आता हात न लावता ग्राहकांना एटीएममधून काढता येणार पैसे, अशी असेल संपूर्ण प्रक्रिया
By बाळकृष्ण परब | Updated: February 10, 2021 15:32 IST2021-02-10T15:10:43+5:302021-02-10T15:32:37+5:30
Contactless money withdrawal : आता एटीएमधारकांना कुठल्याही प्रकारचा स्पर्श टाळत एटीएम मशीनमधून पैसे काढता येणार आहेत.

कोरोनाकाळात सुरक्षिततेसाठी बाहेरील कुठल्याही वस्तूला स्पर्श करणे धोकादायक बनले होते. त्यामुळे काही बँकांनी एटीएममधून संपर्काशिवाय पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. मात्र ही सुविधा पूर्णपणे संपर्करहीत नव्हती. पण आता एटीएमधारकांना कुठल्याही प्रकारचा स्पर्श टाळत एटीएम मशीनमधून पैसे काढता येणार आहेत.
मास्टरकार्डने संपूर्णपणे स्पर्शरहीत पैसे काढण्याची सुविधा देण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. त्यासाठी मास्टरकार्डने AGS Transact Technologies सोबत करार केला आहे. त्यामुळे एटीएम कार्डधारकांना एटीएमची स्क्रीन आणि बटणाला हात न लावता पैसे काढता येणार आहेत.
अशा प्रकारे एटीएमच्या कुठल्याही प्रकारचा संपर्क टाळत एटीएमममधून पैसे काढण्यासाठी स्क्रीनवरील एक क्यूआर कोड स्कॅन करावा लागेल.
एजीएस ट्रांजेक्ट टेक्नॉलॉजी (AGS Transact Technologies, AGSTTL) नावाच्या कंपनीने एक नवीन सॉफ्टवेअर विकसित केले आहे. त्याच्या मदतीने कुठलीही व्यक्ती एटीएम मशीनला टच न करता पैसे काढता येणार आहेत. AGSTTL च्या गृपचे चीफ टेक्नॉलॉजी ऑफीसर, महेश पटेल यांनी सांगितले की, आम्ही पूर्णपणे संपर्करहीत समाधानाची सुरुवात केली आहे. मास्टरकार्ड नेटवर्कचा उपयोग करणाऱ्या बँका आपल्या ग्राहकांना या सुविधेचा लाभ देण्यासाठी AGS Transact Technologies संपर्क साधू शकतात.
अशा प्रकारे स्पर्श न करता एटीएममधून काढता येतील पैसे
यासाठी सर्वप्रथम स्मार्टफोनवर बँकेचे मोबाइल अॅप्लिकेशन ओपन करा आणि क्यूआर कॅश विड्रॉवल (QR Cash Withdrawal) च्या पर्यायावर क्लिक करा, त्यानंतर जेवढे पैसे काढायचे असतील तेवढी रक्कम फोनमध्ये टाइप करा, मग एटीएम स्क्रीनवर दिसणारा QR code स्कॅन करा, आता Proceed बटणावर क्लीक करा आणि कन्फर्म करा, त्यानंतर तुमचा चार अंकी पिन नंबर टाका, ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्हाला हवी असलेली रक्कम एटीएममधून प्राप्त होईल
या प्रक्रियेबाबत पटेल यांनी सांगितले की, स्पर्शरहीत व्यवहारामुळे कोरोनाकाळातच मदत होणार नाही तर ही प्रक्रिया एटीएममध्ये होणाऱ्या फसवणुकीचे प्रमाणही कमी करण्यास मदत करेल. जेव्हा दोन अडीच वर्षांपूर्वी या तंत्रावर काम सुरू केले होते. तेव्हा आमचे लक्ष्य मोबाइल अॅपच्या माध्यमातून रक्कम काढण्याचा पर्याय देऊन एटीएम फ्रॉड कमी करण्याचे होते.
दरम्यान, बँक ऑफ इंडियामध्ये कॉन्टॅक्टलेस विड्रॉव्हलची सुविधा सर्वात प्रथम सुरू केली होती. मात्र ही प्रक्रिया पूर्णपणे संपर्क रहित नव्हती. मात्र आता बँक ऑफ इंडियासाठी पूर्णपणे कॉन्टॅक्टलेस सुविधा सुरू झाली आहे.