क्रेडिट स्कोअरच नव्हे, तर या कारणांनीही कर्ज मिळत नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 13:48 IST2025-09-11T13:45:01+5:302025-09-11T13:48:45+5:30

कर्ज मंजूर करण्यापूर्वी बँक तुमचा क्रेडिट स्कोअर (सिबिल) तपासतात. हा तीन अंकी स्कोअर महत्त्वाचा असला तरी बँका आणि इतर कर्ज देणाऱ्या संस्था फक्त त्यावर विसंबून राहत नाहीत.

कर्ज मंजूर करताना उत्पन्नाची स्थिरता, आधीपासून असलेली कर्जे, खर्च करण्याची सवय आणि आर्थिक शिस्त यांसारखे अनेक घटक बँका पाहतात.

सिबिल स्कोअर ७५० किंवा त्याहून जास्त असला तरी कमाईचा मोठा भाग आधीच 'ईएमआय'मध्ये जात असेल, तर कर्ज नाकारले जाऊ शकते.

अनेकदा लोकांच्या उत्पन्नाचा ५० ते ६० टक्के हिस्सा आधीच कर्जफेडीत जातो. अशा परिस्थितीत बँका कर्जफेडीची क्षमता मर्यादित मानतात.

बँका कर्ज देताना नियमित आणि विश्वासार्ह उत्पन्नाला प्राधान्य देतात. मोठ्या व विश्वासार्ह कंपनीत दीर्घकाळ काम करणाऱ्यांना कर्ज मिळण्याची शक्यता जास्त असते.

फ्रीलान्सर आणि हंगामी कामगारांना (गिग वर्कर्स) कर्ज देताना बँका व वित्तीय संस्था अधिक तपासणी करतात. बँका त्यांच्याकडे आयकर विवरणपत्र, बँक स्टेटमेंट आणि व्यवसायाची सातत्याचे पुरावे मागतात.

कर्ज घेणाऱ्याची चांगली आर्थिक शिस्त अनेकदा स्कोअरपेक्षा जास्त महत्त्वाची ठरते. तारण, नियमित बचत आणि कमी डेट-टू-इनकम रेशो असल्यास कर्ज मिळण्याची शक्यता अधिक असते.