रक्षाबंधनाच्या मुहुर्तावर स्वस्तात सोने खरेदीची संधी, मोदी सरकारच्या या योजनेमुळे होणार सर्वसामान्यांची चांदी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2020 11:30 AM2020-08-01T11:30:33+5:302020-08-01T12:06:26+5:30

सोमवारी ३ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाता सण आहे. भावा बहिणीमधील या पवित्र सणाच्या दिवशी केंद्र सरकारने लोकांना स्वस्तात सोने खरेदी करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.

गे्ल्या काही दिवसांमध्ये सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. कोरोनामुळे आलेल्या आर्थिक संकटाच्या काळात इतर क्षेत्रात अनिश्चितता वाढल्याने गुंतवणूकदारांनी सोन्यावर लक्ष केंद्रित केल्याने सोन्याचे भाव दिवसागणिक वाढत आहेत.

सध्या श्रावण महिना सुरू असून,सोमवारी ३ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाता सण आहे. भावा बहिणीमधील या पवित्र सणाच्या दिवशी केंद्र सरकारने लोकांना स्वस्तात सोने खरेदी करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.

त्यामुळे या दिवशी तुम्ही स्वस्तात सोने खरेदी करून आपल्या बहीण भावाला भेट देऊ शकता. मोदी सरकारने आणलेल्या या योजनेची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे आहे.

केंद्र सरकार येत्या ३ ऑगस्टपासून पुन्हा एकदा सॉवरेन गोल्ड बॉण्ड योजनेची सुरुवात करत आहे. या योजनेंतर्गत सोन्याची किंमत ही ५ हजार ३३४ रुगये प्रतिग्रॅम एवढी निश्चित करण्यात आली आहे.

दरम्यान, या सोनेखरेदी स्कीममध्ये गुंतवणूक करण्यासाठी ऑनलाइन पेमेंट करणाऱ्यांना प्रतिग्रॅम ५० रुपये एवढी सवलत देण्यात येणार आहे. त्यामुळे ऑनलाइन पेमेंट करणाऱ्यांसाठी सोन्याचा दर हा पाच हजार २८४ रुपये प्रति ग्रॅम एवढा असेल. त्यामुळे तुम्ही १० ग्रॅम सोने खरेदी केल्यास त्यासाठी तुम्हाला ५२ हजार ८४० रुपये द्यावे लागतील.

जर बाजाराचा विचार केला तर सध्या सोन्याचा दर हा प्रतिग्रॅम ५४ हजार रुपयांहून अधिक आहे. मोदी सरकारच्या योजनेंतर्गत तुम्ही सोने बाँडच्या स्वरूपात खरेदी करू शकता.

हा बाँड खरेदी करण्यासाठी किमान १ ग्रॅम आणि कमाल ४ किलोग्रॅम सोने खरेदीची मर्यादा घालून देण्यात आली आहे. त्यामुळे सोन्याची शुद्धता आणि सुरक्षिततेची काळजी तुम्हाला करावी लागणार नाही. त्यासाठी तुम्ही डिजिटल पद्धतीने बँक, निर्धारित करण्यात आलेले पोस्ट ऑफिस, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, एनएसई आणि बीएसईमध्ये अर्ज करू शकता.

रिझर्व्ह बँकेच्या अधीन असलेले हे बाँडचा कालावधी आठ वर्षांचा आहे. यामध्ये पाच वर्षांनंतर व्याजाचा भरणा करण्याच्या तारखे दिवशी बाहेर पडण्याचा पर्याय उपलब्ध आहे.

सोन्याची फिजिकल डिमांड कमी व्हावी हा या सरकारच्या बाँड स्कीमचा हेतू आहे. सध्या तुम्ही ३ ऑगस्टपासून सात ऑगस्टपर्यंत या बाँड स्कीमच्या माध्यमातून सोनेखरेदी करू शकता. दरम्यान, सप्टेंबर महिन्यामध्ये सरकारकडून ही स्कीम पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.

Read in English