ४५ दिवसांत लाखोची कमाई होऊ शकते
टिळा लावणे - महाकुंभसाठी येणारे भाविक धार्मिकतेने तिथे जमलेले असतात. भक्तीभावाने आलेल्या भाविकांना गंगा स्नानानंतर टिळा लावण्याचं काम कुणी केले तर ते स्वखुशीने ५ ते १० रुपये देतात. कुणी दिवसाला लाखो भाविकांमध्ये अवघ्या ५०० ते १००० भाविकांना टिळा लावला तरी ४५ दिवसात त्यांच्यासाठी कमाईची संधी आहे.
चहा, भेळ आणि टिळा लावण्याच्या या कामांमधून दिवसाला १००० भाविकांकडे तुम्ही पोहचला आणि प्रत्येकी १० ते २० रुपये कमाई केली तरी दिवसाला १० ते २० हजार रुपये कमाई तुम्ही करू शकता. महाकुंभ मेळा १३ जानेवारी २०२५ पासून २६ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत चालणार आहे. त्यामुळे या ४५ दिवसांत ५ ते ८ लाख रुपये कमाई सहजपणे होऊ शकते.
प्रयागराज येथे होणाऱ्या महाकुंभ मेळ्यासाठी जवळपास ४० कोटी भाविक येण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. ही संख्या अमेरिका आणि रशियाच्या एकत्रित लोकसंख्येच्या अधिक आहे. या लोकांसाठी खाण्यापिण्याच्या वस्तू, बिस्किट, ज्यूस, चहा कॉफी यासारखे अनेक वस्तू विक्री करता येऊ शकतात.