सायरस मिस्त्रीच नव्हे, 'या' ५ प्रसिद्ध व्यक्तींनाही रस्ते अपघातात गमवावा लागला प्राण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2022 08:03 PM2022-09-04T20:03:49+5:302022-09-04T20:09:10+5:30

सायरस मिस्त्रींचा आज रस्ते अपघातात मृत्यू झाला

Cyrus Mistry Death: टाटा सन्सचे माजी अध्यक्ष आणि उद्योगपती सायरस मिस्त्री यांचे रविवारी एका रस्ते अपघातात निधन झाले. मुंबईजवळ पालघरमध्ये हा अपघात झाला. यावेळी त्यांच्यासोबत कारमध्ये आणखी चार जण प्रवास करत होते. या अपघातात आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, तर दोन जण जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. या आधीही अनेक नामवंत व्यक्तींना रस्ते अपघातात जीव गमवावा लागला आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच ५ प्रसिद्ध व्यक्तींबद्दल सांगत आहोत, ज्यांना रस्ते अपघातात प्राण गमवावा लागला.

प्रसिद्ध पंजाबी गायक निर्वैर सिंग- प्रसिद्ध पंजाबी गायक निर्वैर सिंग याचे ३१ ऑगस्ट २०२२ रोजी ऑस्ट्रेलियात एका रस्ते अपघातात निधन झाले. तो पंजाबमधील कुरळी येथील वॉर्ड क्रमांक-7 मास्टर कॉलनी येथील रहिवासी होता. निर्वैर सिंगने आपल्या गायनाची कारकीर्द ऑस्ट्रेलियातून सुरू केली आणि सुमारे ९ वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियात स्थलांतरित झाला. त्याच्या 'माय टर्न' अल्बममधील 'तेरे बिना' हे गाणं खूप गाजलं.

पंजाबी अभिनेता दीप सिद्धू- १५ फेब्रुवारी २०२२ रोजी, प्रसिद्ध पंजाबी अभिनेता संदीप उर्फ ​​दीप सिद्धू याचा कुंडली-पलवल-मानेसर (KMP) एक्स्प्रेस वेवर झालेल्या अपघातात मृत्यू झाला. टोल प्लाझाजवळ त्यांची स्कॉर्पिओ गाडी ट्रॉलीला धडकली. त्यामध्ये सिंगरचा मृत्यू झाला, त्याशिवाय त्याची होणारी पत्नी जखमी झाली होती. शेतकरी आंदोलनादरम्यान दीप सिद्धू प्रसिद्धीच्या झोतात आला होता. त्याने लाल किल्ल्यावर ध्वज फडकावला होता.

ज्युनियर एनटीआरचे वडील नंदामुरी हरिकृष्णा- तेलंगणातील टीडीपी नेते अभिनेता-राजकारणी नंदामुरी हरिकृष्णा यांचा २९ ऑगस्ट २०१८ रोजी एका भीषण रस्ते अपघातात मृत्यू झाला. या अपघातात त्यांच्या कारचा चक्काचूर झाला. तेलंगणातील नालगोंडा जिल्ह्यात हा अपघात झाला. हरिकृष्ण हे व्यवसायाने अभिनेते होते आणि त्यांनी अनेक तेलगू चित्रपटांमध्ये काम केले. त्यांची मुले कल्याणराम आणि तारका रामाराव (ज्युनियर एनटीआर) हे देखील तेलुगू चित्रपटांचे प्रसिद्ध अभिनेते आहेत.

कॉमेडियन जसपाल भट्टी- 'कॉमेडीचा बादशाह' जसपाल भट्टी यांचा २५ ऑक्टोबर २०१२ रोजी पंजाबमध्ये रस्ते अपघातात मृत्यू झाला होता. या अपघातात त्यांचा मुलगाही जखमी झाला होता. आगामी पॉवर कट चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मोगाहून पंजाबमधील जालंधरला जात असताना त्यांच्या कारला अपघात झाला होता. या अपघातात त्यांचा मुलगा वाचला.

मराठी अभिनेत्री ईश्वरी देशपांडे- मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री ईश्वरी देशपांडे हिचे २२ सप्टेंबर २०२१ रोजी गोव्यात एका कार अपघातात निधन झाले. गोव्यातील बारदेझ तालुक्याजवळील अरपोरा नावाच्या परिसरात ही घटना घडली. ईश्वरीसोबत कारमध्ये तिचा मित्र शुभम देडगे हाही होता. त्याचाही जागीच मृत्यू झाला. त्यांची कार बागा खाडीच्या खोल पाण्यात बुडाली. नंतर दोघांचेही मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले होते.